लहान मुलांचे भावविश्व खूप वेगळे असते. आपल्याला ते जाणून उमजून घेणे फार गरजेचे असते. जर आपण ते समजून घेतले तरच त्यांचे बालपण कोमेजून जाण्याऐवजी अबाधित राहील, असे वाटते. आपल्याकडे मुलांच्या जन्मांसोबतच त्यांच्या शाळेचा विचार चालू झालेला असतो. पण या सगळ्याचा विचार करत असताना ती केवळ छोटी मुलेच आहेत; याचा मात्र आपल्याला विसर पडतो. एखाद्या रोबोसारखे मुलांना वागवले जाते. कदाचित आता चालू असलेली जीवघेणी स्पर्धाही या गोष्टीला तितकीच जबाबदार असू शकते, पण आपण आपल्या पाल्याचे बालपण कसे सुरक्षित राहील याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. 
 
अडीच-तीन वर्षाच्या मुलांचा विकास हळूहळू होत असतो. पहिल्या पाच वर्षात मुलांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडतात. या वयात त्यांचे स्वत:वर जास्त नियंत्रण नसते. त्यामुळे अपरिचित व्यक्ती किंवा मुले यांच्यामध्ये तीन-चार तास घालविणे त्यांच्यासाठी कठीण जाते. याचा नकारात्मक परिणाम मुलांवर दिसून येतो. एक प्रकारचा तणाव त्यांच्यात निर्माण होऊन ती चिडचिडी बनू शकतात. त्यांना स्वत:ला सांभाळणे जिथे कठीण असते; तिथे पाठीवरच्या बॅगचे, हातातील बॉटलचे ओझे कसे सांभाळू शकतील. पण हे ओझं लादलं जातं आणि मग त्या ओझ्याखाली त्यांचे बालपणही दाबले जाते.
 
मुलांसाठी त्यांचे घर हेच त्यांची पहिली शाळा आणि आई-वडील हेच त्यांचे पहिले गुरू ठरावेत, हे अधिक योग्य आहे. शिकण्याच्या दृष्टीने त्यांचे पहिले पाऊल हे घरातूनच पडायला हवे. एखाद्या चित्रांतून किंवा कृतीमधून मुलांना गोष्टी समजावून सांगणे तितकेसे कठीण नसते. उलट अशा समजावण्याने मुलांना गोष्टी लवकर उमजायला मदत होते. छोट्या मुलांची निरीक्षण क्षमता अधिक जास्त असते, त्यामुळेच मुले अनेक गोष्टींचे अनुकरण लगेच करतात. म्हणूनच आपलय वागण्यावर  अधिक लक्ष ठेवणे गरजेचे असते.
 
तीन ते चार वर्ष वयाच्या कालवधीत मुलांना मनसोक्त खेळू द्यावे. आजूबाजूचा परिसर, व्यक्ती समजावून घेण्यासाठी मदत करावी. पण या वयात अश्या अनेक गोष्टींपासून दूर राहून शाळेत जाताना अनेक वेगवेगळ्या अनाकलनीय गोष्टींचा मारा त्यांच्या बालमनावर होतो आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ  मुलांवर होत राहतो. छोट्या मुलांना नकार पचवणे अवघड जाते, अशा वेळी मुले आक्रमक होऊ शकतात. त्यांची काळजी घेत त्यांना समजावणे खूप कठीण असते आणि हे काम घरातील व्यक्तीच अधिक चांगल्या रितीने करू शकतात. मुलांच्या जडणघडणीचा मूळ पाया, आधारस्तंभ हे तर मुलांचे घरच असू शकते.
 
सहा वर्षापर्यंत मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्ण झालेला असतो. या वयात गोष्टी समजून घेणे मुलांना सोपे जाते.
 
१) मुलांना आपल्या आजूबाजूचे वातावरण अनोळखी वाटत नाही. एखादी गोष्ट नाही समजली किंवा पसंत पडली नाही  तर त्या गोष्टीवर त्यांना प्रतिक्रिया देता येऊ शकते.
 
२) मुलांची आकलन क्षमता या वयात वाढलेली असते, त्यामुळे एखादी गोष्ट ग्रहण करणे अवघड नाही जात.
 
३) आरोग्याची किंवा इतर काही तक्रार असेल, तर ती सांगण्याइतपत समज मुलांच्यात या वयात आलेली असते.
 
४) तीन तासांपेक्षा जास्त वेळ घराबाहेर राहण्याची म्हणजे शाळेत थांबण्याची त्यांची मानसिक तयारी झालेली असते.
 
५) नवनवीन वस्तू, पदार्थ, लोक यांसारख्या अनेक गोष्टी समजून घेण्याची आकलन शक्ती त्यांच्यात निर्माण झालेली असते.
 
 ६) एकूणच समज निर्माण होण्याचा, बाहेर जग समजून घेण्याला या काळात सुरुवात होते. 
 
म्हणूनच थोडी समज आल्यावर मुलांना शाळेत घालणे मुलांच्या हिताचे ठरू शकते.
लहान मुलांच्या निरागस विश्वात आपल्याला डोकावता यायला हवं, तर आणि तरच त्यांचा विकास आपण साधू शकू. 
 
 
-सुचिता घोरपडे