तान्ह्या बाळांना कधी बोलताना पाहिले आहे का हो? नाही ना? पण तरी त्यांची बडबड आपल्याला मजेदार वाटते. थोडी मोठी झालेली मुले बोबडी बोलतात. बर्‍याचदा ती काय म्हणत आहेत आपल्याला कळत नाही, पण तरी आपण बरोबर तर्क लावू शकतो. हे कसे काय? मुळात मुले बोलायलाच कशी शिकतात? मातृभाषा शिकवायला आपण त्यांना जवळ घेऊन बसतो का? की चल रे आता मी तुला बोलायला शिकवते म्हणून, तरीही मोठ्यांचे ऐकून, भावंडांचे-मित्रांचे ऐकून मुले आपोपाप बोलायला शिकतात.

भाषा आणि वक्तव्य हे आपल्या कल्पना, आपले विचार आणि आपल्या भावना व्यक्त करण्याचे सगळ्यात महत्त्वाचे साधन आहे. मुलांसमोर रोज असे अनेक प्रसंग येतात; जिथे त्यांना नवनवीन शब्द, म्हणी ऐकायला मिळतात. त्यांचा अर्थ त्यांना प्रत्येक वेळेस आपण कदाचित समजावून सांगू नाही शकत. मग यासाठी आपल्याला काय करता येईल? तर इथे सगळ्यात मोठ्ठा मुद्दा येतो, तो म्हणजे वाचनाचा!

वाचाल तर वाचाल हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, पण ह्याचा खरा अर्थ आपल्याला मोठे झाल्यावरच काय तो कळला, नाही का? आई-बाबा कायम सांगायचे, भरपूर वाचन करा, म्हणजे भाषा सुधारेल, अभ्यास सोडून बाकी गोष्टींचीदेखील माहिती मिळेल. मग आताच्या संगणक युगात जगणार्‍या आणि कंम्प्युटर, मोबाईलवर खेळणार्‍या मुलांना वाचनाची गोडी कशी लागेल? आई-बाबांना जर कधी हातात पुस्तक घेऊन बसलेले बघितलेच नाही, तर आपण तरी मुलाने पुस्तक वाचावे अशी अपेक्षा कशी करायची?

* किमान अभ्यासासाठी का होईना, पण शालेय मुलांना वाचन हे आवश्यकच आहे. अगदी लहानपणापासून आपण त्यांना ही सवय लावली, तरच त्याचा त्यांना उपयोग होणार आहे.

* तुम्ही जेवढे त्यांना वाचून दाखवाल तेवढीच त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. त्यांचे बोट त्या अक्षरांवरून फिरवा, म्हणजे त्यांना कळेल की वाचन हे कायम डावीकडून उजवीकडे करायचे असते. पुस्तकाची पाने त्यांना उलटायला द्या, म्हणजे ते उजवीकडून डावीकडे पलटायचे असते, हेही त्यांना समजेल.

* नुसत्या बोलण्यातून कायम वापरलेलेच शब्द परत परत वापरले जातात, तर वाचनातून नवीन शब्दांची माहिती मिळते.

* गोष्टी वाचून दाखवल्यामुळे मुलांच्या मेंदूला चालना मिळते. खूप लहानपणी याची सवय झाली, तर नंतर त्यांना भाषा शिकणे खूप सोपे जाते. तसेच, त्यांची विचारशक्तीसुद्धा वाढते. हे असे का घडले, कधी घडले, मग आता पुढे काय होणार, असे अनेक प्रश्न त्यांना पडू शकतात. त्यांची उत्तरे आपण द्यायची की, त्यांनाच शोधायला लावायची, हे आपण ठरवू शकतो.

* लहान मुलांसमोरसुद्धा आपण पुस्तक घेऊन बसलो, तर त्याचादेखील त्यांना फायदा होतो. जरी त्यांना नुसतीच चित्रे बघायची असतील किंवा पाने उलटायची असतील, तरी हे सातत्याने रोज केले, तर त्यांची एकाग्रता नक्कीच वाढते.

* वेगवेगळी पुस्तके वाचायला घेतल्यावर मुलांची वेगवेगळ्या विषयांच्या माहितीत भर पडते. इतर मुलांबरोबरच्या गप्पांचे विषय वाढतात.

* एखादी गोष्ट जेव्हा आपण वाचतो, तेव्हा त्यातील पात्र, जागा या आपल्यासाठी खर्‍या होऊन जातात आणि आपण आपल्या मनात एक चित्र तयार करतो. तसेच, मुलेही करतात. यानेच त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो.

* गोष्टीतील पात्रांबरोबर घडत असलेले प्रसंग मुलांना कळले की, त्यांची स्वतःची त्या प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी होते. कुठल्या भावना कशा व्यक्त करायच्या, हे पण मुले पुस्तकांमधून शिकतात. तुझ्याबरोबर असे काही घडले तर तू काय करशील? असे त्यांना जेव्हा विचाराल तेव्हा त्यांच्या नक्की काय भावना आहेत, हे तुम्हाला जाणवेल.

* सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण जेव्हा मुलांना घेऊन वाचायला बसतो तेव्हा आपल्यात आणि त्यांच्यात एक सुंदर बंध निर्माण होतो. हा जर कायम ठेवायचा असेल, तर सहकुटुंब वाचनालयात जायला सुरुवात करा.

चला तर मग, कुठलेही पुस्तक उचला, मुलाला मांडीवर बसवा आणि एकत्र वाचनाची मजा घ्या!


शेजारील चित्र शक्य तेवढे विस्तारित करून सांगा. (ह्याने मुलांना किती समजले आहे आणि त्यांचा शब्दसंग्रह किती आहे, हे तुम्हाला कळेल).

(पहिल्या छायाचित्रात दिलेल्या प्रमाणे)मुलांसाठी अशी कार्डस् बनवा. ती पालथी ठेवा. आता कुठलीही 2-3 कार्डस् उचलून त्यापासून त्यांना एक गोष्ट तयार करायला सांगा. ती जितकी गंमतशीर असेल, तितकी चांगली. त्या गोष्टीचे त्यांना चित्र काढायला लावा किंवा एका मिनिटात गोष्ट बनवून, यातील किती कार्डस् ते वापरू शकतात असे बघा किंवा प्रत्येक चित्राचे वर्णन करायला कोणकोणती विशेषणे वापरता येतील, ह्याचा विचार त्यांना करायला लावा.

यामध्ये तुम्ही शेकडो चित्रांचा वापर करू शकता आणि त्याचबरोबर खेळण्याचे विविध प्रकारही निर्माण करू शकता.

-प्रियांका जोशी

[email protected]