"केतकी......" मोठ्यानं हाका मारत धावतच एक नवीन ताई आली आणि दोघींची गळाभेट झाली.

"शमिका.... कधी आलीस?"

"आजच... मी घरीच गेले होते तुझ्या. काकू म्हणाली तूं इथे आहेस..."

"स्नेहल ताई, ही माझी खास मैत्रीण... शमिका..." केतकीनं स्नेहलताईबरोबर शमिकाची ओळख करून दिली.

"हं..... ते दिसतंच आहे.... खास मैत्रीण वगैरे..." स्नेहलताईनं हसून कमेंट केली.

"आम्हाला एकमेकींशिवाय अजिबात करमत नाही..." केतकी सांगू लागली. "पण काय करणार? ही दोन महिने जाऊन बसली होती तिच्या मावशीकडे...अमेरिकेला... खरंच किती दिवसांनी भेटतोय नं ......" केतकी आणि शमिका एकदम बोलल्या. 

"अगं, पण मी नियमितपणे चॅट करत होते... फोटोही पाठवत होते तिकडचे...." शमिका.

"हो गं...... त्यामुळे आपण निदान टचमध्ये तरी होतो. पण खरं सांगू.. ते व्हाॅट्सअप - फेसबुक वरचं भेटणं काही खरं नाही. कधी एकदा तुला असं भेटतेयसं झालं होतं."

"हो...मला पण असंच वाटतं...ही खरी भेट..... " स्नेहलताई मध्येच म्हणाली. "तरीसुद्धा.....आपण आभारच मानायला हवेत या नवीन टेक्नाॅलाॅजीचे.... जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो, तरी एकमेकांच्या संपर्कात राहता येतं. पूर्वी फक्त फोनवर बोलणं व्हायचं.. आतातर व्हिडिओ काॅलमुळे आपण एकमेकांना बघूपण शकतो."

"मी तर अमेरिकेला शिकायला गेलेल्या माझ्या दादाशी दर शनिवारी गप्पा मारतो." अथर्व म्हणाला.

आता स्नेहलताईनं या संभाषणात सर्वांनाच सहभागी करून घ्यायचं ठरवलं.

"तर मला आता सांगा.... या नवीन नवीन गोष्टींबद्दल कुणाला काय काय माहिती आहे?" 

"मी माझ्या अभ्यासातल्या शंका व्हाॅट्सअपवर ताईला कधीही विचारू शकते. तिला वेळ मिळाला की ती मला आॅफिसमधून उत्तर देते", सायली.

"मी माझ्या फोनवर गुगल मॅपवरून कोणताही पत्ता आजोबांना शोधून देतो. तेही माझ्याबरोबर बसून पाहात असतात. तसं मी शिकवतोसुद्धा आजोबांना..." साहीलनं काॅलर ताठ केली, स्वत:ची..

"सगळ्या प्रकारची बिलं आॅनलाईन भरण्याचं काम मी बाबांजवळ बसून शिकतोय", निखिल. 

"मला नवीन नवीन पुस्तकांची माहिती आॅनलाईन साईट्सवरून मिळते", अथर्व

"यू ट्यूबवर निरनिराळ्या प्रकारची गाणी ऐकायला खूप आवडतं.", साना

"पन्नास भक्तिगीतं - माणिक वर्मा ...लावून दिली की आजी खूश", केतकी

"नाटक, सिनेमा, प्रवासासाठी रेल्वे, विमान, बस या सगळ्यांचं बुकींग आई आॅनलाईनच करते." स्वानंदी

"क्लासममधून मला घरी जायला उशीर होणार असला तर मी लगेच आईला मेसेज टाकतो.", ईशान

"आई मला मोबाईलला हातच लावू देत नाही...." छोट्या वेदानं तक्रार केली.

"बरोबर ...तू सारखे गेम खेळत असशील...." सायलीनं ताईगिरी दाखवली.

"आणि तशीही तू लहानच आहेस अजून मोबाईल वापरायला. ८वीत गेल्यावर मग हं...", स्नेहलताई

"स्नेहलताई, हल्ली ते फेसबुक लाईव्ह का काय असतं ना, त्यावर आम्ही शनिवारी संध्याकाळी त्या ग्रेट कवी गुलजार यांची मुलाखत पाहिली. ती होती ठाण्याला, पण आम्ही घरच्या सगळ्यांनी इथे आरामात घरी बसून ती पाहिली.. ऐकली.. किती छान सोय नाही का?", निखिलनं सांगितलं.

"आणि ती फायनल क्रिकेट मॅच..? काय मज्जा आली... मी तर त्यादिवशी सगळी कामं वेळेवर आधीच पुरी करून घेतली. हो कोणी म्हणायला नको, काय मॅच बघत बसलाय........कामं कोण करणार ...?" आकाशनं आपली चतुराई वर्णन करून सांगितली.

"शाब्बास .... अगदी बरोब्बर!", स्नेहलताईनं कौतुक केलं. "कोणत्याही गोष्टींचा अतिरेक न करता, त्याचा योग्य तो वापर केला म्हणजे कोण कशाला रागावेल? या सगळ्या नवनवीन गोष्टी सर्वांनीच शिकल्या पाहिजेत, पण त्यांच्या आहारी नाही जायचं, हो किनई....

तुम्हाला सांगते, आता टी.व्ही.शिवाय आपल्या कोणाचं पानही हलत नाही. पण हा टी.व्ही. जेव्हा सुरू झाला ना, तेव्हा याला अनेकजण इडियट बाॅक्स म्हणून हिणवायचे. 'टी.व्ही. हा शाप का वरदान?' असे निबंधही लिहायचो आम्ही शाळेत. पण मला माझ्या आई बाबांनी एकच सांगितलं होतं, टी.व्ही.चा रिमोट आपल्या हातात आहे ना, मग तो शाप का वरदान हे ठरवणंही आपल्याच हातात आहे. त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि मीही त्याचा गैरफायदा घेतला नाही. त्यामुळे अगदी दहावी-बारावीच्या वर्षांमध्ये सुद्धा टी.व्ही. बघणं, संध्याकाळी दहा-पंधरा मिनिटं मोकळ्या हवेत वाॅक घेणं, आठवड्यातून एकदा डान्स क्लासला जाणं... हे सगळं नियमितपणे चालू ठेवलं होतं. नाहीतरी नुसता अभ्यास एके अभ्यास करून कंटाळाच येतो नं.....

तर सांगत काय होते...... हं....तर याच इडियट बाॅक्सनं सगळं जग जवळ आणलं. निरनिराळ्या देशांना एकमेकांच्या भाषेची, संस्कृतीची, कौशल्याची ओळख करून दिली. ज्ञानाच्या, कलांच्या कक्षा रुंदावल्या. आपल्या कलाकारांना, चित्रपटांना साऱ्या जगाची दारं उघडली. तर नेहमी लक्षात काय ठेवायचं?

कोणतीही गोष्ट मुळात वाईट नसतेच मुळी. तिचा उपयोग आपण कसा, किती, कोणत्या कारणासाठी करतो ते महत्त्वाचं. मग तो मोबाईल असो नाहीतर इंटरनेट असो."

"पण हे आई-बाबांना कोण सांगणार?", नेहा सायलीच्या कानात पुटपुटली.

"हं...हं.... ऐकलं बरं का मी", स्नेहलताईनं लगेच टोकलं नेहाला.

"घरच्यांच्या मनात तो विश्वास तुम्ही निर्माण करायचा.... आपल्या वागण्यानं. मग कशाला कुणी बोलेल उगाच. त्यांनाही तुमची काळजी असतेच ना."

"हो ताई, अगदी पटलं... आता हेच बघ ना. आम्ही रोज इथे येतो, खेळतो, हसतो, मित्रमैत्रिणींना भेटतो. आणि इकडे तिकडे टाईमपास न करता पुन्हा वेळेत घरी जातो. त्यामुळे रोज इथे यायला कुणीच अडवत नाही आम्हाला.", केतकी म्हणाली.

"पण कोणतीही गोष्ट केवळ अनुकरणानं, यानं केली म्हणून मी केली असं करायचं नाही. त्यामागचं कारण समजून आणि आपल्या मनाला पटली तरच करायची. ....

आता ज्येष्ठ महिना चालू आहे ना.... ज्येष्ठ पौर्णिमेला काय म्हणतात? "

"वटपौर्णिमा......." शमिका. ती देखील आज रमून गेली आज पहिल्यांदाच आली होती तरी.

"हो.... त्यादिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात ना. सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगितलीय आजीनं." सायली म्हणाली.

"हो ना ? ....." स्नेहलताई म्हणाली. ".... त्यामागचा विचार चांगलाच आहे. तुमच्या आजीच्या अगोदरच्या काळात, त्यांना अशा निमित्तानं रोजच्या कामातून जरा बदल म्हणून बायकांना घराबाहेर, निसर्गाच्या सान्निध्यात मैत्रिणींबरोबर जायला मिळायचं. मोठ्या वडाच्या झाडाची पूजा करायच्या, गाणी म्हणायच्या, थोडं मन रमवायच्या. तुमच्या आईच्या काळात, त्यांनी पण नोकरी - घरांतलं सारं सांभाळून रीती सांभाळायचा प्रयत्न केला. पण आता काय करतो आपण......वडाच्या झाडापर्यंत जायला वेळ नाही म्हणून, त्या झाडालाच तोडून आपण घरात आणतो पूजा करायला. किती हास्यास्पद आहे हे. मूळ विचारालाच तिलांजली दिली जाते.... म्हणजे सोडचिठ्ठी दिली जाते. म्हणजे .....ते विचार सोडून दिले जातात."

"मग अशा वेळी काय करायला हवं ताई?"

"अगं, नुसती झाडाची पूजा करायची ... हेच लक्षात ठेवून कसं चालेल? सावित्रीसारखं हुशार, हजरजबाबी, प्रेमळ कसं होता येईल हे पाहायचं. निसर्गाचं जतन करायचं तर त्या दिवशी नवीन झाड लावलं, त्याची देखभाल करून वाढवलं, तर तेसुद्धा एक प्रकारे व्रत केल्यासारखंच होईल की नाही. नुसत्या आंधळेपणानं चालीरीती जपण्यापेक्षा अशी आधुनिक व्रतवैकल्यं स्वीकारली, तर चांगलं नाही का?" स्नेहलताई.

"आज आपण काय खेळ खेळायचा ताई?", वेदानं आठवण करून दिली.

"काय बरं चालेल .....?", ताईनं विचारताच केतकी म्हणाली,

"सांगा सांगा..... लवकर सांगा ....काही शहरांची नावं सांगा....." 

त्यावर स्नेहलताईनं एक अट घातली...." त्या नावात शेवटी ...पूर असलं पाहिजे. चला... सांगा "

सगळ्यांनी ठेका धरला.

कोल्हापूर......सोलापूर......पंढरपूर........तुळजापूर.......गाणगापूर.........विजापूर.......

नागपूर.......चंद्रपूर......खरगपूर....... शनिशिंगणापूर.......कानपूर.......जबलपूर....

जयपूर.......जोधपूर.......उदयपूर......पालनपूर....रामपूर..........रुद्रपूर.......नरसिंहपूर........ रहिमतपूर........गोरखपूर .........छत्रपूर........रायपूर........बिलासपूर.......नारायणपूर ....... दर्यापूर ........गंगापूर .........डुंगरपूर....... 

नावांची झुकझुकगाडी सबंध भारतभर फिरून आली.

-मधुवंती पेठे

[email protected]

 लेख ४ - सांग ना स्नेहलताई