ठिकाण – म.ए.सो. भावे हायस्कूल.

मुलांच्या लेखनाला आणि त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्यासाठी म.ए.सो. भावे हायस्कूलमध्ये ‘शिक्षणविवेक’ आयोजित ‘हस्तलिखित तयार करणे’ आणि ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

सोमवार दि. ९ जुलै २०१८ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळात इयत्ता ५ वी ते ७ वीच्या मुलांसाठी ‘हस्तलिखित तयार करणे’ ही कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षणविवेकच्या रेश्मा बाठे आणि चित्रा नातू यांनी हे सत्र घेतले. शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांनी त्यांचा सत्कार केला. शाळेच्या शिक्षक प्रतिनिधी गायत्री जवळगीकर यांनी कार्यशाळा व्यवस्थित पार पडावी यासाठी खूप सहकार्य केले आणि ‘मुलांना या कार्यशाळेचा कसा फायदा होऊ शकतो?’ हेही सांगितले.

पहिल्या सत्रात इ. ५ वी ते ७ वीच्या वर्गातील प्रत्येकी १०-१० मुले कार्यशाळेत सहभागी झाली होती. या सगळ्याच मुलांना हा विषय नवीन होता. अनुक्रमणिका कशी असावी?, हस्तलिखित तयार करताना कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात?, कोणत्या घटकांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो? या संदर्भात रेश्मा बाठे यांनी मार्गदर्शन केले. अनुक्रमणिका, मनोगत, समाप्ती चिन्ह या छोट्या पण महत्त्वाच्या घटकांची माहिती करून दिली.

दुसऱ्या सत्रात चित्रा नातू यांनी हस्तलिखिताची सजावट, त्यासाठी लागणारे साहित्य, मांडणी याविषयी मार्गदर्शन केले. मुलांना बोलत करून, कार्यशाळेत त्यांचा हस्तक्षेप वाढवून आपण आपली कल्पनाशक्ती कशी योग्य प्रकारे वापरू शकतो, हे त्यांच्या लक्षात आणून दिले. हस्तलिखिताच्या विषयानुरूप मुखपृष्ठ कसे असावे? हे PowerPoint presentation च्या माध्यमातून सांगितले. त्यानंतर मुलांना ‘प्रदूषण’ हा विषय देऊन त्यांच्याकडे असेल ते साहित्य वापरून एका पानाचे हस्तलिखित तयार करायला सांगितले. कमी वेळ, मर्यादित साहित्य असे असले तरीही ‘एका पानाचे’ हस्तलिखित सर्व मुलांनी उत्तम तयार केले होते. वेळ कमी असला तरीही आपली कल्पनाशक्ती वापरून आपण इतके सुंदर काहीतरी बनवू शकतो, असे सगळ्यांनाच जाणवत होते. मुलांनी अगदी मिळून-मिसळून या कार्यशाळेचा आनंद घेतला. आपले हस्तलिखित आपल्या शिक्षकांकडे सोपवून या कार्यशाळेची सांगता झाली.

“ताणतणाव व्यवस्थापन”

विद्यार्थी इ. ९ वी तून इ. १० वीत गेले की त्यांना वेध लागतात ते ‘बोर्डाच्या परीक्षेचे’. अभ्यास वाढतो, तो करायचा वेळ वाढतो, इतर गोष्टीं व्यतिरिक्त अभ्यासाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि परीक्षा म्हटली की अभ्यासाचा ताण येतो, टेन्शन येतं. या विषयाला अनुसरून सोमवार दि. ९ जुलै, २०१८ या दिवशी म.ए.सो.भावे हायस्कूलमध्ये ‘शिक्षणविवेक’तर्फे ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अक्षय वाटवे यांनी ही कार्यशाळा घेतली.
ताण म्हणजे काय?, तणाव म्हणजे काय? हे त्यांनी सोप्या सोप्या उदाहरणामधून मुलांना सांगितले. दोन मुलांच्या मदतीने रुमाल वापरून त्यांनी एक छोटेसे प्रात्यक्षिक दाखवले. रुमाल म्हणजे टेन्शन, रुमालाच्या एका टोकाला बोर्डाची परीक्षा आणि दुसऱ्या टोकाला विद्यार्थी आणि त्या दोन्ही मुलांना दोन्ही बाजूने तो रुमाल ओढायला सांगितले. बोर्डाच्या परीक्षेचा किंवा कोणत्याही परीक्षेचा ताण येऊन, टेन्शन येऊन विद्यार्थी कसा खचत जाऊ लागतो, याचे चांगले आणि मुलांना पटेल असे उदाहरण दिले. कोणत्याही गोष्टीचा नको तितका विचार करून तणावात राहून मुले आत्महत्येचा विचार करू लागतात, ह्याही गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला.
हा ताण घालवण्यासाठी उपाय म्हणून आपण ध्यान करू शकतो, ओमकार करू शकतो, आपल्या आवडीचे छंद जोपासू शकतो, सायकलिंग करू शकतो असे अनेक उपायही त्यांनी सांगितले.

शेवटी ‘आम्ही पक्षी बघू आम्ही झाडे बघू...’ हे गाणे त्यांनी मुलांना शिकवले आणि या गाण्याने कार्यशाळेची सांगता झाली.  

-सायली शिगवण

[email protected]