महासागर, असं म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे पाण्याचा एक विस्तृत आणि अथांग असा साठा. परंतु महासागर हा यापेक्षा सुद्धा जास्त गहन आणि गूढ असा विषय आहे. याचं कारण असं आहे की, शास्त्रज्ञांच्या मते मनुष्याने सुमारे ९० टक्के जमीन ही पिंजून काढली आहे, तसेच त्याने फार फार दूरपर्यंत म्हणजेच अवकाशाच्या अथांग पोकळीत सुद्धा मजल मारली आहे. परंतु आज तंत्रज्ञान इतकं पुढे जाऊन सुद्धा मानवाला अजून या महासागराचा वेध घेणं मात्र शक्य झालेलं नाहीये. मनुष्याने या महासागरांचा फक्त सुमारे १० ते २० टक्केच भाग शोधून काढलाय आणि अजून उर्वरित भाग आपल्याला अज्ञात आहे. चला तर मग माहिती घेऊयात या महासागराच्या पोटात काय काय दडलंय त्याची.

महासागर म्हणजे पृथ्वीवर असलेल्या ७० टक्के पाण्याचा फार मोठा साठा. सुमारे ७० टक्के पृथ्वीही याच महासागरांनी व्यापली आहे. पृथ्वीच्या जडणघडणीत आणि मनुष्याचा जीवनावर हा या महासागरांनी फार प्रभाव गेली अनेक सहस्त्र वर्षे पडलेला आहे. पृथ्वीवर कधीतरी या महासागरात भरती ओहोटी सुरू झाली असावी आणि त्यातूनच उभयचर जीव निर्माण झाले असावेत, आणि सजीव सृष्टीची पुढे वाटचाल सुरू झाली असावी. त्याच प्रमाणे या महासागरांमुळेच पृथ्वीवर एक वेगळ असं जलचक्र सुरू झालं आणि त्यातूनच पाऊस आणि नद्या यांची निर्मिती झाली. या सागरामुळेच पृथ्वीवरील एकंदर तापमान हेसुद्धा या सर्व जीवसृष्टीला पोषक झालं आहे. त्यामुळेच एकंदरच या महासागराचा पृथ्वीच्या जडणघडणीत एक मोलाचा वाटा आहे.

या महासागरात नक्की काय काय आहे? असा प्रश्न मानवाला फार पूर्वीपासून पडत आलेला आहे आणि त्याचमुळे त्याने त्याला त्या त्या वेळी जमेल त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आपल्याला आढळून येतो. आजकाल मनुष्याने जी काही तांत्रिक प्रगती केलीये त्या साहाय्याने मानव हा या सागराच्या अगदी तळापर्यंत जाऊन पोहोचलाय आणि त्याचाच परिणाम म्हणून जवळपास दर रोज एखादी नवी प्रजाती मानवाला समुद्र तळाशी सापडते आहे. त्याच प्रमाणे लाखो वर्षांच्या काळात झालेल्या उलाढालीमुळे खनिज तेलाचे फार मोठे साठे हेसुद्धा या समुद्र तळाशी लपलेले आहेत. मानवाने तंत्रज्ञान वापरून ते सुद्धा हस्तगत केलेले आहेत आणि नवीन साठ्यांचा शोध रोज चालू आहे. विविध खनिजे, विविध जाती-प्रजाती, मानवाच्याच यंत्रांचे जसे की जहाजे (उदा – टायटॅनिक) असे सांगाडे, महासागरीय वायू साठे (जसे की मिथेन वायूचे साठे), महासागराच्या तळाशी असलेले प्रचंड ज्वालामुखी आणि अनेक अशा अज्ञात गोष्टी या महासागरांनी आपल्या पोटात ठेवल्या आहेत.

आता मात्र या महासागराचा जीव हा गुदमरू लागल्याच आपल्याला गेल्या काही वर्षात लक्षात आलंय. मनुष्याने गेल्या शतकात केलेली तांत्रिक प्रगती आणि त्याचप्रमाणे एकंदरच मनुष्याची वाढलेली गणती यामुळे सर्वच नैसर्गिक साधने यांवर ताण येऊ लागलाय. तसाच तो महासागरांवर सुद्धा आलेला गेल्या काही वर्षात दिसतोय. जसे की समुद्र तळाशी असलेल्या कोरल या प्रजाती आणि त्यावर जगत असलेले लाखो विविध प्रजातींचे प्राणी यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. औद्योगिक कारखान्यांमधून सोडण्यात येणारे दूषित पदार्थ आणि कचरा हे नदीतून मग समुद्रात सामावतात आणि त्यामुळे सुद्धा अनेक प्रजातींना धोका निर्माण झालाय. महासागरांना असलेला सर्वांत मोठा धोका म्हणजे प्लास्टिक. मनुष्याने निर्माण केलेला कचरा हा शेवटी समुद्रात जातो आणि त्याचे लाखो लहान कणांमध्ये रूपांतर होते. आणि मग मासे त्याला अन्न समजून खातात आणि कदाचित पुढे मनुष्यसुद्धा त्याचे सेवन करतो. महासागरांवर आधारित जवळजवळ ९० टक्के प्रजातींच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या, तुकडे, आणि इतर प्लास्टिकच्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे हा महासागरी पर्यावरणास फार मोठा धोका आहे. यावरील “Plastic Ocean” नावाचा लघुचित्रपट जर पाहायला मिळाला तर नक्की पाहा. त्याचप्रमाणे BBC ने प्रदर्शित केलेले “Blue Planet-भाग १, २” हे सुद्धा पाहायला विसरू नका. यापैकी "Blue Planet-भाग २” सध्या सिनेमाघरात पाहायला मिळू शकेल.

चला तर मग या जागतिक महासागरदिनाच्या निमित्ताने या महासागराच महत्त्व अधिकाधिक जाणून घेऊयात आणि “मच्छली जल की रानी है, जीवन उसका पानी है!” या लहानपणी शिकलेल्या कवितेचा विचार कायम मनात ठेवून आपण आपल्या परीने महासागर संवर्धनाचे जमेल तितके काम करायला हातभार लावूयात.     

-अक्षय भिडे

[email protected]