विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील मैत्रभाव दृढ करण्याच्या उद्देशाने सुरू झालेले ‘शिक्षणविवेक’ मासिक आज राज्यातील नामांकित सहा शैक्षणिक संस्थांच्या ७०,००० विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यापर्यंत पोहोचत आहे. या सहा वर्षांच्या काळात शिक्षणविवेक परिवार वाढत आहे. या परिवारातील मुख्य घटक म्हणजे शिक्षणविवेक प्रतिनिधी. परिवारातील या घटकाच्या सहकार्यानेच शिक्षणविवेक यशस्वी वाटचाल करत आहे. प्रत्येक शाळेमध्ये शिक्षणविवेकसंबंधी कार्यरत असणाऱ्या शिक्षक प्रतिनिधींची बैठक दि. १४ जुलै रोजी प्र. ल. गावडे सभागृहात संपन्न झाली. ११ ते १ या वेळात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे; छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण; डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे; महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे; शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे; भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ, अंबेजोगाई या संस्थांच्या शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थांचे पदाधिकारी रत्नाकर फाटक, सविता केळकर, अनिल माणकीकर, मिहीर प्रभुदेसाई, शैलेश कंगळे हे आवर्जून उपस्थित राहिले. शिक्षण व्यवस्थेत अनेक वर्षे कार्यरत असलेले रवींद्र वंजारवाडकर हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणविवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर यांनी केले. संपादकीय विषय आणि दिवाळी विशेषांक याविषयी शिक्षणविवेक कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी मार्गदर्शन केले. उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी स्पर्धा आणि उपक्रम यांची माहिती सांगितली. संकेतस्थळातील वेगवेगळे सदर आणि ई-दिवाळी अंक याविषयी अनुजा जोशी यांनी माहिती दिली. उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनी मुलांच्या लिखाणाला मिळालेली चालना, कलाकृतींना मिळालेले व्यासपीठ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या शिक्षणविवेकच्या उपक्रमांविषयी चर्चा केली. याप्रसंगी समारोप करताना रविंद्र वंजारवाडकर यांनी विद्यार्थीदशेतील आपले विविध अनुभव सांगत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुलांच्या भावविश्वातील अनुभव, त्यांना करता येण्यासारखे प्रयोग, त्यांचे लेखन साहित्य इत्यादीतून मुलांना व्यक्त होण्यासाठी शिक्षणविवेक एक उत्तम व्यासपीठ आहे, असे स्पष्ट केले. कार्यक्रमात रुपाली निरगुडे यांनी सूत्रसंचालन केले तर रेश्मा बाठे यांनी आभार मानले.

-प्रतिनिधी

[email protected]