प्रत्येकच पालक आपल्या मुलाबरोबर समृद्ध होत असतो. आमचंही काही वेगळं नाही, पण तरीही तीन वर्ष वयाच्या लेकीला आलेला कंटाळा घालविण्यासाठी मला स्वतःला जे सुचलं ते मला अधिक समृद्ध करून गेलं आईपेक्षाही माणूस म्हणून... आपणही वयाच्या टप्प्यावर घडत असतोच की सतत... तो हा प्रवास... हल्लीच्या संगणक युगात जे शोधू ते सापडतं. पण मग त्यातून आपली कल्पकता कमी होते असं मला वाटलं आणि स्वतःला जे सहज सुचलं ते करण्याचा प्रयत्न केला. वस्तुतः चित्रकला किंवा हस्तकला याच्याशी कोणताही संबंध नसताना मी आणि माझ्या लेकीने छान गोष्टी केल्या. ज्यातून तिलाही खूप काही शिकायला मिळालं.

१. घराच्या भिंतीवर तिने आणि तिच्या बाबाने रंगीत फराटे मारून ठेवले होते. ते तिला प्रोत्साहन असलं तरी भिंतीचा बदललेला चेहरा मलाच अस्वस्थ करून गेला. मग मी तिलाच बोलावलं. तिने तिचे चिमुकले अंगठे निळ्या रंगात बुडवून भिंतीवर उमटवले होते, ते मध्यवर्ती ठेवून मी त्याची तिला फुलपाखरं करायला शिकवली. नुसताच एक लालेलाल मोट्ठा अर्धगोल भिंतीवर विराजमान झाला होता; त्याला पाकळ्या काढून आम्ही त्याचं फूल केलं! आपणच बिघडवलेल्या गोष्टी कल्पकलतेने सुधारण्याचं हे तंत्र आम्ही दोघीही शिकलो यातून आणि चित्रकलाही झाली, भिंतही आता छान दिसू लागली.

२. आमच्या कोकणातल्या घराचं बांधकाम सुरू होतं. ती तिथे कंटाळून गेली. काय करावं सुचेना. शेतात छोटी छोटी रानफुले फुलली होती. तिने त्यांना हात लावून चालेल याची आधी खात्री करून घेतली. झाडावरची फुलं नाही तोडायची, खाली पडलेली वेचूया असं म्हणून आम्ही फुलं वेचली. मातीच्या घराचं बांधकाम असल्याने मातीला तोटा नव्हता.  त्या ओल्या मातीत तिने हात घातला आणि मस्तपैकी खेळली आधी. समाधान झाल्यावर नंतर त्या मातीचे चिमुकले गोळे केले तिने. त्यात आम्ही एक एक रानफुल खोचलं. आता हे ठेवायचं कशात आई? स्वाभाविक प्रश्न. बांधकामावर एक बांबूचा तुकडा पडला

होता मधोमध कापलेला. तो उचलून आणला आणि त्याच्या मधल्या बेचक्यात हे फुलांचे गोळे मांडून ठेवले. जपानी संस्कृतीत करतात तशी ही आमची सजावट अचानक झाली.

३. तयार पुस्तकं आपण वाचतो, मुलंही वाचतात. माझ्या डोक्यात आलं की आपण तिलाच पुस्तक तयार करायला शिकवू या. तिला ससा आवडतो.  त्यामुळे सशाचा चेहरा दिसेल. आकारात ६-७ पाने कापली. त्यावर ससा काढला आणि तिने तो रंगवला. आत मी एक छोटी कविता करून लिहिली. प्रत्येक पानावर एक ओळ- मी आहे ससा, माझे नाव बंटी, गाजरे खातो

खूप, रोजच माझी पार्टी. ही पाने तिने गोंदाने चिकटविली आणि झालं पुस्तक तयार.  त्याचे नाव ससुचे पुस्तक! ते हातात धरून ती आता मनातल्या हव्या त्या गोष्टी सांगत, वाचत बसते. आपण तयार केलेलं पुस्तक हा आनंद तिला मोठा होता. 

४. आजोबांनी पूजा झाल्यावर रिकामी काडेपेटी तिच्या हातात ठेवली. त्याचा आम्ही मिठाईचा डब्बा तयार केला,  वरच्या बाजूला कागद रंगवून लावला, त्यावर तिचं  नाव लिहिलं म्हणजे ते दुकानाचे नाव अशा थाटात! आत तिने छोटे छोटे गोल काढून रंगविले. आमची मिक्स मिठाई बसली खोक्यात जाऊन!

५. घराच्या भोवती शेवरी फुटून कापूस उडत होता. त्याच्या फुटलेल्या शेंगा  अगदी होडीसारख्या दिसतात! झालं. मी लगेच टी शंग आणली उचलून, लेकीला माझे कापून दिले कागदाचे, तिने कापले, रंगविले. ते होडीत ठेवले, वर एक झेंडाही लावला. आमची “सागरकन्या" तयार झाली पाण्यात जायला आणि मासे पकडायला!!!

ही प्रक्रिया झाली हस्त आणि चित्रकलेची! पण यातून लेक काय शिकली????

१. घराच्या अवतीभोवती किंवा घरातही जे सहज उपलब्ध आहे त्याचा कल्पक वापर करणे, त्यासाठी शोधक नजरेने आजूबाजूला फिरणे, एका वस्तूचे दुसऱ्याशी असलेले साम्य ओळखणे उदा., फुटलेली शेंग आणि तिचा होडी सदृश्य आकार इ.

२. आपण स्वतः येईल तसे गाणे वा गोष्ट रचू शकतो ज्यातून आपल्याला आनंद मिळतो हे ती ससूच्या पुस्तकातून शिकली. 

३. कोकणातील घराभोवती व परिसरात असलेली रानफुले तिला परिचयाची झाली. त्यांचे रंग, पोत, पाने हे तिला समजले. 

मातीचा गोळा करताना नुसता चिखल करून चालणार नाही तर पाण्याचे प्रमाण किती असावे आणि गोळा नेमका कसा वळावा याचा निभाव तिने घेतला. बांबू, लाकूड यांचा फरक तिला माहिती झाला. 

४. होडी तयार करताना मी तिला हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला की समुद्रावर आपण ज्या मोठ्या होड्या पाहतो त्यांना बरेचदा हौसेने नावे दिलेली असतात. सागरकन्या हे नाव मला सुचलं, पण मी ते दोन्ही शब्द आणि त्यातून तयार झालेला एक सामासिक शब्द आणि त्याचा आशय हे समजावून सांगितलं. भाषेची छटाही शिकली ती.

आणि यातून माणूस म्हणून मी हे शिकले की मूलही आपल्याला शिकवतं आपल्या नकळत. तिच्या कल्पना, तिचे विचार यालाही यात पुरेपूर वाव होता आणि त्याचा मी आदर केला हे मला महत्त्वाचं वाटतं.

या गोष्टी तुलनेने छोट्या वाटू शकतील, पण ही प्रत्येक हस्तकला आणि चित्रकला आम्हाला दोघीना समृद्ध करून गेली आहे. 

मुलीपेक्षाही मैत्रिणी म्हणून आम्हाला ती जोडून गेली.

  

- डॉ. आर्या  आशुतोष  जोशी  

[email protected]