शुरा मी वंदिले

दिंनाक: 26 Jul 2018 14:45:51


मुंबईचाच हा मर्द मराठा! किंग जॉर्ज शाळेच्या पुण्यभूमीत घडलेला, वाढलेला आणि आज तरुणांना प्रेरणा देत पुतळ्याच्या रूपाने उभा असलेला नरवीर मेजर रमेश दडकर. शाळेच्या महाविद्यालयाच्या तालमीत तयार होताना एन.सी.सी.मध्ये नेमबाजीत पंडित नेहरूंच्या हस्ते ‘केन ऑफ ऑनर’मिळवणारा तू, तुझा नेमच होता सैन्यात जाऊन मातृभूमीकडे वाकड्या नजरेने बघणार्‍यांची गचांडी पिरगाळण्याचा. पदवीधर होताच तू वाट धरलीस डेहराडूनच्या इंडियन मिलटरीच्या अॅकॅडमीची. प्रशिक्षणानंतर मराठा लाईट इंन्फ्ट्रीमध्ये कमिशन मिळवून येताच १९६५ चे समरांगण; तुझी जणू वाट पाहत होते. वयाच्या २३ व्या वर्षी रणधुरंधर लेफ्टनंट दिलीप गुप्ते या आपल्या सहकारी मित्राकडून तू दिक्षा घेतलीस ती प्राणपणाने लढताना देशासाठी हौतात्म्य पत्करण्याची. १९६५च्या युद्घात तू रणांगणावर समशेर गाजवत पाकिस्तानी फौजेला पळता भुई थोडी केलीस, म्हणून तुला जनरल जयंत चौधरींनी स्वतः आर्मी मेडलने अलंकृत केले.

सुट्टीवर आलेला तू कुटुंबांबरोबर चार दिवस मजेत घालवून आला असताना शिपाईगिरी करणार्‍याच्या आयुष्याचे सोने करणारा दिवस १३ नोव्हेंबर १९७९ ठरला. युद्धाच्या तुतारीने तुला साथ दिली आणि तू निघालास ते थेट जेस्स्फेर या सीमावर्ती रणांगणाकडे .२१ नोव्हेंबर या दिवशी मेजर रमेश दडकर हा रूबाबदार मुंबईकर आपल्या मर्द मराठ्यांच्या तुकडीचे नेतृत्त्व करत पार पाकिस्तानी मुलखात वावटळीप्रमाणे सुसाट घुसत गनिमांवर आदळला. एका झटक्यात त्यांनी १३ पाकी रणगाडे व ३ सेबरनेटना कंठस्नान घालत मुसंडी मारली. खरेतर युद्धाची घोषणा झाली नव्हती, म्हणून सबूरीने वागणार्‍या हिंदूस्थानी फौजेची पाकी जनरल याह्या खान व टिक्का खान सत्त्वपरीक्षा पाहत होते.

प्रत्येक हिंदुस्थानी सैनिकाचा हौसला बुलंद करत मेजर रमेश सीमावर्ती भागात सिंहाच्या बेदरकारपणाने लढत होता. अचानक त्यांच्या फौजी दस्त्यावर एकबॉम्बशेल आदळला आणि आमचा रणगाजी मेजर रमेश धाराशाही झाला.आणखी एक मराठा मर्द ‘जीवन पुष्प चढाने निकले।माताके चरणों में हम।भारत वंदे मातरम्’म्हणून अनंतात विलीन झाला.

- कॅप्टन विनायक अभ्यंकर

[email protected]