नमस्कार मित्रहो, आपण एका नव्या मालिकेची सुरुवात करत आहोत, या मालिकेचा विषयसुद्धा फारच मनोरंजक आणि चित्तथरारक अनुभवांनी भरलेला आहे. आपण या मालिकेत जाणून घेणार आहोत, “अवकाश स्पर्धा” या विषयाबद्दल, ज्या विषयाने एकंदरच मनुष्य आणि विज्ञान यांच्या प्रगतीत फार जास्त मोलाचा हातभार लावला आहे आणि आज आपण वापरणारी अनेक यंत्रे, उपकरणे यांचे मूळ सुद्धा यातच दडलेले आहे. चला तर मग सुरू करूयात एका रोमहर्षक सफारीला!

या स्पर्धेची सुरुवात तशी फार वर्षापूर्वीच झालेली, जेव्हा चीनी लोकांनी ११ व्या शतकात प्राथमिक स्वरूपातील रॉकेट बनवायला सुरुवात केलेली. त्यानंतर मात्र यामध्ये फार काही प्रगती झाली नाही, पण ही रॉकेट युद्धासाठी प्रामुख्याने वापरली जात. नंतर थेट १७ जुलै १९२९ साली रॉबर्ट गोद्दार्ड यांनी रॉकेटवर दाबमापक आणि कॅमेरा ही उपकरणे लावून ते अवकाशात सोडले. त्यानंतर जर्मनीने ३ ऑक्टोबर १९४२ साली पहिली बॅलीस्टिक मिसाईल V-२ टेस्ट केली. त्यानंतर मात्र दुसरे महायुद्ध आणि त्याचे परिणाम याचा अवकाश स्पर्धेवर फार मोठा परिणाम झाला. द्वितीय महायुद्धात जर्मनीचा पाडाव झाला आणि तिथले काही वैज्ञानिक अमेरिकेत पळून आले. त्यातच वेर्न्हर वोन ब्रन हा आणि त्याचे इतर सहा रॉकेट वैज्ञानिक मित्रसुद्धा होते. अमेरिकेने त्यांना राजाश्रय दिला आणि त्यांना सर्व प्रकारचे संशोधन करण्याची मुभा दिली. तर तिकडे सोव्हियत रशियात सेरगी कोरोलेव याने तत्कालीन सुरक्षामंत्री यांना एक प्रबंध सादर केला आणि इतर देशसुद्धा या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत आणि अवकाशात उपग्रह सोडणे हे आता या स्पर्धेचा फार जास्त महत्त्वाचा टप्पा आहे हे त्यांना पटवून दिले आणि अशा प्रकारे अमेरिका, रशिया यांच्यात अवकाश स्पर्धा सुरू झाली!

यामध्येच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहोवर यांनी अमेरिका १९५७ च्या जागतिक भौगोलिकदिनाच्या निमित्ताने पहिला उपग्रह आकाशात सोडेल अशी घोषणा केली आणि मग या अवकाश स्पर्धेने अधिकच जोर घेतला. रशियाला ही बातमी पोहोचताच त्यांनी आपली तयारी वाढवायला सुरुवात केली आणि पहिला उपग्रह “Object-D” उमा नावाचा R-7 या तीन टप्प्यातील रॉकेटच्या साहाय्याने आकाशात न्यायची तयारी सुरू केली. इकडे अमेरिकेने सुद्धा आपली प्रायोगिक उड्डाणे आणि त्यांचे परीक्षण करायला सुरुवात केली. परंतु महायुद्धामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेले हे देश, आपली रॉकेट आणि इतर प्रणाली तपासताना त्यांच्या ध्येयापासून मागे पडले आणि असे होताना १९५७ साल उजाडले.

मध्यंतरीच्या काळात अनेक रॉकेट आणि इतर प्रणाली यांचे परीक्षण झालेले होते. तरीसुद्धा मानवाला त्याचा पहिला उपग्रह सापडला नव्हता. तसेच उपग्रहाची कक्षा, त्याला पाठवण्यात येणारे संदेश आणि इतर अनेक गोष्टीसुद्धा मागे पडत चालल्या होत्या. आता मात्र अमेरिका आपल्या आधीच उपग्रह आकाशात सोडेल की काय या भीतीने, रशियाने एप्रिल-मे १९५७ च्या दरम्यान उपग्रह तयार करून तो आकाशात सोडायचे नक्की केले आणि मग जोरदार तयारीला सुद्धा लागले.

आणि शेवटी तो दिवस उजाडला, तो दिवस होता, ४ ऑक्टोबर १९५७! रशियाने मोठा उपग्रह आणि त्याच्यासोबत वैज्ञानिक उपकरणे हे सर्व रद्द करून फक्त १०० किलो वजनी आणि पृथ्वीवर रेडियो लहरी वापरून कुठूनही या उपग्रहाचा “बीप-बीप” असा आवाज ऐकता येईल असा लहान असा उपग्रह निश्चित केला. ४ ऑक्टोबर १९५७ ला साधारण ७ वाजता स्पुतनिक या उपग्रहाला घेऊन अवकाश यान झेपावले आणि त्यानंतर मग पृथ्वीवरील सर्वांनी या उपग्रहाचा आवाज ऐकला! त्यात काही ठिकाणी भीती होती तर काही ठिकाणी फार जास्त उत्साह! हाच तो मानवाच्या इतिहासातील क्षण ठरला ज्याने मानवी जीवन संपूर्णतः बदलून टाकले !

तर मित्रहो, ही होती स्पुतनिक-१ या मानवनिर्मित पहिल्यावहिल्या उपग्रहाची कथा! पुढील भागात आपण पाहूयात याच स्पर्धेतील पुढील पाउल, तोपर्यंत “बीप- बीप”, म्हणजेच स्पुतनिकच्या भाषेत बाय बाय!!!

-अक्षय भिडे

[email protected]