शिक्षणविवेक हे उपक्रमशीलता जोपासणारे मासिक पुणे आणि पुण्याबाहेरील अनेक शाळांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत आहे. कै. दा. शं. रेणावीकर विद्यामंदिर, अहमदनगर या शाळेत दि. ५ जुलै, २०१८ रोजी चार उपक्रम घेतले गेले.
 
हस्तलिखित कार्यशाळा 
हस्तलिखित बनवायला सर्वांनाच आवडते. मात्र ते कसे बनवावे हा प्रश्न विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही असतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांना नाविन्यपूर्ण हस्तलिखित बनवता यावे यासाठी इ. ५वी ते ७ वीच्या ३०० विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११ ते १२.३० या वेळात हस्तलिखित बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षणविवेक सहसंपादक रेश्मा बाठे आणि शिल्पकार चरित्रकोशच्या सहसंपादक चित्रा नातू-वझे यांनी दीड तासाच्या कालावधीत हस्तलिखित कसे बनवावे हे विद्यार्थ्यांना सांगितले. हस्तलिखिताच्या विषयापासून, अनुक्रमणिका, चित्रे, समाप्ती चिन्ह आणि अगदी मलपृष्ठापर्यंतची सविस्तर माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. शब्दांचे वेगवेगळे आकार कसे काढावेत, मजकूर वाचनीय कसा असावा अशा विषयावर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांचे गट करून गटानुसार नियोजन करण्यात आले आणि डिसेंबर महिन्यात या हस्तलिखितांचे प्रदर्शन लावण्याचे ठरवून कार्यशाळा संपली.
 
ताणतणाव व्यवस्थापन
इ. ९वी, १०वी चे वर्ष म्हणजे अभ्यासासोबत अनेक मानसिक ताणतणाव जाणवणारे असते, हे लक्षात घेऊन शाळेतील या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी युवा विवेकचे कार्यकारी संपादक अक्षय वाटवे यांनी ‘ताण-तणाव व्यवस्थापना’ची कार्यशाळा घेतली. ओमकारापासून सुरुवात झालेल्या या कार्यशाळेत कृतीउपक्रमातून ताण-तणाव व्यवस्थापनाचे तंत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि मनापासून उत्साह दाखवला. ताण म्हणजे काय, कसा येतो त्याचे मूळ कसे शोधायचे याच्या अनेक क्लुप्त्या विद्यार्थ्यांना या वेळी देण्यात आल्या. दुपारी १२.३० ते १.३० या वेळात विद्यार्थी खरोखरच तणावमुक्त होऊन वर्गात परतले.
 
पपेट शो
इ. १ली व २ रीच्या छोट्या दोस्तांसाठी मनोरंजनातून संदेश देण्यासाठी शिक्षणविवेकने पपेट शोचे सादरीकरण केले. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे आणि शिल्पकार चरित्रकोशच्या सहसंपादक चित्रा नातू-वझे यांनी गाणी आणि गोष्टींमधून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. गाण्याच्या तालावर नाचणाऱ्या आणि संवाद बोलणाऱ्या बाहुल्या पाहून मुलांना गंमत वाटत होती. मुलांसोबत शिक्षकांनीही हा पपेट शो एन्जॉय केला. बाहुल्यांच्या संवादाला मुलांकडून तत्काळ मिळणारा प्रतिसाद यावरून पपेट शो मुलांना आवडल्याचे लक्षात येत होते. त्यानंतर वेगवेगळे पपेट्स दाखवून त्यांची माहिती देण्यात आली.
 
सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श
सध्याच्या जगात लहान मुलांनाही सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाची जाणीव व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून  इ. ३री व ४थीच्या विद्यार्थ्यांसाठी एक तासाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शिक्षणविवेकच्या सायली सहस्रबुद्धे यांनी सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श कसे ओळखावेत याचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या मदतीने समजावण्यात आले. तसेच विद्यार्थ्यासोबत काही खेळ खेळण्यात आले. यासर्व माहितीसोबतच घ्यावयाची काळजीही विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे अचूक मिळत असल्यामुळे मुलांना हा विषय कळत होता, हे लक्षात येत होते.
 
दिवसभराच्या वेगवेगळ्या सत्रात शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी स्वाती गराडे यांनी उत्तम सहकार्य केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वसावे यांनी पूर्ण वेळ सत्रात उपस्थिती दर्शविली. सुंदर नियोजन आणि उत्तम सहकार्यामुळे कै. दा. शं. रेणावीकर विद्यामंदिर, अहमदनगर शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणविवेक आयोजित उपक्रमांत मनापासून सहभागी होता आले.
 
-प्रतिनिधी