पुरणपोळी

दिंनाक: 24 Jul 2018 14:58:04


आपल्याला जर प्रश्न विचारला की, "तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो किंवा कोणते पदार्थ आवडतात?" तर प्रत्येकाचं काही ना काही उत्तरं तयार असतील हो नं? उत्तर दिलं आणि तो पदार्थ खायला मिळाला तर बहारच नाही का? आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे क्षण अनुभवले असतील, कारण आपण नाव काढलं की आपली आई, काकू, आज्जी असे पदार्थ लगेच बनवून देतात.

'पुरणपोळी' ही शॉर्टफिल्म आहे, अशाच एका आवडीच्या पदार्थाची. या फिल्ममधल्या छोट्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते. पण त्याची आई मात्र त्याला त्याच्या आवडीची पुरणपोळी बनवून देऊ शकत नाहीये. कारण आहे घरची गरीब परिस्थिती. ज्या घरात दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे, तिथे पुरणपोळी कुठून येणार? पण म्हणतात ना ज्याचा कुणी नसतो त्याचा देव असतो. मग एक निम्मित चालून येतं, पुरणपोळी खाण्याचं. गावातल्या पाटलाच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. आता पूजा म्हंटल की, केळीची पानं/खांब आले, विड्याची पानं आली, पूजेसाठी लागणारी सगळी सामग्री आली, प्रसादासाठी वेगवेगळं किराणा सामान आलं. आता हे सगळं सामान आणून द्यायचं काम करतोय, या शॉर्टफिल्ममधल्या लहान मुलाचा भाऊ. त्या मुलाचा भाऊ हे सगळं सामान आणून देणार, सत्यनारायण पूजा व्यवस्थित पार पडणार आणि संध्याकाळी पुरणपोळीच्या जेवणासाठी आपल्याला पाटलांकडून निमंत्रण येणार अशी स्वप्नं हा लहान मुलगा रंगवतोय. आपण जे सामान पाटलांना आणून देणार आहोत, त्याचे पैसेदेखील घेऊ नकोस असं तो भावाला सतत सांगतोय, जेणेकरून पाटलीणबाई पोटभर पुरणपोळी खाऊ घालतील, असं या मुलाला वाटतंय. जसा पूजेचा दिवस उजाडतोय, तसं पुरणपोळी खाण्याची इच्छा या मुलाला स्वस्थ बसू देत नाहीये.

पूजेचा दिवस उजाडतो, पूजा पार पडते. मग पुढे काय होतं? शॉर्टफिल्ममधल्या लहान मुलाची पुरणपोळी खाण्याची इच्छा पूर्ण होते की नाही? या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष शॉर्टफिल्म पाहूनच मिळवा.

या शॉर्टफिल्ममधून बोध घेण्यासारखं काय आहे, तर आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल सतत कृतज्ञता बाळगा. आपल्याला जे फार कमी वाटतं तेवढंही काही जणांच्या नशिबी नसतं याची जाणीव सतत मनी ठेवा. शॉर्टफिल्म कशी वाटली? नक्की कळवा. तुम्ही शॉर्टफिल्म खालील लिंकवर क्लीक करून पाहू शकता.

 
सौजन्य - यु ट्युब
 
-भाग्यश्री भोसेकर 
 
 
 
आपल्या छोट्याशा कृतीने जर का कोणाला आनंद होणार असेल तर ती कृती नक्की करा हे सांगणारी शॉर्टफिल्म