प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून दैनंदिन अध्ययन अध्यापनाला साहित्याची जोड दिली तर प्रत्येक मूल त्याची निश्चित केलेली किमान अध्ययन क्षमता नक्कीच गाठू शकेल हा दृढ विश्वास आहे.

माझ्याकडे सलग दोन वर्ष पहिलीचा वर्ग देण्यात आला. पहिल्याचवर्षी मनाशी अगदी पक्के ठरवले होते की, माझ्या पहिलीच्या वर्गात असणारे एकही मूल अप्रगत राहता कामा नये आणि त्या दृष्टीनेमाझ्या प्रयत्नांना सुरुवात झाली. याच दरम्यान ज्ञानरचानावादाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली होती. मीही मुलांची बौद्धिक क्षमता, त्यांचा कल, आवड लक्षात घेऊन ज्ञानरचनावादावर आधारित साहित्याची निर्मिती करत गेले आणि त्याचा पुरेपूर वापर पहिलीच्या वर्गासाठी केला. तयार केलेले साहित्य मुलांना जास्तीत जास्त हाताळायला दिले. गट पद्धतीचा वापर करून गटात साहित्य वापरावयास दिले. स्वतः मुलांच्या गटात बसून त्यांना अवघड वाटणाऱ्या संकल्पना साहित्याच्या मदतीने सोप्या करून सांगितल्या. परिणामी, पहिलीची भांबावलेली, घाबरलेली, आईपासून पहिल्यांदाच दुरावलेली मुलं शाळेत रमू लागली. शिक्षकांविषयी त्यांच्या मनात असणारी भीती दूर पळाली. शिक्षकांशी खुल्या मनाने ती संवाद साधू लागली. शाळेविषयी त्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण झाली. शाळा आणि शिक्षक त्यांना त्यांचेच वाटू लागले. ज्ञानरचनावादाची हीच तर खरी गंमत आहे. या पद्धतीने मुलं फक्त लिहायला आणि वाचायला शिकतात असे नाही तर त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची, संस्कारांची रुजवणूक आपसूकच होत जाते. शेवटी फक्त लिहिणे-वाचणे म्हणजे शिक्षण असू शकत नाही.

बदल हा काळाचा नियम आहे. काळ बदलत आहे आणि काळाप्रमाणे शाळेत, शिकवण्याच्या पद्धतीत, शिक्षकांमध्ये, मुलांमध्ये आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विचारांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. तरच या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा एका वटवृक्षाप्रमाणे आपले अस्तित्व वर्षानुवर्षे टिकवून राहू शकतील. जेव्हा या विशाल वटवृक्षाच्या सावलीत शिकून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी आयुष्याच्या प्रत्येक कसोटीवर खरा उतरेल तेव्हाच या जिल्हा परिषदेच्या शाळा या ‘माणूस’ बनवण्याचे केंद्र म्हणून नावारूपाला येतील आणि या शाळेत शिकवणारा प्राथमिक शिक्षक हा या केंद्राचा केंद्रबिंदू ठरेल.

गेली सलग दोन वर्ष मी वापरत असलेल्या ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापरामुळे दोन्ही वर्षी माझा पाहिलीचा वर्ग १००% प्रगत आहे. मुलांची गरज लक्षात घेऊन त्यांच्याकडून जे अपेक्षित आहे ते मिळवण्यासाठी साहित्य निर्मिती करत राहते. त्याकामी मी बऱ्याचवेळेस मुलांचीच मदत घेते. ज्ञानरचनावादाला तंत्रज्ञानाची जोड देऊन शाळेत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची, शैक्षणिक साहित्यांची माहिती सर्वांना होण्यासाठी शैक्षणिक ब्लॉग निर्मिती (उंच माझा झोका) केली आहे. स्वनिर्मित व्हिडीओ तयार केले असून यु ट्यूबच्या माध्यामातून ते पालक, विद्यार्थी, शिक्षक याच्यापर्यंत पोहोचवले जातात.

माझ्या शाळेतील मुलांना सोबत घेऊन नवीन वाटा, नवीन क्षितीज शोधण्याच्या या माझा प्रयत्नांना बऱ्याच अंशी यश मिळाले आहे. या चिमुकल्यांसोबत असेच पुढे पुढे जात राहायचे आहे.

-वनिता मल्हारी मोरे(उपशिक्षिका)

जि. प. शाळा खेराडे विटा ता- कडेगाव जि- सांगली

[email protected]