सदाफुली

दिंनाक: 19 Jul 2018 16:42:45


बारमाही फुले देणारे अतिशय काटक, शोभिवंत असे हे सदाफुलीचे झाड. याला तीनही ऋतूत फुले येतात. पण जास्त पावसाळ्यात. याचे शास्त्रीय नाव केथारेन्थस रोजस आहे. हे झुडूप वर्गातले असून अनेक वर्षेही जगणारे औषधी झाड आहे. त्याचे मुलस्थान मादागास्कर असून दोन्ही गोलार्धात उष्णकटिबंधात सर्वत्र दिसते. काहींचा मते वेस्टइंडिज हे तिचे मूळ स्थान असावे. मलायात तिला उषामालारि म्हणतात. 

हिच्या प्रजाती एकूण पाच आहेत. भारतात ही बागेत, क्वचित इतरत्र आढळते. ती ०.३ ते ०.९ मीटर उंच वाढते. तिची पाने साधी, समोरासमोर, चिवट, लांबट, गुळगुळीत असतात. फुले सामान्यतः पानांच्या बगलेत, झुपक्यांनीही वर्षभर येतात. ती द्विलिंगी असतात. पेटिका फळ – उभे – लांबट गोलाकार असून त्यात खूप बिया असतात. सदाफुलीचे रंग म्हणजे पांढरा, गुलाबी ते जांभळट रंग, लाल गुलाबी असे असतात. फुले शेंड्यावर येतात. फुलांच्या विविध रंगांमुळे त्यावर फुलपाखरे येतात. ही फुले पाच पाकळ्यांची नाजूक पण बिनवासाची असतात. फळ खाण्यायोग्य, पण पानातून निघणारा चिक विषारी असतो.

सदाफुली बागेत किंवा कुंडीत लावतात. तिची लागवड बिया लावून, रोपे करून अगर छाट कलमे लावून करणे सोईचे होते. फुले तोडली नाहीत तर बी पडल्याने रोपे उगवतात. सर्व प्रकारची जमीन तिला चालते. हिच्या वाढीसाठी फारसं लक्ष काही द्यावे लागत नाही. उन्हाळ्यात ताटव्यांसाठी चौफेर लावायला व खडकाळ भागातही लावायला ती सोईची असते. कधी ती पडीक जागी किंवा रेताड प्रदेशात आपोआप तणासारखी वाढलेली आढळते. फांद्यांची दाटी काष्टमय होत असल्याने दर चार महिन्यांनी तिची छाटणी करतात.

अमेरिकेत कफ, सर्दी, खोकला यावर या वनस्पतीचा उपचारासाठी उपयोग केला जातो. दक्षिण आफ्रिकेच्या इतर विविध भागात तसेच भारतात, श्रीलंकेत या वनस्पतीचा उपयोग मधुमेहावर करतात. पानांचा रस गांधीलमाशीच्या दंशावर लावतात. मधुमेहींना रोज पाच दिवस सकाळी तीन कोवळी पाने खायला सांगतात. खाज, खरुज, गजकर्ण, इसब यावर या झाडाची पाने व मुळ्या वाटून लावतात. याची तीन अस्कलाइडे सर्पगंधापेक्षा जास्त प्रमाणात रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म त्याच्यात आहेत. ऐच्छिक स्नायू शिथिल होतात.

सदाफुलीला केवडा रोग होतो. त्यात पाने गुच्छासारखी होतात. देठांना पत्याचे स्वरूप येते. मर रोगातही सदाफुलीची खूप हानी होते. त्या वेळीही झुबाक्याचेच स्वरूप तिला येते. या सर्वांवर योग्य ते उपाय करणे आवश्यक असते.

सध्या याच्या विविध प्रजाती निर्माण होत आहेत. त्यातील एक भारतीय जाती हिमालय ते भारतात सर्वत्र आढळते. तिचे नाव सांकपी आहे. ही अनेक फांद्यांची १५ – १६ सें.मी. उंच, वर्षभर येणारी औषधी वनस्पती आहे. ही शेतात, गवताळ रानात तणासारखी वाढते. हिला पांढरी फुले एकेकटी किंवा जोडीने येतात. याची पेटिका फळे बारीक असतात, पण इतर लक्षणे सदफुलीसाराखीच असतात. याच्या सुक्या वनस्पतीचा काढा तेलात उकळवून कंबरदुखीवर चोळतात.   

-मीनल पटवर्धन 

[email protected]

लिली या फुलाविषयी माहिती घ्या खालील लेखात 

लिली