लिली

दिंनाक: 04 Jul 2018 15:29:20


लिली हे एक आकर्षक, नाजूक फूल आहे. हे महत्त्वाचे व्यापारी फूल असून हारासाठी या फुलांना खूप मागणी आहे. त्यांची मुंबई, पुणे, नाशिक येथे लागवड केली जाते. हे कंदवर्गीय फूल असून त्याची लागवड सोपी, कमी खर्चाची आहे. लीलीत दोन मुख्य प्रकार असून आता संकरीत तिसरा प्रकारही आला आहे. १) बेल लिलीज, २) स्पायडा लिलीज, ३) टायगर लिलीज. घंटेसारखा आकार असलेला एक प्रकार. तर तुर्की टोपीसारखा आकार असलेला दुसरा प्रकार. लिलीच्या फुलात निळा वगळता अनेक तऱ्हेचे रंग आढळतात. लिलीच्या झाडाची उंची जातीनुसार कमी-जास्त असते. साधारण चार मीटरपर्यंत, तसेच फुलाच्या आकारातही थोडे वेगळेपण जाणवते. भिन्न हवामानात लिलीच्या वेगवेगळ्या जाती वाढतात. फुले देतात. मध्यम दमटसर हवामान लिलीला अधिक मानवते. त्यांचा हंगाम मे ते ऑक्टोबर असतो. सर्व प्रकारच्या लिलीच्या झाडांना मध्यम किंवा हलक्या प्रतीची व उत्तम निचरा होणारी जमीन लागते. सेंद्रिय खतांचा किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर लिलीस पोषक ठरतो.

लिलीची लागवड कंदापासून केली जाते. तो काळजीपूर्वक निवडला गेला पाहिजे. तसेच त्याची पाने, मुळे लावताना काढून टाकायला हवीत. कंद फार खोल किंवा फार वर लावू नयेत. त्याला भुसभुशीत माती + शेणखत मिसळून घालावे. कंदाच्या व्यासापेक्षा दुप्पट खोल खणून त्यात कंद लावावा. त्याच्या जमिनीची नीट मशागत करावी. कोबी, फ्लॉवरची पाने, देठ; तसेच एखादे केळीचे सालही तुकडे करून कळी येताना टाकावे.

लिलीचे कूळ लिलीएसी आहे. लिलीच्या पानांची वाढ भरभर होते. काही दिवसातच फुलांच्या जागी फळासारखी बोंड येतात. त्यात पातळ बिया असतात. पावसाळा संपायच्या आतच लिलीचं आयुष्य संपत येतं. पानं सुकून पिवळी झाली की पुन्हा कंद सुप्तावस्थेत जाऊन पुढच्या वर्षाच्या पावसाची वाट बघत लपून बसतात. हे निसर्गाचे लिलीला वरदान आहे. त्या काळात पाणी असेपर्यंत कंदात अन्नसंचय ती करते. एकेक टप्पे करताना, बियांद्वारे पुढची पिढी निर्माण करते आणि सुप्तावस्थेत म्हणजे जमिनीखाली दडून बसते.

काही लिलींना गंधच नसतो तर काहींना मंद सुगंध असतो. काही प्रकारात एका दांड्यावर एकच फूल येते तर काहीत असंख्य फुलं येतात. या फुलांचा वापर फुलदाणीत ठेवण्यासाठी केला जातो.

कांद्यासारखे लिलीचे गोडसर कंद युरोपात सॅलड म्हणून कच्चे खातात. त्यांची विशिष्ट चव व त्यामुळे सुपाला येणारा स्वाद व जरासा चिकटपणा हीच त्याची खासियत आहे आणि ही चीनमध्ये वापरतात. लिलीच्या वाळलेल्या कळ्या व फूल ते अन्नात वापरतात.

हारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिलीची शेती पुण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केली जाते. फुलं उमलायच्या आताच कळ्या तोडून त्यांचे गठ्ठे बांधून बाजारात पाठवले जातात. काही लिलींच उत्पादन हरितगृहासाठी घेतलं जातं. 

फुलं येऊन गेल्यावर पाणी तोडावं म्हणजे कमी घालावं व खतही घालू नये. मोठ्या कंदांना पहिल्या वर्षीच फुलं लागतात. बियांपासून उगवलेल्या किंवा बारीक कंदांना फुलं लागायला कधी दोन–तीन वर्षेही लागतात.

रोगांचा त्रास लिलीला विशेष होत नाही. केव्हातरीच कीटकनाशक वापरावे लागते. लिलीची झाडे दांड्यासाहित व दांड्याशिवाय दोन्ही प्रकारे काढली जातात. फुलांचा हंगाम संपल्यावर तेथेच कंदाची पूर्ण वाढ होऊ द्यावी. नंतर कंद व्यवस्थित काढून, सुकवून साठवावे.

- मीनल पटवर्धन

[email protected]  

 चाफा - भाग २