आभा आणि आदित्य यांची लहानपणापासूनची पक्की मैत्री. अगदी बालवर्गापासून डब्यातही खाऊ वाटून खाण्यापासून कट्टी-बट्टची भांडणं करत बरोबरीनं मोठे झाले. आता दोघं नववीत आहेत. पुढचं वर्ष दहावीचं. अधिक अभ्यासाचं! त्यामुळे या वर्षी सगळ्या उपक्रमात भाग घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. गॅदरिंगमध्ये मिळून नाटकात काम केलं. नाटक मस्त झालं. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. बक्षीस मिळालं.

पण दुसर्‍या दिवसापासून मित्र-मैत्रिणी त्यांना चिडवायला लागले. एकमेकांच्या नावाने. आभानं ही गोष्ट सहजपणे घेतली आणि हसण्यावारी उडवूनही लावली. पण आदित्यच्या मित्रांनी मात्र त्याचा सतत पाठपुरावा केला आणि त्याला पटवून दिलं की ही मैत्री नाही. प्रेमच आहे आभाचं तुझ्यावर. तू सांग तिला ‘आय लव्ह यू’ नाहीतर ती जाईल तुझ्या आयुष्यातून कायमची.

तुम्हाला काय वाटतं? आदित्यनं सांगावं का आभाला तसं? काय होईल असं सांगितलं तरं?

मित्र-मैत्रिणींनो, आपणही या कथेत असतो. कधी आभा, कधी आदित्य तर कधी त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या भूमिकेत. आणि हा प्रसंग अगदी नित्यनियमाने घडणारा. कालपर्यंत भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलताना, वागताना सहजतेने वागणारे आपण अचानक एका वेगळ्याच नजरेनं या नात्याकडे बघायला लागतो. ‘मैत्री’ हे आयुष्यातलं सर्वांत सुंदर नातं. विश्‍वासाचं! हक्काचं! जगातल्या कुणालाही न सांगितलेली गुपितं उघड करावी खुशाल. वयात येताना, स्वत:च्या व्यक्तिमत्वाची ओखळ शोधताना, ध्येयस्वप्नांची वाट चालताना मैत्रीचा हात हा नेहमीच मदतीचा हात असतो. खर्‍या मैत्रीला आपल्या मनातील तगमग समजते. दु:ख जाणवतं, गरज उमगते. मग ही मैत्री दोन मुलांमधील असेल दोन मैत्रिणींमधील असेल किंवा एक मुलगा व एक मुलगी यांच्यातील असेल.

भिन्नलिंगी मैत्री ही व्यक्तिमत्व विकासाला नेहमीच पोषक असते. पण या मैत्रीचा एक पासवर्ड आहे. तो कसोशीनं पाळला तरच. ‘एस.एस.सी.’ यातला ‘एस’ - सपोर्ट म्हणजे आधार! बरोबरीच्या नात्यानं, समजूतीनं वागणारी व्यक्ती, गुणदोषांसहीत आपलं मानणारी व्यक्ती विनाअट आणि निरपेक्ष मैत्री म्हणजे सपोर्ट!

दुसरा ‘एस’ स्पेस, म्हणजे अवकाश! मतभेद झाले तरी टिकणारी मैत्री. पूर्णपणे वेगळ्या आवडीनिवडी असल्या तरी ते मोठेपणानं स्वीकारणारी मैत्री! जातपात, वर्णभेद, गरीब-श्रीमंत असा भेद न करणारी मैत्री! आणि ‘सी’ कन्सर्न म्हणजे काळजी. काळजी म्हणजे अविश्‍वास नाही. उलट शारीरिक, मानसिक भावनिक बदल समजून घेण्याचा प्रयत्न. निर्णयक्षमता भक्कम होण्यासाठी मिळून केलेला प्रगल्भतेचा प्रवास!

आता हा ‘एसएससी’ पासवर्ड सांभाळताना कसोटीचे क्षण येणार, मोहाचे क्षण येणार, सोबतचे आपल्या नात्याला प्रेमाचं लेबल लावण्याचा गॉगल देणारं. पण मैत्रीचा पाया भक्कम केल्याखेरीज आणि माझी ध्येयस्वप्ने पूर्ण होण्याआधी मी या सुंदर नात्याला कुठलेही नाव देणार नाही हा निर्धार माझा! कारण प्रेम ही एक जबाबदारी घेण्यास सक्षम होईन मगच मी याचा विचार करीन यावर ठाम राहीन.

माझ्या वयाचं हे वळण करताना मैत्रीची साथ सर्वांत महत्त्वाची. प्रेमाच्या पायर्‍यांवर अडखळताना मी हा हात अधिक घट्ट करीन. या प्रवासातला सर्वांत धोकादायक टप्पा आहे तो ‘आकर्षणाचा’. स्त्री पुरुष संबंधाविषयीचा अश्‍लील मजकूर, चित्रं, फिल्मस, पोर्नसाइट्स! आकर्षणात विकृत गोष्टींचा भरणा आहे, ही वाट मी याच निर्धारानं टाळीन.

हे सर्व करत असताना माझी माझ्या स्वत:शी घट्ट मैत्री होईल. माझ्या स्वभावाचा, बलस्थानांचा मला अभिमान वाटेल तर कमकुवत बाजूवर मी मेेहनत घेईन. माझं शरीर आणि मन हा माझा खजिना आहे तो उत्तम, निरोगी, पवित्र राहील यासाठी माझे प्रयत्न असतीलच, पण त्यासोबत माझा मित्र अथवा मैत्रिणीच्या शरीर आणि मनाचा मी तेवढाच आदर राखेन.

सभोवतालच्या वातावरणाचा धसका न घेता किंवा त्याचा ताण न येऊ देता, अर्थपूर्ण संवादातातून ही एसएससी मी विशेष गुणवत्तेसह यशस्वी करीन.

-सुनिता पिंप्रीकर

[email protected]