एक लहानपणीची गंमत सांगते. मला खेळताना जरा जरी काही लागलं तरी मी त्याचा खूप बाऊ करायचे. खरं तर मला वेदना सहन व्हायच्या नाहीत. म्हणून मी रडायचे. आईला वाटायचं मला खूपच लागलं आहे, असं समजून आई मला शाळेत जाऊ न देता आराम करायला सांगायची. याची मला मज्जा वाटायची. याने झालं काय अगदी थोडंसं जरी खरचटलं तरी मी वेदना सहन करायचे नाही. आईला कळावं म्हणून मी जोरात रडायचे आणि याची नंतर मला सवयच झाली. मात्र आईच्या हे लक्षात आलं. आई मला समजवायची, पण तरी तसा काही माझ्यात फरक पडला नाही.

एकदा काय झालं.. घरासमोरच्या मैदानावर माझा भाऊ मला सायकल चालवायला शिकवत होता. पेडल मारत मी पुढे जाताना त्याने मागून हात सोडला आणि बॅलन्स जाऊन मी पडले. माझ्या ढोपर आणि कोपऱ्याला खूप लागलं. रक्त येऊ लागलं. मी रडायला लागले. भाऊ म्हणत होता काही झालेलं नाही. माती लाव आणि चल पुन्हा चालवायला सुरू कर. पण मला उठताही येईना. खरं तर अधिक दुखेल या भीतीने मी उठत नव्हते. भाऊ मग तसाच आईला बोलवायला गेला. आई आली आणि माझ्याकडे पाहत राहिली. मी आईला पुढे येण्यासाठी सांगितलं तर ती पुढे येईना तू स्वतः उठ म्हणू लागली. मला रडू यायला लागले तरी आई पुढे येईना उलट मला राग दाखवून तिने मला स्वतःला उठायला लावलं आणि सायकल पुन्हा हातात घ्यायला लावली. ती हातात धरत हळूहळू मला घरी यायला सांगितलं. घरी येताना मला जाणवलं की आपल्याला तेवढ ही दुखत नाहीये. तरी मी हळूहळू चालत घरी आले. घरी आल्यावर मात्र आईने हात पाय स्वच्छ धुवून जखमेवर मलम लावून पट्टी बांधली. माझ्या बाजूला बसली आणि म्हणाली, “सोने, आज तुला एक गोष्ट सांगते मी” 

“कोणती गोष्ट” 

“फुलपाखराची..”

“ चालेल..मला आवडेल ऐकायला..”

“ सोने, तुला माहीत आहे का फुलपाखराचा जन्म कसा होतो?’ आईने मला प्रश्न केला.

“ हो.. अळीपासून फुलपाखराचा जन्म होतो.”, आम्हाला शाळेत शिकवलेलं मी आईला सांगितलं.

“अगदी बरोबर. पण फुलपाखरू होण्यासाठी अळी किती कष्ट घेते माहीत आहे का तुला?”

“ ह्म्मम्म्म..नाही.”

“ अळी तिच्या कोशामध्ये असते ना तेव्हा ती द्रवपदार्थामध्ये असते. त्यामुळे होत काय फुलपाखराचे पंख जे असतात ते गच्च आवळले गेलेले असतात. अळीला जेव्हा फुलपाखरू बनून बाहेर यायचं असतं तेव्हा कोशाच्या वरच्या बाजूला अगदी बारीक असं छिद्र पडतं. त्या अगदी छोट्याशा छिद्रातून ते स्वतःला खूप खूप कष्ट आणि वेदना सहन करून बाहेर काढतं आणि फुलपाखरू बनून बागडू लागतं. आता जर समजा तिला कमी त्रास व्हावा म्हणून आपण ते छिद्र मोठ केलं तर काय होतं फुलपाखरू अगदी सहज त्यातून बाहेर पडतं मात्र छिद्रातून बाहेर पडण्याचे कष्ट सहन न करावे लागल्यामुळे बाहेर पडल्यावर मात्र त्या अळीचे पंख कोमेजून जातात आणि फुलपाखरू बनून बागडण्याऐवजी ती अळी मरून जमिनीवर पडते. मग मला आता सांग आपल्याला पुढे फुलपाखरू बनून बागडायचे आहे की अगदी सहज कोशातून बाहेर पडून सुस्त राहायचे आहे.”

“फुलपाखरू बनून बागडायचे आहे..”, मी पटकन म्हणाले.

“हो ना.. मग आपल्यालाही वेदना सहन करायला हव्या ना. त्याशिवाय कसे फुलपाखरू बनता येईल?.एवढीशी छोटीशी अळी जर वेदना सहन करू शकते मग आपण का नाही? वेदना, समस्या या प्रत्येकाला आहे. जो यापासून पळवाट शोधतो तो कधीच आयुष्यात पुढे जात नाही. तो एकाच जागी थांबून राहतो. जो कष्ट सहन करतो तो मोठा होतो.”

मला सारं काही समजलं. मलाही फुलपाखरासारखे बनायचे आहे असे मी मनातच ठरवलं.

“यानंतर मी कधीच अगदी छोट्याशा जखमेसाठी रडणार नाही. शाळेतून सुट्टी घेणार नाही.“ मी आईला प्रोमिस केलं. आईने मला प्रेमाने जवळ घेतलं. तिला जे काही सांगायचं होतं ते तिने मला प्रेमाने, जवळ घेऊन सांगितलं होतं.

-उत्कर्षा मुळे

[email protected]