महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल येथे दि. ११ जुलै रोजी शिक्षणविवेकतर्फे वैविध्यपूर्ण उपक्रम घेतले गेले. या उपक्रमात इ. १ली ते इ. १० वीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी प्रचिती तळवलकर यांनी शिक्षणविवेकच्या सर्व मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षणविवेकच्या संपादक मानसी वैशंपायन यांनी अक्षय वाटवे आणि सायली सहस्त्रबुद्धे यांचे स्वागत केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका देवरे यांनी चित्रा नातू-वझे आणि रुपाली निरगुडे यांचे स्वागत केले.

चार वेगवेगळ्या उपक्रमातून शिक्षणविवेकने विद्यार्थ्यांना मनोरंजनातून अनेक गोष्टी शिकवल्या. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे आणि शिल्पकार चरित्रकोश प्रकल्पाच्या सहसंपादक चित्रा नातू-वझे यांनी इ. १ली व २ रीच्या मुलांसाठी पपेट शोचे सादरीकरण केले. गाणी आणि गोष्ट यांच्या माध्यमातून त्यांनी मुलांचे मनोरंजन केले.

इ. ३री आणि ४ थीच्या मुलांसाठी ‘सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. समुपदेशक सायली सहस्त्रबुद्धे यांनी गोष्ट आणि कृती उपक्रमांच्या माध्यमातून या विषयाचे गांभीर्य आणि त्यासोबतच घ्यावयाची काळजी सांगितली. इ. ५वी ते ८वी चे विद्यार्थ्यांनी या दिवशी एका अनोख्या विषयाची माहिती ऐकली, हस्तलिखित कसे बनवावे. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे आणि शिल्पकार चरित्रकोश प्रकल्पाच्या सहसंपादक चित्रा नातू-वझे यांनी हस्तलिखित बनवण्याची कार्यशाळा घेतली. ‘हस्तलिखित म्हणजे काय?’ यापासून सुरुवात झालेल्या कार्यशाळेत मुलांनी हस्तलेखनातील बारकावे लक्षात घेतले. युवाविवेकचे कार्यकारी संपादक अक्षय वाटवे यांनी इ. ९वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर एक तासाचे व्याख्यान घेतले. व्याख्यानादरम्यान आणि त्यानंतरही मुलांनी अनेक प्रश्न विचारले. प्रत्यक्ष कृती आणि माहितीपर व्याख्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरले.

सर्व उपक्रमांच्या शेवटच्या सत्रात प्रचिती तळवलकर यांनी शिक्षणविवेकच्या सर्व मार्गदर्शकांचे आभार मानले. दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका आणि त्या त्या इयत्तांचे शिक्षक पूर्ण वेळ उपक्रमांस उपस्थित होते. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी उपक्रमांचा चांगला लाभ घेतला.

-रुपाली निरगुडे

[email protected]