सरदार

दिंनाक: 20 Jul 2018 15:01:27


वाचक मित्रहो, ही गोष्ट तुम्ही वाचा आणि वाचून मनात काय काय विचार येतात ते लिहून ठेवा आणि आम्हाला कळवा.          

एक छोटे खेडेगाव. गावात राहात होते कितीतरी गावकरी. दिवसभर पुरुष माणसे कामासाठी बाहेर जात. संध्याकाळी घराकडे परतत आणि मुला-बाळांबरोबर गप्पाटप्पा करत आनंदाने राहात. गावाबाहेर घनदाट फांद्या असलेला एक भला मोठा वृक्ष. त्या वृक्षाला जेव्हा तांबूस कोवळी पाने फुटत तेव्हा बायका त्या पानांची भाजी करीत आणि ती भाजी सारेजण आवडीने खात. त्यानंतर जेव्हा त्या झाडाला फळं धरत, तेव्हा मुलांना केवढा आनंद होई. फळं पिकू लागताच मुलं झालीच हजार झाडाखाली. कोणी झाडावर चढतंय, कोणी खाली उभं राहून फळं गोळा करतंय. खायची इच्छा तृप्त होईपर्यंत पोरं फळं खात आणि खिसे भरून घरी घेऊन जात.

गावापासून दूर एक वन. वनात अनेक पशू, रंगीबेरंगी पक्षी आणि एक टोळी वानरांची. मधूनच वानरांची टोळी गावात जाई आणि तिथे काहीतरी उपद्व्याप करून ठेवी. गावकरी काठ्यांनी त्यांना पिटाळून लावत. पण जाता जाता केळी, मुळे, ऊस असं मिळेल ते पळवायला ते विसरत नसत.

वानरांना त्या फळाच्या झाडाचा वास आला. तेही झाडावर लक्ष ठेवू लागले. फळं पिकतात न पिकतात तोच वानरदल सर्व फळे स्वाहा करू लागली. मुळचीच चलाख वानरं, बरोब्बर पुरुष कामाला गेले की झाडावर हल्ला करत. बिचारी मुलं... काहीच करू शकत नसत. त्यांची आवडती फळं वानरं खाऊन टाकताना दु:खी नजरेने बघत बसत.

त्रासून गावाच्या पाटलाने झाडाखाली पहाऱ्याला एका माणसाला बसवलं. आता वानरांची पंचाईत झाली. झाडाजवळ जाण्याचं साहस होईना. पहारेकऱ्याच्या हातात तीर-कमठा. पिकलेल्या फळांच्या वासाने वानरांचा जीव तडफडू लागला. मग त्यांना एक युक्ती सुचली. रात्री झाडावर चढून ती फळं खाऊ लागले आणि उजाडायच्या आत पसार. रात्री पहारा नव्हता ना!

वानरांच्या टोळीचा जो मुख्य त्याला सगळे “सरदार” म्हणत. तो अनुभवी, विचारी, चांगला नेता. तो सर्वांना म्हणाला, ”रात्रीच्या वेळी बाहेर जाणं हे वानरांच्या शास्त्राविरुद्ध आहे. तुम्ही असं रात्री बाहेर जाऊ नका. वनात इतरही कितीतरी फळांची झाडं आहेत. मग माणसांच्या त्या झाडावर तुमचा डोळा का? माझ ऐका आणि सावध व्हा. नाहीतर संकटात सापडाल, सांगून ठेवतो...” पण सरदाराचं सांगणं कोण ऐकणार? फळांच्या मोहापायी त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी रात्री तिकडे जाणं सोडलं नाही. सरदार मात्र वनातच थांबत असे.

इकडे वानरांचा दुष्टपणा गावकऱ्यांच्या लक्षात आला. सर्वांनी सभा घेऊन सर्व परिस्थितीचा परामर्श घेतला आणि एक बेत ठरवला. रात्रीचं सर्वांनी गुपचूप झाडाला घेराव घालून वाट बघत बसायचं. वानरांना रात्रीचं नीट दिसत नाही. उजाडू लागताच लाठ्याकाठ्यांनी त्यांना चोपायचं.

दुसऱ्या दिवशी रात्रभर फळं खाण्यात दंग वानरांना पहाटे दिसलं – झाडाच्या चहुबाजूनी लोक उभे! हातात लाठ्या, काठ्या आणि धनुष्य-बाण घेऊन! भीतीने त्यांचे जणू प्राण उडून गेले. पळायचीही सोय नाही. मनात म्हणू लागले, सरदाराचे ऐकायला हवे होते. आता काय करावे? घाबरून सारे चिं चिं ओरडू लागले, पळापळ करू लागले. तोच त्यांच्या दिशेने दगड, गोटे आणि बाण सूं सूं करत येऊ लागले. कुणाच्या डोक्याला लागले, तर कुणाच्या हाताला, पायाला. ते विव्हळू लागले, जोरजोरात किंचाळू लागले. जे खाली उतरले त्यांच्यावर काठ्यांचे घाव बसू लागले.

वनात झोपलेल्या सरदाराच्या कानांनी वानरांचा चित्कार टिपला. नक्कीच संकटात सापडलीत माझी पोरं. एका उडीत उंच झाडाचा शेंडा गाठून तो पाहू लागला. दूरवरचं ते दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. काय बरं करावं? सरदार विचार करू लागला. त्यांना वाचवायलाच हवं. काहीतरी उपाय करायला हवा, नाहीतर मी कसला सरदार? मोठमोठ्या ढांगा टाकत तो गावात पोहोचला. काय करावं? या विचारात इकडेतिकडे पाहू लागला. एका घराच्या अंगणात एक स्त्री चूल पेटवून काहीतरी आणायला घरात गेली. सरदाराने गोठ्यातलं एक लाकूड उचललं. चुलीत धरलं आणि पेट घेताच दिलं भिरकावून त्या घरावर! बस्स! लंकाकांड सुरू! त्या घरापासून शेजारच्या घराला, त्यापुढच्या घराला .... आग पसरू लागली. आग...आग... बायका ओरडू लागल्या.

झाडाखाली वानरांना मारत असलेल्या लोकांच्या कानी ती खबर गेली. तत्क्षणी वानरांना सोडून गावकरी घराकडे धावले. बघता बघता झाडं जनशून्य झाले. सुटकेचा नि:श्वास सोडत वानरं प्राणपणाने लांब उड्या मारत जंगलाकडे पळाली. सरदारापुढे माना खाली घालून उभे राहिले. सरदाराने खूप काही ऐकवले, रागावून म्हणाला, "मुर्खानो, आज नशिबाने वाचलात. खबरदार! यापुढे गावाच्या बाजूला गेलात तर!”

     

मूळ बंगाली कथा – नित्यानंद विनोद गोस्वामी.

अनुवाद – स्वाती दाढे.

 [email protected]