अमेरिकेतील एका नावाजलेल्या शाळेतील हिंसाचाराची घटना २-३ दिवसापूर्वीच दूरदर्शनवर पाहिली. शाळेतील १७ वर्षाच्या मुलाने बेधुंद गोळीबार केला. गेल्या ५ महिन्यातील अमेरिकेतील ही २२ वी घटना! दुर्दैवाने आपला देशही यात मागे नाही. गुरगावच्या शाळेतील घटना, कोल्हापूर आणि संभाजीनगरमधील प्रेमप्रकरणातून कोवळ्या मुलांनी केलेले निर्घृण खून, क्षुल्लक कारणावरून मुले करत असलेल्या आत्महत्या, सामुहिक बलात्काराचे वाढते प्रमाण ! वाचून, पाहून डोके सुन्न होते.

प्रत्येक देशाचा एक स्वभाव असतो, वैशिष्ट्ये असतात, संस्कृती असते, दायित्वही असते. सहकार्य, प्रेम, सहिष्णुता ही बलस्थाने असलेल्या आणि शतकानुशतके ती जोपासणाऱ्या या देशात, समाजात हे काय घडतंय? कोवळ्या वयात हिंसा, क्रौर्य, अश्लीलता, नैराश्य वाढण्यामागे काय बरं कारणं असू शकतात?

विचार करायला लागले आणि लक्षात आलं, की हे तर मनाचे षड्रिपूच नाहीत का? काम क्रोध(हिंसा, सूडभावना), लोभ, मोह, मद, मत्सर! म्हणजे या प्रश्नाचं मूळ मनाच्या आरोग्यात मनावरच्या संस्कारात दडलं आहे तर! कसे होतात बरं मनावर संस्कार? मूल जे पहातं, ऐकतं, शिकतं त्यातून! थोडक्यात, ज्ञानेद्रीयांना जे ऐकायला, पाहायला, शिकायला, जाणवायला मिळेल त्यातून !

कसं मिळतं हे शिक्षण? हे दोन प्रकारे मिळतं. चार भिंतीच्या आत मिळणारे, परीक्षा आणि मार्क यावर जोखले जाणारे औपचारिक शिक्षण आणि कुटुंब, समाज, निसर्ग, मनोरंजनाची माध्यमे, कला, साहित्य, अनुकरणीय व्यक्तींची चरित्रं आणि जीवनादर्श इत्यादींकडून मिळणारं अनौपचारिक शिक्षण! हे अनौपचारिक शिक्षण मुलांचा भावनांक वाढवण्यास मदत करतं जो सुखी आणि समाधानी जीवनासाठी फार महत्वाचा आहे. गेल्या दोन दशकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानात झालेल्या विस्मयकारक प्रगतीमुळे हे दायित्व निभावण्याची एक प्रमुख जबाबदारी प्रसारमाध्यमांवर आली आहे.

अनेक वर्षांपासून चालत आलेल्या वर्तमानपत्रे, नियतकालिके, चित्रपट, नाटकं, पुस्तके, रेडीओ, दूरदर्शन या प्रसारमाध्यमांसोबत इलेक्ट्रोनिक प्रसारमाध्यमांनी फारचं क्रांती(?)केली आहे. यात इंटरनेट, फेसबुक, मोबाईल फोन यांचा समावेश होतो.    

प्रसारमाध्यमे ही खरं तर समाजप्रबोधनाची, समाज घडवणारी, समजला दिशा देणारी प्रभावी साधने आहेत. समाजात चांगल्या व वाईट, दोन्ही प्रकारच्या घटना घडणार आहेत, सज्जन व दुर्जन, दोन्ही प्रकारचे लोक, संस्था असणारं आहेत. सामान्य जनमानसापर्यंत काय फोचावायचे, याच्या निर्णायक भूमिकेत आज प्रसारमाध्यमे आहेत.

काय पोहोचतंय या मुलांच्या ज्ञानेद्रियांपर्यंत आज (?) ज्या देशात राम – भारताचे प्रेम आदर्श मानले जाते, त्याच देशात आज स्वार्थासाठी भाऊ भावाचा खून करताना मुलं पहातात. व्हिडीओ गेम्स, दूरदर्शन  व चित्रपटातील कथानकं यातून, स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षेच्या लालसेतून एखाद्याचा जीव घेणं हे मुलांना गैर, चुकीचं वाटत नाही. संवेदना बोथट व्हायला लागल्या आहेत. सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिराती पाहून सौंदर्याविषयीच्या चुकीच्या कल्पना मुलांच्या मनात तयार होत आहेत. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमंते तत्र देवताः’ ही आपली संस्कृती आहे. याच देशात ; आज आपल्याला उत्पादनाच्या खप वाढवण्यासाठी विविध जाहिरातींमधून केले जाणारे स्त्रियांचे अनावश्यक देहदर्शन हे देशाच्या संस्कृतीच्या पतनास मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. वाढीच्या वयात मुलांचे आदर्श सिनेमातील नट – नट्या असतात. त्याचं अनुकरण करण्याकडे या तरुण पिढीचा कल असतो. त्यांची वेशभूषा, केशभूषा यांचा मोठा पगडा मुलांच्या मनावर असतो. आज दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर ज्या कथा दाखवल्या जातात, चित्रपटातून जे विषय हाताळले जातात, त्यातून केवळ व्यक्तिगत सुखाचा विचार करणारी, आत्मकेंद्री, जबाबदारीची जाणीव नसणारी, नात्यांना कस्पटासमान मानणारी, क्षणात नाते जोडणारी आणि हनिमून संपण्यापूर्वीच घटस्फोट घेणारी, त्यामुळे व्यक्तीला, समाजाला स्थैर्य न देवू शकणारी पिढी तयार होते आहे.

या काल्पनिक, आभासी दुनियेचा कमीत कमी संपर्क मुलांशी येईल याची काळजी पालकांनी आणि शिक्षकांनी, कुटुंबीयांनी घेतली पाहिजे. त्यांना त्याऐवजी काय चांगले करता येईल याचा पर्यायही सुचवला पाहिजे.

प्रसारमाध्यमांनी सामाजिक भान ठेवायला हवे. कोणतीही बातमी देताना, दाखवताना याचा विचार करणे गरजेचे आहे, की हे समाजाला हितकारक, पोषक आहे का? ‘नटसम्राट’ सारखी उत्तम नाटके, ‘तारे जमीं पार’, देऊळ, शक्ती, दोस्ती यासारखे उत्तम चित्रपट समजत चांगली मूल्ये रुजवण्याचे, समाजाला दिशा देण्याचे काम करतात.

देशाच्या तरुण पिढीत देशप्रेम, संवेदनशीलता, परस्परपूरकता, सर्वहितकारकता निर्माण करणारी कथानके, साहित्य, मांडणी, सादरीकरण मुलांसमोर आली पाहिजेत. म्हणून प्रसारमाध्यमांनी त्यांच्यामध्ये असलेल्या प्रचंड ताकदीचा वापर करून देशाच्या प्रगतीला हातभार लावायला हवा.

-डॉ. यशस्विनी तुपकरी

[email protected]