मी खिडकीतून आकाशाकडे पहात चहा पीत बसलो होतो.

इतक्यात छतावरच्या एका कोळ्याने उडी मारली आणि तो चहाच्या कपाच्या दिशेने येऊ लागला.

माझ्या मनातला विचार ओळखून कोळी म्हणाला फक्त गप्पा मारायला आलोय हो.

मी त्याला बोलण्याची खूण केली.

‘‘अहो, जी माणसं खूप नम्र असतात किंवा ‘खाली मुंडी पाताळ धुंडी’ असतात, त्यांना मी अजिबात दिसत नाही. मला पाहायचं असेल तर तुम्हाला सर उठाके पाहायला पाहिजे. कारण मी उच्च स्थानी राहतो आणि माझा वावर ही तिथेच असतो. मी जरी कीटक असलो तरी मला आठ पाय आहेत. पण कित्येक वर्षांत मी जमिनीला माझा एकही पाय लावलेला नाही.’’

कोळ्याचं हे बोलणं ऐकून तर मी चक्रावलोच. आतासुद्धा तो हवेत तरंगतच माझ्याशी गप्पा मारत होता. अरे, तुझं नाव तरी सांग..

 ‘‘माझं नाव ‘जंपींग स्पायडर’ म्हणजेच उड्या मारणारा कोळी. मी जाळी विणण्यात माझा वेळ कधीच फुकट घालवत नाही.’’

‘‘अरे, सगळे कोळी जाळी विणतात. प्रत्येक कोळ्याची जाळी विणण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काही कलाकार कोळ्यांची जाळी अतिशय सुंदर नक्षीदार असतात. काहींची नरसाळ्यासारखी असतात तर काहींची झुल्यासारखी असतात. काही आळशी कोळ्यांची जाळी ओबडधोबड असतात.’’

‘‘ही जाळी म्हणजेच तुमची घरं. या घरात येणार्‍या पाहुण्यांना तुम्ही मिटक्या मारत खाता. आमच्या घरी पाहुणे आले की आम्ही ‘अतिथी देवो भव’ असं म्हणतो. पण तुमच्या घरी पाहुणे आले की तुम्ही ‘अतिथी खावो भव’ असं म्हणता! तू जाळीच विणत नाहीस तर मग काय दिवसभर हवाच खातोस?’’

‘‘अहो, आपुनका स्टाइल ही अलग है. एकदम डिफरंट.’’

 ‘‘अरे, डिफरंट म्हणजे काय ते तर सांग.’’

पाचव्या पायाने सातवा पाय खाजवत कोळी म्हणाला, ‘‘ओ भाय, आमच्या म्हणजे उडी मारणार्‍यात कोळ्यांच्या जगभर ४००० जाती आहेत. नो जाळी विणींग फक्त उडी मारींग. समझे..?

‘‘ए जंप्या, जरा काय ते नीट सांग रे.’’

तिसरा डोळा मिचकावत तो म्हणाला, ‘‘आमच्या एकंदर कोळ्यांच्या जगभर ४०००० जाती आहेत त्यातल्या आमच्या ४००० जाती जरा वेगळ्या आहेत. आम्ही घरं विणत नसल्याने आम्ही आमच्या भक्ष्याची शिकार करतो. आमचा खाऊ म्हणजे माशा, झुरळं किंवा एखादा कीटक यांचा पाठलाग करत तो आमच्या उडीच्या रेंजमधे आला की त्याच्यावर सरळ उडी मारून त्याला दंश करून मग त्याला पिऊन टाकतो.’’

‘‘आणि उडी चुकली तर? तू तुझा खाऊ खात नाहीस तर पितोस..? म्हणजे काय?’’

‘‘उडी मारताना शरीरातून सुटणार्‍या रेशमी दोरीचा एक तंतू ज्या ठिकाणाहून उडी मारणार आहे, त्या ठिकाणी चिकटवून ठेवतो. उडी चुकल्यास या तंतूमुळे मी हवेत तरंगत राहतो. जसा आत्ता आहे. मग त्या तंतूला तोंडाने गुंडाळत जिथून उडी मारली तिथे जातो.’’

‘‘पण, तू कडक कुडकुडीत झुरळ पितोस कसा?’’

‘‘उडी मारल्यावर माझ्या विषारी दाताने त्याला दंश करतो तेव्हा तो मरतो. मग मी तोंडातून एक रसायन त्या खाऊच्या शरीरावर पसरवतो. म्हणजे मी माझ्या शिकारीवर टॉपिंग करतो. या टॉपिंगमुळे त्याच्या शरीरातले अवयव विरघळतात. मग मी ते शोषून घेतो.’’

‘‘तुला ओळखण्याची सोपी खूण कोणती रे?’’

तो म्हणाला, ‘‘अगदी सोपं आहे. आम्हाला एकूण आठ डोळे असतात.’’

मी किंचाळत म्हंटलं, ‘‘आऽऽऽठ डोळे?’’

जंप्या त्रासून म्हणाला,‘‘ओरडायला काय झालं? जेवढे पाय तेवढे डोळे. अगदी तुमच्याप्रमाणेच.’’

आता मात्र, आम्ही दोघेही हसलो.

‘‘काय रे, तुला आठ पाय आणि आठ डोळे. म.. तुला नाकं किती?’’

नाक खाजवत तो म्हणाला, ‘‘सो सिंपल. आठ पाय, आठ डोळे आणि आठ नाकं. का सांग बरं..?’’

‘‘मला वाटतं, तुझी नाकं तुझ्या पायावर असणार. त्यामुळे जवळ येणार्‍या शत्रूचा किंवा मित्राचा वास तुला चटकन ओळखता येणार.’’

‘‘मला थांबवत तो आनंदाने म्हणाला, बिलकुल सही. एकदम बरोबर यार.’’

 ‘‘तुम्हा कोळ्यांची जाळी इतकी नाजुक असतात, की एखादा प्राणी अडकल्यावर ती तुटत नाहीत का रे?’’

माझी समजूत काढत तो कोळी म्हणाला, ‘‘आमच्या जाळ्याचे धागे जरी दिसायला नाजूक आणि हाताने ओढल्यावर पटकन तुटत असले तरी गुणधर्माने ते कोणत्याही धातूजन्य धाग्यापेक्षा जास्त मजबूत असतात. पावसात किंवा जोराच्या वादळात ते तग धरू शकतात. हे धागे सुरुवातीला द्रवरूपात असतात. जेव्हा त्यांचा हवेशी संबंध येतो तेव्हा मात्र ते घनरूप बनतात.’’

मी भीत भीत विचारलं, ‘‘कुठल्या जातीचा कोळी सर्वांत विषारी असतो?’’

‘‘हं. चांगला प्रश्न आहे. अमेरिकेत आढळणारी ‘ब्लॅक विडो’ ही जात सर्वात विषारी समजली जाते.’’

‘‘बापरे!! म्हणजे तुमच्यापासून सांभाळून राहिलं पाहिजे ना..?’’

जंप्या कोळी हसतच म्हणाला, ‘‘आमच्यापासून नव्हे, ब्लॅक विडोपासून! आपण तर मित्रच आहोत ना? काऽऽय?’’

त्याने असं म्हणताच मी उजव्या हाताने आणि जंप्या कोळ्याने तिसर्‍या पायाने एकमेकांना ‘हापाळी’ (म्हणजे एकाच्या हाताने दुसर्‍याच्या पायावर वाजवलेली टाळी ती हापाळी.) दिली.

जंप्या सांगू लागला, ‘‘आम्ही इथे सुमारे ३०० दशलक्ष वर्षांपासून पृथ्वीवर असल्याचं मानलं जातं. पण काही वर्षांपूर्वी तो हॉलीवुडचा मार्क वेब तर आमच्या इतक्या प्रेमात पडला की त्याने आमच्या नावाला माणसाचे नाव जोडून सुपरडुपरहिट सिनेमे तयार केले. तुम्ही पण नक्कीच पाहिला असणार यातला एखादा माझा सिनेमा.. 

‘स्पायडर मॅन’.

मग मात्र आम्ही एकमेकांना हापाळ्या आणि पाहाळ्या दिल्या. इतक्यात जंप्याला त्याच्या खाऊचा वास आला आणि तो सूर्रकन वर गेला.

-राजीव तांबे

[email protected] 

राजीव तांबे यांची आणखी एक मजेदार कथा.

जोडी