काही मुलांचा असा गैरसमज असतो की; परीक्षा, चाचण्या पुरेशा लांब असतानाच अभ्यास करून ठेवायला हवा. अभ्यासाबद्दलचे असे गैरसमज बाजूला ठेवून नियमितपणे, सातत्याने, रोजच्या रोज अभ्यास केला म्हणजे आपल्याला अभ्यासाचा आनंद मिळतो. आनंदाने वाचणे, आनंदाने लिहिणे यासाठी आपण वेळ काढायला हवा. अभ्यासाबद्दल टाळाटाळ करणे, ‘करू मग, वाचू मग, बघू मग’, असे म्हणून अभ्यास टाळतो. त्यामुळे अभ्यास साचून राहतो. कमी वेळात जास्त अभ्यास करण्याची वेळ येते. मग चिडचिड होते. आईबाबा आपल्याला रागवतात. हे सारे टाळण्यासाठी नियोजन आवश्यक असते.

अभ्यासाचे नियोजन कशासाठी?

अभ्यासाचे नियोजन कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर समजले की आपणही आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकू. त्यानुसार नियोजनाची अंमलबजावणी करू शकू.  आपल्याला उत्तम यश मिळवण्यासाठी अभ्यासाचे नियोजन आवश्यक आहे. परीक्षेसाठी अनेक विषय असतात. उत्तम यश मिळवण्यासाठी सर्वच विषयात उत्तम गुण मिळवण्याची गरज असते. काही विषय आपले आवडते असतात. काही विषयात आपल्याला चांगले गुण मिळतात. सर्वच विषयांकडे चांगले लक्ष देऊन त्यांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक, नियोजन व त्याची शांतपणे अंमलबजावणी आवश्यक असते. काही विषयांकडे आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्याचे दुष्परिणाम होतात. ते टाळण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. आपला आहार, आरोग्य आणि अभ्यास यांचा समतोल साधने ही अनेकदा तारेवरची कसरत ठरते. पण नियोजनामुळे तो समतोल साध्य होतो. नियोजनाचा एक फायदा म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो.

सामान्य  विद्यार्थी, असामान्य विद्यार्थी अशी विभागणी अनेकदा अयोग्य असते. पण ज्या विद्यार्थी मित्रांना आठवीपर्यंत कमी गुण मिळत आलेले आहेत, अशांनी दहावीच्या किंवा बारावीच्या स्पर्धा परीक्षांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी व उत्तम यश मिळवण्यासाठी आपल्या अभ्यासाचे डोळसपणे, काटेकोरपणे नियोजन करायला हवे. पाचवी ते नववीपर्यंत सत्र पद्धती असते, तर इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा ही सर्वच अभ्यासक्रमावर आधारलेली परीक्षा असते, हे लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक ठरते. 

अभ्यासाचे नियोजन म्हणजे काय?

नियोजन करणे म्हणजे आखणी करणे. अभ्यासाचे नियोजन करणे म्हणजे आपला अभ्यास कसा करायचं, हे अगोदर ठरवून त्याप्रमाणे नियमितपणे व निश्चयाने अभ्यास करणे होय. आपल्या दिनक्रमात शाळेत जाणे - येणे, शाळेच्या वेळा, आपला नियमित व्यायाम, खेळासाठी वेळ, अवांतर वाचनासाठी वेळ, मित्रांशी गप्पा, आईबाबा, ताई-दादा यांच्याशी गप्पा, छंदासाठी वेळ, आईबाबांना घरकामात मदत करण्यासाठी वेळ अशा अभ्यासासाठीही वेळ दिला पाहिजे. अनेकदा या सर्व गोष्टींसाठी आपण वेळ देतो आणि अभ्यास मागे पडतो. म्हणूनच अभ्यासाची आखणी करणे महत्त्वाचे आहे. 

इयत्ता दहावीच्या मित्रांसाठी अभ्यास नियोजन 

आपल्या अभ्यासाचे नियोजन कसे असावे, यासाठी इयत्ता दहावीच्या मित्रांचा प्रथम विचार करू या. सामान्यपणे ऑगस्टमध्ये चाचण्या, ऑक्टोबरमध्ये प्रथम सत्र परीक्षा, जानेवारीमध्ये पूर्वपरीक्षा व फेब्रुवारीत तोंडी परीक्षा व मार्चमध्ये बोर्डाची परीक्षा घेतली जाते, हे लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करता येईल. 

अ) प्रथम वार्षिक नियोजनाचा विचार करू या –

जून ते सप्टेंबर : हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात सर्व विषयांचे महत्त्वाचे घटक शिकवून होतात. वर्गातील अभ्यासाचा वेगही मोठा असतो.

ऑक्टोबर ते डिसेंबर :  या कालखंडात नवीन घटकांच्या अध्ययनाबरोबरच उजळणीकडे लक्ष द्यावे लागते. प्रश्नपत्रिका सोडवून स्वतःमध्ये सुधारणा करणे.

जानेवारी ते डिसेंबर : या कालखंडात पूर्णपणे उजळणी करणे. आपल्या उत्तरपत्रिकेचा अभ्यास करून परीक्षेच्या पूर्वतयारीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.

ब) आठवड्याचे वेळापत्रक:

प्रत्येक आठवड्यात वरीलप्रमाणे बदल लक्षात घेऊन आपले नियोजन करावे लागेल. सामान्यपणे दररोज कोणत्या विषयाचा अभ्यास करावा याचे आठवड्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व विषयांकडे लक्ष राहील. काही विषयांचा दररोज अभ्यास करणे, दररोज कमीत कमी तीन विषयांचा अभ्यास करणे हे लक्षात ठेवून आठवडाभराचे वेळापत्रक तयार करता येईल. अधिक अभ्यासासाठी शनिवार व रविवार यांचा उपयोग करता येईल. आपली अभ्यासाचा आढावा घेण्यासाठी एखादा दिवस राखून ठेवावा.

क)प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक : 

प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक ठरविताना आपली शाळा सकाळी असल्यास अभ्यासासाठी आपल्याजवळ दुपारी किती वेळ आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक ठरविता येईल. परीक्षा काळ, सुट्टी, शनिवार, रविवार यानुसार त्यात बदल होऊ शकेल.

सर्वसाधारणपणे दररोज अभ्यासाला प्रारंभ करताना सायंकाळी, रात्री झोपताना आपण आपल्या श्रद्धास्थान असणाऱ्या ईश्वरी मूर्तीला वंदन करावे. त्याचे स्मरण करावे. ‘ओमकार’ जप करावा. आपल्या मनाची एकाग्रता साधण्यासाठी व मनःस्वास्थ्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. श्री गणेश, श्री सरस्वती अशी आपली आराध्यदेवता कोणतीही असू शकेल. ‘श्रद्धावान लभते ज्ञानम|’ हे सूत्र लक्षात असावे. त्यासाठी फार मोठा वेळ द्यावा असे नाही. 

प्रत्येकाचे प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक वेगळे असू शकते. साधारणपणे १२ ते ५.३० अशी शाळेची वेळ असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे तयार करता येईल. हे वेळापत्रक लवचिक आहे. ते सक्तीचे नाही. त्यात बदल होऊ शकतो. पण ‘वेळच मिळत नाही’ असे म्हणणाऱ्या मित्रांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. अशा वेळापत्रकाचा एक नमुना पुढीलप्रमाणे : 

पहाटे ५.३० ते ७.०० : स्वच्छता, आवरणे, पाठांतर, वाचन

पहाटे ८.३० ते १०.३० : वाचन, लेखन, प्रश्नोत्तरे सोडविणे, नकाशांचा व आकृत्यांचा सराव

सायंकाळी ६.३० ते ७.३०: घरी करायला सांगितलेला त्या दिवसाचा अभ्यास(गृहपाठ) 

रात्री ९ ते १०.३० : (वेळेनुसार ११.३०) वाचन, लेखन, आकृत्यांचा सराव, अभ्यासाचा आढावा घेणे, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, पाठांतर कशाचे करावे हे ठरविणे.

आपल्याला अभ्यासाला एवढा वेळ मिळू शकतो. त्यापैकी किती वेळ प्रत्यक्ष अभ्यास करावयाचा, याचा निर्णय घेऊन नियोजन करणे आपणास शक्य होईल.

इयत्ता दहावीच्या मित्रांचे हे नियोजन लक्षात ठेवले तर तिसरी – पाचवी ते नववीच्या मित्रांच्या नियोजनात त्यानुसार फरक होईल. त्यात खेळ, अवांतर वाचन, छंदाची जोपासना इ.साठी वेळ देता येईल.

ज्ञान हे कणाकणाने व क्षणाक्षणाने वेचावे लागते, हे लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थी जीवनाचा आनंद आपल्याला घेता येईल. नियोजनाचे महत्त्व त्यासाठीच आहे. चला तर, याप्रमाणे तयारी करू या! 

-श्री. वा. कुलकर्णी

[email protected]

 अभ्यासावर बोलू काही सदरातील पहिला लेख वाचा खालील लिंकवर 

 वेळेचे महत्त्व