मित्रानो, 

काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला दिल्लीतल्या प्राणी आणि पक्षांबद्दल सांगितलं होतं. थोडा विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल की खूप सारे पक्षी इथे का दिसत असतील? ह्या पक्षांना इथे राहण्यासाठी,घरटी बांधण्यासाठी खूप झाडं आहेत. निदान दिल्ली शहराचा राजधानीचा भाग आहे तिथे खूप झाडं आहेत. दिल्लीचा राजधानीचा भाग ल्युटेन्स नावाच्या आर्किटेक्टने डिझाईन केला होता हे मी तुम्हाला या आधी एकदा सांगितलं होतं. या ल्युटेन्स महाशयांनी झाडांच्या लागवडीचंही प्लॅनिंग केलं होतं. दिल्ली शहराच्या ज्या भागाच्या प्लॅनिंगमध्ये ल्युटेन्स यांचं योगदान होतं ते भाग म्हणजे राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, जनपथ, कॅनॉट प्लेस, लोदी रोड. लोदी गार्डन्स ही अजूनही देशातल्या सर्वोत्तम गार्डन्सपैकी आहेत. आपण बारकाईने बघितलं तर ह्या परिसरातली झाडं ही सरळ रेषांमध्ये लावलेली आहेत. शहराच्या भागांचं डिझाईन हे जॉमेट्रिक पॅटर्नमध्ये आहे. म्हणजे रस्ते, बिल्डींग्स, झाडं यांची व्यवस्थित आखणी केलेली आहे आणि त्यामुळे अगदी विमानातूनही दिल्लीचा हा भाग सुंदर आखीव रेखीव दिसतो. दिल्लीतली झाड ही उंच आणि मोठा विस्तार असणारी आहेत. यामागे असा विचार असणार की इथलं हवामान हे टोकाचं आहे. म्हणजे उन्हाळ्यात भाजून काढणारा हिवाळा आणि थंडीत हाडं गोठवणारी थंडी. इथल्या भयंकर उन्हाळ्यात ह्या झाडांनी रस्त्यांवर आपली शीतल सावली पसरलेली असते. ह्या हिरवाईने डोळ्यांना थोडा थंडावा जाणवतो. वरचं कडक ऊन रस्त्यांवर पोचत नाही आणि रस्ते कमी तापतात. इथली झाड आपण बघितली तर सर्वसाधारणतः भारतभर आढळणारी ही झाडं आहेत. आंबा, चिंच, अर्जुन, नीम , जांभूळ , अमलताश , कदंब, बकुळी ,गुलमोहर, पिंपळ, पेरू, अंजीर, वड, अशोक, चाफा , मोह, साग, बाभळी अशी कितीतरी फळांनी आणि फुलांनी बहरणारी झाडं इथल्या रस्त्यांवर दिसतात. या झाडांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट अशी की यातली बहुतेक झाड ही सदाहरित स्वरूपाची आहेत. म्हणजे या झाडांना वर्षभर पानं असतात. त्यामुळे इथे पक्ष्याना घरटी बांधता येतात. खायला झाडांची फळं मिळतात. माकडांनाही इकडून तिकडे उड्या मारायला भरपूर स्कोप आहे ह्या झाडांमुळे. आणि खायला खाऊ आहे. आपण आपल्या देशातल्या इतर महत्वाच्या शहरांकडे पाहिलं तर याबाबतीत दिल्ली शहराचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. मुंबई, चेन्नई, कोलकाता या महानगरांमध्ये दिल्लीइतकी झाडं आपल्याला दिसत नाहीत. या सगळ्या शहरांमध्ये आता आपल्याला गाड्यांची, इमारतींची गर्दी दिसते तेव्हा दिल्लीचा हिरवा आखीव रेखीवपणा मनात भरतो. १०० वर्षांपूर्वी राजधानीचं प्लॅनिंग करताना केलेला विचार आजही महत्त्वाचा ठरला आहे. आता आपण पर्यावरण , प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की ही मोठाली झाडं किती सारा कार्बनडायॉकसाईड आपल्यात सामावून घेत असतील आणि आपल्याला ऑक्सिजन देत असतील. दिल्लीत होणाऱ्या धुळीच्या वादळांचा प्रभाव ही झाडं नक्की कमी करत असतील. हा राजधानीतला निसर्गाचा ठेवा आपण सगळ्यांनी जपला पाहिजे. 

-सुप्रिया देवस्थळी 
 
 
दिल्ली शहरातील प्राणी , पक्ष्यांविषयी माहिती वाचा खालील लिंकवर