एखादी व्यवस्था आपल्या इतक्या अंगवळणी पडते की, या व्यवस्थेची सुरुवात कुणी, कधी, कशासाठी बरे केली असेल, हा प्रश्नसुद्धा आपल्या मनात येत नाही. आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली अशीच एक व्यवस्था म्हणजे आपली प्रचलित शिक्षणपद्धती. 

आज ज्या प्रकारे आपण शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण केली आहे, तशीच व्यवस्था माणसाच्या अस्तित्वापासून म्हणजे लाखो वर्षापूर्वी सुद्धा असेल का? नक्कीच नव्हती. म्हणजेच आजची शिक्षण पद्धती अनेक वळणे पार करत इथपर्यंत येऊन पोहोचली, हे नक्की. 

पण हे बदल, शिक्षणपद्धतीचा इतिहास मुळात समजून घ्यायची काय गरज आहे. त्याने आपल्या आयुष्यात असा काय बदल घडेल, हा प्रश्न एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला पडणे साहजिक आहे. कोणतीही व्यवस्था निर्माण होते, ते आपले जगणे अजून समृद्ध व्हावे म्हणून. पण जर ती व्यवस्था, तिचा उद्देशच आपल्याला समजाला नाही, तर तिचा आपल्या प्रगतीसाठी पुरेपूर उपयोग करून घेता येणार नाही. म्हणून प्रचलित शिक्षणपद्धतीचा इतिहास समजून घेऊन, या व्यवस्थेचा पुरेपूर फायदा घेऊन, आपल्या मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी, या व्यवस्थेच्या निर्मिती मागची परिस्थिती व त्यात झालेले बदल आपण समजून घेतली पाहिजेत. 

लाखो वर्षांपूर्वी माणूस ज्या वेळी या पृथ्वीवर नांदत होता, त्या वेळी त्याच्या जगण्याचा मुख्य उद्देश अन्न मिळवणे हा होता. अन्नासाठी दाही दिशा भटकणे, ऊन, वारा,पाऊस व हिंस्त्र पशुंपासून स्वत:चे संरक्षण करणे, असे खडतर आयुष्य जगत असताना, कधीतरी माणसाने शिकारीसाठी नवीन युक्ती वापरली, कच्चे अन्न शिजवून बघितले, नैसर्गिक संकटापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी निसर्गातील काही वस्तूंचा वापर करून बघितला. त्यातून त्याला नवीन गोष्टी समजल्या. या नवीन गोष्टी लक्षात ठेवून त्याने त्या पुन्हा पुन्हा वापरायला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने तिथेच आपल्या शिक्षणाचा पाया घातला गेला. 

शिकलेल्या गोष्टी सुरुवातीला स्मरणशक्तीच्या जोरावर, तर पुढे चित्रातून व नंतर मौखिक व लिखित स्वरूपात तो संग्रहित करू लागला. त्या संग्रहाचा तो जशी गरज पडेल, तसा उपयोग करू लागला. नवीन नवीन गोष्टी शिकल्यामुळे, हळूहळू त्याची भटकंती संपली. तो एका जागी स्थिर झाला. समूहाने राहू लागला. भाषेच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद करू लागला, ज्ञानाची देवाणघेवाण करू लागला.

ज्ञानाची अशी देवाणघेवाण केल्याने, आपले ज्ञान वाढते. त्यातून आयुष्य अजूनच सुखकर होते, हे लक्षात आल्याने, गुरुकुलाच्या माध्यमातून त्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यातून भारतात नालंदा, तक्षशीला अशी भव्य गुरुकुले निर्माण झाली. तिथे ज्ञाननिर्मिती व त्या ज्ञानाचा प्रसार या माध्यमातून रोजच्या जगण्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

माणूस एका जागी स्थिर होऊन शेती करू लागला, घर बांधून राहू लागला, अवजारे वापरू लागला. त्यामुळे त्याच्या गरजा वाढत गेल्या. त्या गरजा पूर्ण करणे त्याला एकट्याला अशक्य होते. त्यासाठी कुशल माणसे हवी होती. त्यातून व्यवसाय निर्माण झाले. हे व्यवसाय पुढे चालवण्यासाठी प्रशिक्षणाची गरज पडली. सुरुवातीला कुटुंबाकडून मिळणारे प्रशिक्षण माणसाला अपुरे पडू लागले. मग तो अधिक कुशल माणसाकडे जाऊन शिकू लागला. त्यातून ज्ञान समृद्ध असलेली व ज्ञान मिळवण्यासाठी आतुर माणसे एकत्र येणे वाढत गेले. स्थानिक पातळीवरही गुरुकुले मिर्माण होऊ लागली.

एकीकडे शिकणे हळूहळू सार्वत्रिक होत असताना, नक्की शिकायचे तरी काय, हा प्रश्न जेव्हा जेव्हा माणसाला पडला, तेव्हा तेव्हा त्याने, मी ज्या समाजात राहतो, त्या समाजाच्या सध्याच्या तसेच भविष्यातील गरजा काय आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. समाजाच्या या गरजा मी शिक्षणाच्या माध्यमातून, नवीन कौशल्ये आत्मसात करून कशा पूर्ण करू शकेन व त्यातून उत्तम अर्थार्जन कसे करू शकेन हा विचार माणूस करू लागला. आपण जितके जास्त शिकू, तितके उत्तम अर्थाजन होईल, हे माणसाला कळले आणि शिक्षण ही माणसाची मूलभूत गरज बनू लागली.

म्हणजेच अगदी सुरुवातीपासून शिक्षणाचा हेतू हा समाजाच्या गरजा पूर्ण करू शकेल, असे मनुष्यबळ निर्माण करणे हाच होता व अजूनही आहे, 

भारतात इंग्रज येईपर्यंत शिक्षण क्षेत्रात राजसत्तेचा हस्तक्षेप नगण्य होता. शिक्षकांविषयी व एकूणच शिक्षणक्षेत्राविषयी राजसत्तेला आदर होता. "मला काय शिकायचे" हा अधिकार सामान्य माणसाकडे शाबूत होता.

मात्र इंग्रज आल्यानंतर समाजाच्या गरजांशी जोडल्या गेलेल्या या शिक्षण पद्धतीमध्ये इंग्रजांनी केवळ हस्तक्षेपच केला नाही तर, संपूर्ण शिक्षणपद्धतीवर सरकारी नियंत्रण प्रस्थापित केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण केली.

भारतीय समाजाच्या गरजा पूर्ण करू शकेल अशा प्रकाराचे शिक्षण देण्याची व्यवस्था मोडकळीत आणून इंग्रजांना नक्की काय अपेक्षित होते, हे आपण पुढील भागात समजून घेऊ.

-चेतन एरंडे

[email protected]

आपल्या आयुष्यातील शाळा या अविभाज्य घटकाची निवड आपण नक्की कशी करतो? सांगतायेत  चेतन एरंडे खालील लेखात

लेख १ - सध्याची शिक्षणपद्धती व शिक्षण