शिक्षणविवेकचा उपक्रम, भातलावणीचा. निसर्गातही आपल्या स्वतःचे व्यक्तिमत्व विकास होण्यासाठीचे अनेक पैलू दडलेले असतात हे विद्यार्थ्यांना उलगडले. विद्यार्थ्यांनी हा दिवस खरोखरीच ‘स्वतःसाठी’ अनुभवला. न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, म.ए.सो. मुलांचे भावे हायस्कूल, विमलाबाई गरवारे प्रशाला, नु.म.वि. मुलांची शाळा या शाळांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.

‘मला एक सुंदर अनुभव मिळावा’, या विचाराने शिक्षणविवेकच्या उपक्रमांत सहभागी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक अविस्मरणीय अनुभव घेऊन परतले. सकाळी ७.३० ला सुरू झालेल्या या उपक्रमात शिक्षणविवेक टीमसोबत विद्यार्थी, शिक्षक आणि काही पालकही सहभागी झाले. वाटेत न्याहारी करून भातलावणीसाठी सज्ज असलेले सर्वजण ससेवाडी येथे पोहोचले. विठ्ठल वाडकर आणि तुषार वाडकर या दोन शेतकऱ्यांनी आदल्या दिवशीपासून जोरात तयारी करून भाताचे खाचर तयार करून ठेवले होते. थोडावेळ विश्रांती घेऊन विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले. विठ्ठल वाडकर आणि तुषार वाडकर यांच्या शेतात दोन्ही गट निघाले. मुलांना चिखलातून चालणे सुरुवातीला थोडेसे कठीण जात होते. शिवाय बाजूने गाय किंवा म्हैस यांसारख्या जनावरांचा कळप जाई. एखाद्या घरातील कुत्रे नवीन माणसांना बघून जोरजोरात भुंकत होते. बऱ्याच जणांना हे सर्व नवीन होते. भाताच्या खाचरात गेल्यावर तिथे आमच्या आधीच एक-एक टीम आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार होती. ज्यांचे शेत होते, त्या विठ्ठल वाडकर आणि तुषार वाडकर यांच्या नातेवाईकांनी संपूर्ण भातलागवड करताना मार्गदर्शन केले.

गुडघाभर पाण्यात प्रत्यक्ष उतरणे काहीजणांना जिकीरीचे वाटत होते. एकमेकांचा आधार घेऊन हळूहळू सर्वजण खाचरात उतरले. विठ्ठल वाडकर यांनी भाताच्या रोपाच्या मुठी कशा तयार करून ठेवल्या, हे सांगितले. मुठी तयार करण्यासाठी कोणते बीज वापरतात, त्याचे रोप होण्याची प्रक्रिया, लागणारा पाऊस, कालावधी या सर्वांची सविस्तर माहिती या वेळी मिळाली. लावणी करतानाची दोरी, त्याच्या चिमण्या (खुणा) यांची माहिती दिल्यानंतर खाचरात दोरी धरण्यात आली. दोरीच्या पाठीमागे सर्वजण आडवी रांग करून उभे राहिले. प्रत्येकाच्या हातात एकेक मुठ (रोपाची पेंडी) होती. प्रत्येक चिमणी समोर तीन-चार रोप खोचण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. लावणीला सुरुवात झाली. रोप खोचून झाल्यावर एक पाउल मागे जायचे आणि पुढचे रोप लावायला तयार राहायचे तेही गुडघाभर चिखलात उभे राहून. बापरे... मोठी कसरतच होती. सोबतीला असलेले शेतकरी भरभर त्यांचे काम करून रिकामे होत होते. ‘पोराओ उरका...’ असे सांगत होते. आपले रोप नीट लागेल याची दक्षता घेत सर्वजण मनापासून लावणी करत होते. सोबतचे शेतकरी पुन्हा-पुन्हा रोप खोचण्याची पद्धती सांगत होते.

तिकडे तुषार वाडकर यांचे वडील शेतात ट्रॅक्टर फिरवत होते. काही मुलींनी प्रत्यक्ष ट्रॅक्टर पहिल्यांदाच पहिला होता. रोपाच्या बांधून ठेवलेल्या मुठी टोपलीत भरून डोक्यावर घेऊन जाण्याची मजा काही औरच होती. कपड्याची चुंबळ, त्यावर टोपली आणि टोपलीत भाताची रोपे. फोटो काढण्याचा मोह काही आवरत नव्हता. वरून पाऊस पडत असूनही सर्वजण खाचरात उतरले. काही मुलांनी शेतात मारण्याचे औषध टोपलीत भरून आणले. शेतात सर्व ठिकाणी भिरकावले. त्यांच्या सोबत असलेले काका त्यांना औषध भिरकावण्याची पद्धती सांगत होते. मुलांना मोठी गम्मत वाटत होती. तोपर्यंत एकीकडे दोरी धरण्यात आली व लावणीला सुरुवात झाली. तुषार वाडकर यांच्या वडिलांनी गाणी म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या तालावर सर्वांनी गाणी म्हटली. शेताचे वर्णन, गावाकडे वापरले जाणारे शब्द ऐकून ते शब्द तस्सेच्या तस्से उच्चारण्याचा प्रयत्न सर्वजण करत होते. जवळजवळ दिड वाजेपर्यंत दोन्ही गटांनी एक-एक शेत लावून पूर्ण केले. दोन्ही गटांना ‘उत्तम लावणी केल्याची’ पावती मिळाली.

सर्वांना भूक लागल्याची जाणीव होत होती. हातपाय धुवून गावातील एका मंदिरात सर्वांनी भोजन केले. जेवणानंतर काहीजण आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी भटकायला गेले, काहींनी छान छान ‘सेल्फी’ काढले. तीनच्या सुमारास सर्वजण परत मंदिरात एकत्र जमले. विठ्ठल वाडकर यांनी पूर्ण तांदूळ बनण्याची प्रक्रिया सांगितली. आपल्याला सहज दिसणारा तांदूळ तयार होताना त्यामागे किती कष्ट असतात, हे वाडकर यांनी सांगितले. मुलांनी छान मदत केल्यामुळे शिक्षणविवेकचे आभार मानून पुढील वर्षीही येण्याचे निमंत्रण वाडकर यांनी दिले. सोबत असलेल्या पालकांनी आणि शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. नवीन अनुभव मिळाल्याबद्दल शिक्षणविवेकचे आभार मानले. ‘ही सहल नसून हा एक स्वानुभव होता’ असे या वेळी शिक्षकांनी आवर्जून सांगितले. मुलांनीही आपली मनोगते व्यक्त केली. स्वतःची शेती असूनही त्यात असणाऱ्या  कष्टाची आज खरोखर जाणीव झाली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. शिक्षणविवेक कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी मुलांशी संवाद साधला. मुलांनी स्वतःच्या भाषेत हा अनुभव लिहून शिक्षणविवेकला पाठवावा, असेही त्यांनी सांगितले. विठ्ठल वाडकर आणि  तुषार वाडकर यांना श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. डोंगराचा परिसर, भाताची लावणी, केलेली मजा मस्ती, सोबत असलेले शेतकरी या सर्व गोष्टी मनात साठवत खरोखरच हा दिवस ‘स्वतःसाठी’ घालवल्याचा आनंद घेत सायंकाळी ५.३० पर्यंत सर्वजण घरी परतले.

भातलावणी करतानाची काही छायाचित्रे:


 

-रुपाली निरगुडे

[email protected]