गंगा नदी खालोखाल भारतातील मी दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत जास्त लांब नदी आहे. मला ‘वृद्ध गंगा’ असेही म्हटले जाते. गंगा व माझा उगम एकच असून मी भूगर्भातून दक्षिणेत आली अशी दंतकथा माझ्याबद्दल सांगितली जाते. त्यामुळे मला ‘वृद्धगंगा’ असे म्हटले गेले आहे. मला ‘दक्षिण गंगा`’, ‘गौतमीगंगा’ या नावानेही ओळखले जाते. माझी अशी सारी नावे असली तरी मी महाराष्ट्राची गोदा... गोदावरी....

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगातील त्रंबक पर्वतातून माझा उगम होतो. मी पूर्वआग्नेय दिशेने नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून वाहते. नंतर परभणी आणि नांदेड असा प्रवास करत मी आंध्र प्रदेशच्या आदिलाबाद व निजामाबाद जिल्ह्यातून असा पुढे पुढे प्रवास करत शेवटी विशाखापट्टणम येथे बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.  आंध्र प्रदेशमध्ये मला ‘तेलगू गंगा’ असेही म्हणतात.  मी विशाखापट्टणम येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळेपर्यंत मला अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यांना सोबत घेऊन मी माझा प्रवास सुरू ठेवते. प्राणहिता ही मोठी नदी मला डावीकडून येऊन मिळते. तेलंगणामधील आदिलाबाद जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातून वाहत प्राणहिता शेवटी गडचिरोली येथील सिरोंचा येथे मला येऊन मिळते. मांजरा ही ७२४ कि.मी. लांबीची उपनदी मला महाराष्ट्रातील बालाघाट पर्वतातून येऊन मिळते. या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे ती बालाघाट येथे कमी पावसाच्या प्रदेशातून वाहत मला येऊन मिळण्याआधी तेलंगणातील उच्च पर्जन्यमान प्रदेशातून वाहते. त्याच प्रमाणे मला उजवीकडून प्रवरा, मंजिरा आणि मणेर या नद्या येऊन मिळतात; तर पूर्णा, प्राणहिता आणि साबरी या काही महत्वाच्या नद्या डावीकडून येऊन मिळतात.

माझ्या नदीचे खोरे माशांच्या प्रजातींमध्ये समृद्ध आहे. माशांसोबत माझ्या पाण्यात कोलंबी आणि खेकडे हेदेखील आढळतात बर का..! महाराष्ट्रातील माझे खोरे सुपीक असून त्यामध्ये विविध फळे आणि भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, कडधान्ये, द्राक्षे, मिरची, ऊस, मोसंबी यासारखी उत्पादने घेतली जातात. माझ्या आजूबाजूला फुलबागाही विपुल प्रमाणात आहेत. माझ्या तसेच माझ्या उपनद्यांच्या खोर्यात अनेक अभयारण्ये, संरक्षित क्षेत्रे व राष्ट्रीय उद्याने याचा समावेश आहे. यामध्ये वर्धा येथील बोर अभयारण्य, नवेगाव येथील अभयारण्य तसेच महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान आणि मध्य प्रदेशातील पेंच नॅशनल पार्क आणि अनेक इतर वन्यजीवन उद्याने येथे सध्याला नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या राजेशाही बंगाल वाघ आणि हत्तीं व अन्य इतर लुप्त होणाऱ्या प्राणीप्रजातीचे संवर्धन करण्यात आले आहे.

माझ्या तसेच माझ्यासोबत वाहणाऱ्या उपनद्यांच्या पाण्याचा वापर मानवाला योग्यरीत्या करता यावा यासाठी काही धरणे बांधण्यात आली. माझ्या खोऱ्यात बांधण्यात आलेल्या धरणाची संख्या भारतातील सर्व नदी खोरेंमधील सर्वात जास्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण, नाशिकमधील गंगापूर धरण, निजामाबाद येथील निजामसागर धरण, मांजरा नदीवरील सिद्धेश्वर धरण, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण, अशी अनेक धरणे माझ्या व माझ्या उपनद्यांवर बांधण्यात आली आहेत.

नाशिकमधील दंडकारण्य या भागाला धार्मिक महत्त्व आणि लक्षण यांनी जो वनवास झाला, तेव्हा ते नाशिक येथील पंचवटी येथे राहायला होते. नाशिकजवळील माझ्या काठाजवळ प्राचीन काळच्या मंदिरांचे अस्तित्व दिसून येते.

भारतातील इतर नद्याप्रमाणे मलाही शहरी व ग्रामीण सांडपाण्याचा, औद्योगिकरणामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. जल प्रदूषण आज खूप गंभीर समस्या आहे. असे असूनही मानव या गोष्टीचा गंभीरपणे विचार करत नाही आहे. माझ्या पाण्यात राहणाऱ्या सजीवांना प्रदूषणामुळे त्रास होतो. त्यांचे जीवन धोक्यात येते. माझे पाणी दुषित होते. या साऱ्याचा मानवाने विचार करणे गरजेचे आहे.

तुमच्या भेटीला येणारी प्रत्येक नदी तुम्हांला स्वतःचे दुःख हेच सांगते. याचा विचार मानवाने करावा यासाठी ती सांगत असते. नदी समृद्ध आहे, फक्त मानवनिर्मित या प्रदूषणाला आळा मानवच घालू शकतो म्हणून नदी मानवाला विनंती करते की, प्रदूषण टाळा. असो, मानवाने मला माता म्हटले आहे, म्हणूनच त्याच्यावर राग न ठेवता मी त्याच्या चुका पोटात घेत समुद्राला भेटण्यासाठी खळखळ वाहत पुढे जाते. चला तर मग मित्रांनो, आता मी निघते. मला समुद्राला भेटण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तुम्हालाही यशाचा पल्ला गाठायचा आहे ना, चला तर मग आता तुम्हीही अभ्यासाला लागा. मी निघते. माझी एखादी मैत्रीण पुढच्या महिन्यात येईल तुमच्या भेटीला.. तोवर हसा, खेळा, अभ्यास करा आणि प्रवाही राहा.

-उत्कर्षा सुमित

[email protected]

 

Ref ; 1.  Indian Water  culture – R.S Morvanchikar

2. V.H Yaardi; J.B Kumathekar ; Marathi Vishwakosh  Maharashtra Rajya Marathi Vishwkosh Mandal

 

तापी नदीविषयीची माहिती वाचा खालील लिंकवर 

मी तापी...