‘शिक्षणविवेक’ मासिक व संकेतस्थळासाठी नियमित लेखन करीत असलेल्या लेखकांचे  दि. ६ जुलै, २०१८ रोजी सायंकाळी ४ ते ६ वेळात एकत्रीकरण घेण्यात आले. एकत्रीकरणाच्या ‘संवादू आनंदे’ या पहिल्या सत्रात बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी लेखकांशी गप्पा मारल्या.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणविवेक कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी एकत्रीकरणाची भूमिका मांडली. लेखकांनी आपापला परिचय करून देताना परीचयासोबत आवडीचे पुस्तक आणि आवडीचा खाद्यपदार्थ सांगणे, हा सर्वांसाठीच वेगळा अनुभव होता. हलकीफुलकी आणि मजेशीर परिचय झाल्यानंतर राजीव तांबे यांनी चर्चेला सुरुवात केली. यावेळी ‘बालसाहित्य कसे असावे’ या विषयावर चर्चा घेण्यात आली. चर्चा होत असताना स्वतःची लेखन शैली, मुलांना आवडणारे साहित्य अशा गोष्टींवर सर्वजण मोकळेपणाने बोलत होते. काही लेखक स्वतः शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्यामुळे अध्यापनातील अनुभवही यावेळी सर्वांसमोर मांडण्यात आले. आजच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मानसिकतेला रुचेल आणि योग्य असेल असे लेखन करण्याविषयी विचार मांडण्यात आले. चर्चा खूप रंगली. चर्चेतून  बालसाहित्य म्हणून येऊ शकतील असे अनेक नवीन लेखनप्रकार समोर आले. वेगवेगळ्या लेखन पद्धतींनी लेखन करण्याचा विचार सर्वांच्या मनात येत होता. मुलांसाठी लेखन करताना आपल्याला लहान होता आले पाहिजे, हा मोलाचा विचार यावेळी राजीव तांबे यांनी सांगितला.  

 

वाचकांना केवळ उपदेशाचे डोस न देता आपले लेखन रसिक वाचकांना मनोरंजनासोबत नवीन विचार देणारे ठरेल; असा लेखनाचा प्रयत्न करण्याचे ठरवले. शिक्षणविवेकच्या पुढील वाटचालीत विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांना नवनवीन लेखन प्रकार देण्याचे ठरवून एकत्रीकरणा संपले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी केले तर शिक्षणविवेक संकेतस्थळ समन्वयक अनुजा जोशी यांनी आभार मानले.

                                                                    -रुपाली निरगुडे

[email protected]