चाफा - भाग १

दिंनाक: 09 Jun 2018 15:21:07


सुगंधी फुले देणारा तीही झुपकेदारपणे फुले देणारा चाफा. प्रत्येक फूल वेगवेगळे आणि त्यांचा सुगंधही भिन्नच असतो. त्यांचे प्रकारही आठ - नऊ आहेत. आजच्या चाफा - भाग १ मध्ये पहिले ४ प्रकार देत आहोत. उर्वरित प्रकार पुढील भागात देण्यात येतील.   

१. पांढरा चाफा – कुल- अॅपोसिनेसी. हा मध्यम आकाराचा ६-१० मी. उंचीचा पानझडी वृक्ष. मूळचा मेक्सिको आणि ग्वातेमालाचा असून पूर्वीपासून देवळांच्या परिसरात भारतात लावलेला दिसतो. चमेलीपेक्षा हा लहान वृक्ष. याला गर्द हिरव्या अंडाकार पानांचे गुच्छ. मथुरेच्या कुशाणकालीन प्राचीन लेण्यात हा कोरलेला दिसतो. याच्या फांद्या वेड्यावाकड्या असतात. साल खडबडीत असते. तिला खाच दिली तर पांढरा चिक निघतो. पाने साधी, समोरासमोर, मोठी रुंद भात्यासारखी. टोकास निमुळती असून पानांवरील शिरा उठून दिसतात. फुल सुगंधी शुभ्र, त्याच्या मध्यमभागी पिवळटपणा नसतो. याचा मार्च – एप्रिल व पुन्हा जुलै – ऑक्टोबर बहरण्याचा काळ. फांद्यांच्या टोकाला फुलांचे गुच्छ असतात. मद्रास, कलकत्ता, आसाम येथील बागांतूनही तो लावलेला दिसतो. फळे क्वचितच येतात. बिया अनेक असून त्यावर मऊ केसांचा झुबका असतो. लाकूड मऊ, ते ढोलक्यासाठी वापरतात. सुजेवर पानांचे पोटीस बांधतात, चिक संधिवातावर तर त्यात चंदनतेल, कापूर घालून खरजेवर लावतात. याच्या सालीचा लेप जखम व गळवे बरी करण्यास वापरतात. हा वृक्ष कलमाने सहज लावता येतो. घराच्या आवारात लावायला अति चांगला वृक्ष आहे. याला भारतात ‘जीवन वृक्ष’ मानून पवित्र मानतात. हा वृक्ष २५ इंचापेक्षा जास्त पाऊस, रेती व मुरमट जमिनीत देखील लागू शकतो. याला टेम्पल ट्री असेही म्हणतात. देवचाफ्याच्या फुलाला मध्यभागी पिवळसर झाक असते. राखाडी खोडाला पारंब्या असतात. याच्या फुलांचा देवाला हार वाहतात.

 

२.सोनचाफा – इतर चाफ्यांपेक्षा जास्त प्रमाणात सर्व राज्यात आढळतो. पिवळ्या रंगाची मऊ, मखमली पाकळ्यांचे केशरी, सोनेरी गंधाने भरलेली ही फुले कुणालाही भुरळ पाडतात, याला सुवर्णचंपकही म्हटले जाते. याची फुले काहीशी दाटीने, पानात लपलेली असतात. याचे शास्त्रीय नाव मायकेलीया चंपका आहे तर त्याचे कुळ मॅग्नोलीएसी आहे. हा शोभिवंत वृक्ष ३०-४० मी. पर्यंत वाढतो. सरळ वाढतो. आंब्याच्या पानासारखी पण मोठी पाने, हिरवीगार चिवट एकाआड एक असतात. माथा त्रिकोणी असतो. फुले द्विलिंगी, मोठी, फिकट किंवा पिवळी अथवा नारिंगी छटेची परिदले सुटी असतात. भारतात त्याचा आढळ हिमालयाच्या पायथ्याशी तसेच पश्चिम घाटात सदाहरित वनात नैसर्गिकरित्या वाढताना दिसतो, साल करडी जाड. फुलांचे किटकांद्वारे परागसिंचन होते. फळे घडामध्ये येतात. बोराच्या आकाराच्या फळात शेंगदाण्यासारख्या बिया असतात. त्या पेरून येणाऱ्या रोपांपासून फुले येण्यास बरीच वर्षे लागत असल्याने हल्ली कलमी रोपेच लावली जातात. फुले वर्षभर येत असली तरी मे – ऑक्टोबरमध्ये अधिक येतात ही त्याची खासियत पावसाळ्यात फुलणारे वृक्ष कमी म्हणून याचे जास्त कौतुक. डेरेदार दिसणाऱ्या या वृक्षाचे लाकूड नरम. ते कोरीव काम, छोटी अवजारे, होडी, ढोलकी, खेळणी, इत्यादी वस्तू बनवण्यासाठी वापरले जाते. फुलापासून तेल काढतात. ते संधिवात, डोकेदुखीवर लावतात. हे तेल अत्तरात व तेलात वापरतात. फुलांचे गजरे, हार तर बनवितातच. जळजळ कमी करण्यासाठी त्वचा विकारांवर फुलांचा उपयोग होतो. काही प्रकारचे रेशमी किडे सोनचाफ्यावर वाढवितात. पानांचा रस कृमिनाशक आहे, तर फळे व बी पायांवर भेगा पडल्यास लावतात. सुपारी बरोबर साल चघळतात. कर्नाटकातील रंगस्वामी अभयारण्यात सहाशे वर्षाहूनही जुनं चाफ्याचं झाड आहे. ते देवराईतीलच म्हणून येथील सोलीग आदिवासी त्याला देव मानतात. शिवरात्रीला त्याच्याभोवती फेर धरून नाचतात.

 

३.पिवळा चाफा (मायकेलिया) – ही सोनचाफ्याच्या वंशातील. ही सोनाचाफ्यापेक्षा लहान, पिवळसर पांढरी फुले असतात. याला लाल रंगाची फळे येतात. ही निलगिरी, अन्नमलाई, पलनी टेकड्यात सुमारे १५०० मी.च्यावर उंचीवर आढळतात. या जातीची झाडेही बागेत लावतात. याचे लाकूड फार कठीण टिकाऊ असते. घरबांधणीत व सजावटी सामानासाठी वापरतात. साल, पान, फुले यापासून तेल मिळते. या वंशातील जातींना आग सहन होत नाही. पावसाळी, गरम हवेत फुले चांगली येतात. यांच्या तेलाला छान सुगंध येतो. तो काहीसा चहाच्या किंवा संत्राच्या वासासारखा असतो. अत्तरात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख मौलिक पदार्थात त्याची गणना होते. जावामध्ये पानांपासून ०.४ % बाष्पनशील व तुळशीसारखा वास असलेले तेल मोठ्या प्रमाणात काढतात. बियांतील चरबी औषधासाठी उपयोगी असते.

 

४.हिरवा चाफा – सुगंधी हिरवा चाफा ही वेल-वर्गीय सदाहरित झुडूप प्रकारातील वनस्पती असून ती निमसदाहरित पट्यातही आढळते. याचे शास्त्रीय नाव अर्टाबॉट्रस हेग्झापेटालस असे आहे. हिला वर्षभर जरी फुलं येत असली तरी पावसाळ्यात तिला विशेष बहर असतो. हिरव्या रंगाचे हे फुल काही दिवसांनी रंग बदलून पिवळे होते. हिरव्यागार पानांत ही पिवळी फुले खूप शोभून दिसतात. फुलाचा मनमोहक, गोडसर सुगंध मन, वातावरण उल्हासित करतो. पाने साधी एकाआड एक चकचकीत, चिवट असतात. फुले एकाकी किंवा जोडीने येतात. त्यांची देठ आखूड असतात. ऑगस्ट ते सप्टेंबरात ती येतात. फुले जमिनीकडे तोंड करून लटकलेली, सहा पाकळ्या काहीशा मांसल असतात. त्यांची रचना फार सुंदर असते. याच्या सहा पाकळ्यांपैकी आतल्या तीन पाकळ्या बाहेरपेक्षा लहान असतात. फुलातील मनमोहक सुगंधाचा वापर तेल व उदबत्ती बनविण्यासाठी केला जातो. ती खूप लोकप्रिय आहेत. वेलीला फुलोऱ्याच्या दांड्यावर आधारासाठी हुकासारखा भाग असतो. तो हुक दुसऱ्या झाडावर अडकवून वेळ वाढत असते. फुल गळून पडले की त्याठिकाणी फळांचा घोस लागतो. त्याला घोसफळ म्हणतात. ही फळे मध्यम आकाराची बोराएवढी असून ती प्रथम हिरवी मग पक्व झाल्यावर पिवळसर होतात. त्यांना गोड सुगंध असतो. प्रत्येकात एक बी असते. आपण ही फळे खात नाही, पण माकडे, पक्षी ती खातात. पाकळ्यांचा चहा देखील केला जातो आणि इतर औषधांमध्येही त्यांचा वापर करतात. बियांपासून नवीन झाडांची निर्मिती करता येते. याच्या सुगंधी फुलांसाठीच बागेत लागवड केली जाते. दाब कलामांनीही याची लागवड केली जाते. याला जमीन कसदार, खतमिश्रित असावी लागते. याचे अनेक प्रकार भारतात लागवडीत आहेत. मलायात पानांचा काढा पटकीवर देतात. फिलिपिन्समध्ये या झाडाचा औषधात वापर करतात.

-मीनल पटवर्धन

[email protected]

 

पारिजात फुलाविषयी माहिती सांगतायेत मीनल पटवर्धन खालील लेखात. 

पारिजात