किती संथपणे गंगा वाहत होती...! सायंकाळी अस्ताचलाला चाललेल्या सूर्यदेवाचं प्रतिबिंब पाण्यावर तरंगत होतं आणि दूरवर क्षितिजाकडे उदास नजरेने पाहत बसला होता एक तपस्वी...!

हा कोणी सामान्य साधू नव्हता बरं! हा तर काशीविश्वेश्वराचा मुख्य पुजारी! प्रकांडपंडित! कलियुगाचा साक्षात बृहस्पती असा नावलौकिक मिळवलेला वेदशास्त्रपारंगत आचार्य गागाभट्ट!

पण... पण, आज आचार्य उदास होते... खिन्न होते... विमनस्क होते. या भागीरथीच्या काठावर त्यांच्याच पणजोबांनी उभारलेलं भव्य शिवमंदिर औरंगजेबाच्या सुलतानी धर्मवेडापायी तुकडे तुकडे होऊन भंग पावलं होतं.

काय ही भयानक अवस्था या देशाची! धर्माची! समाजाची! कोटी कोटी हिंदूंच्या देशात येऊन त्यांच्या सर्वश्रेष्ठ तीर्थस्थानी त्यांच्याच महादेवाची ही विटंबना! हे कोणीच अडवू शकत नाही? त्याच्याशी कोणीच टक्कर देऊ शकत नाही? या राक्षसांविरुद्ध कोणी आवाजही उठवू शकत नाही ? कुठेच चीड नाही? संताप नाही? कुणाचंच रक्त कसं सळसळत नाही?

प्रश्न! प्रश्न! प्रश्न! गागाभट्ट विचारमग्न होते. आता सूर्य पुरता मावळला. चहूकडे अंधाराचं साम्राज्य! त्याच वेळी कुणी सुवासिनी घाटाच्या पायऱ्या उतरत नदीच्या पाण्यात उतरली. आपल्या ओंजळीत आणलेली एक मिणमिणती पणती तिने गंगेच्या लाटांवर अलगद सोडून दिली. नदीला वंदन करून ती ओल्या पावलांचे ठसे उमटवीत निघून गेली. तिने लाटांवर सोडलेल्या त्या दिव्याची ज्योत पाण्याच्या लाटांवर तरंगत प्रवाहाच्या दिशेने पुढे पुढे जात होती. दूर जाणाऱ्या तेजाच्या त्या बिंदूकडे गागाभट्ट कितीतरी वेळ एकटक पाहत होते.

... आणि अचानक लक्कन वीज चमकावी तसा त्यांच्या मनश्चक्षूसमोर एक वीर उभा राहिला.

दूर दूर दक्षिण दिशेला, सह्याद्रीच्या अक्राळविक्राळ पसरलेल्या पर्वतरांगांमध्ये आणि घनदाट अरण्यांमध्ये हाती तलवार घेऊन उभा असलेला एक बंडखोर युवक... राजा शिवाजी!

खरं तर किती वर्ष हे नाव कानावर पडत होतं... त्याने म्हणे आदिलशाही सरदार अफजलखानाला संपवलं... त्याने प्रत्यक्ष बादशहाच्या मामाच्या महालात शिरून त्याची बोटं छाटली... त्याने मुघलांची संपन्न नगरी सुरत लुटून फस्त केली.... आणि एकदा तर त्याने कहरच केला. खुद्द आग्य्रामध्ये औरंग्याच्या भर दरबारात अनेक राजे माना खाली घालून शेळपटासारखे उभे असताना हा दख्खनचा वाघ असा काही गरजला, की सारा दरबार हादरला.

इकडचे कोणी त्याला म्हणत असतील दगाबाज, खुनी, लुटारू... पण त्याच्या राज्यात रयत सुखी आहे. मंदिरं सुरक्षित आहेत... आयाबहिणींची इज्जत सुखरूप आहे... दुर्गादुर्गांवर परममंगल भगवा ध्वज विराजतो आहे. चार पातशाह्यांच्या उरावर बसून स्वातंत्र्याचं अनमोल रत्न मिळवलं आहे त्यानं! बस्स... ठरलं! शून्यातून ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या त्या नरवीराच्यामागे आपण आपली धर्मशक्ती उभी करायची.

 गागाभट्ट मनी नवा संकल्प घेऊन उभे राहिले. आता पुढचा प्रवास दक्षिणेकडे... रायगडच्या दिशेने...

पण हे तर पूर्वीसुद्धा घडलं होतं. या आधीही उत्तरेकडून दक्षिणेकडे आला होता एक युवराज... राज्य गमावलेला युवराज! छत्रसाल बुंदेला! तो शिवाजीराजांना भेटला. राजांचा हात त्याच्या पाठीवरून फिरला. निखाऱ्यावर बसलेली राख भुर्रकन उडाली. आतला अंगार धडधडून पेटला आणि त्या भारलेल्या युवकाने अवघा बुंदेलखंड स्वतंत्र केला.

असाच एक सरस्वतीपुत्र दक्षिणेत आला होता. कविराज भूषण! आणि पौर्णिमेच्या चंद्राला पाहून सागराला उधाण यावं; तसं शिवरायांचं दर्शन होताच महाकवी भूषणाची प्रतिभा उचंबळून आली आणि एक अप्रतिम महाकाव्य जन्माल आलं - ‘ शिवभूषण!’.

आणि आता रायगडावर आगमन झालं होतं गागाभट्टांचं! सुवर्णाच्या कोंदणात जडवलेल्या हिऱ्याप्रमाणे स्वराज्याच्या गाभ्यात राजधानी रायगड मर्दानी सौंदर्यांने झळकत होता. राजाचं कार्यकर्तृत्व पाहून गागाभट्ट फार फार प्रसन्न झाले.

राजांनी, आऊसाहेबांनी आणि अवघ्या मंत्र्यांनी आचार्यांचं मन:पूर्वक स्वागत केलं आणि ते काय सांगतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं.

‘‘राजे!’’, आचार्य बोलू लागले, ‘‘तुम्ही महापराक्रम केलेत. शतपटीने बलवंत शत्रूला नामोहरम केलेत. स्वराज्याची निर्मिती केलीत, पण राजे.... अजूनही पातशाही सेवेत लाचारी करण्यात धन्यता मानणारे लोक तुम्हांस राजा मानत नाहीत. डोंगरदऱ्यामधला अडाणी गुंडांना घेऊन लुटालूट करणारा कुणी एक बगावतखोर! अशी विटंबना करणारेही आहेतच. म्हणून म्हणतो राजे, तुम्ही सिंहासनावर स्थानापन्न व्हा! तुमच्या राज्यास धर्ममान्यता मिळू द्या!’’

‘‘आचार्य, क्षमा करा!’’, हात जोडून राजे गागाभट्टांपुढे उभे राहिले. ‘‘हे राज्य माझं एकट्याचं नाही. हे तो श्रींचं राज्य आहे. या मऱ्हाटी रयतेचं राज्य आहे. मी केवळ एक निमित्तमात्र! इथल्या भूमिपुत्रांच्या अद्वितीय शौर्यानं आणि अलौकिक त्यागानं हे स्वराज्याचं अमूर्त स्वप्न साकार झालं. मी सुवर्णसिंहासनावर बसण्यासाठी हे स्थापन केलेलंच नाही.’’

‘‘राजे! यशाच्या उत्तुंग शिखरावर असतानाही अशी नम्रता पाहून मी गहिवरून गेलो आहे. पण राजे, हौस म्हणून नव्हे; तर या भूमीची आवश्यकता म्हणून तुम्हाला हा संस्कार ग्रहण केलाच पाहिजे. वाटल्यास ही धर्माची आज्ञा आहे असं समजा.’’

‘‘पण आचार्य...’’ राजे काही बोलणार, तोच त्यांच्या कानावर शब्द पडले, ‘‘शिवबा!’’ राजांनी पाहिलं - जिजाऊसाहेब आपल्या थरथरत्या स्वरात काही सांगत होत्या. राजे आऊसाहेबांजवळ गेले. त्या अडखळत का होईना, पण बोलत होत्या.

‘‘शिवबा, तुमच्या मनात काय चाललं आहे ते मी जाणते. हे स्वराज्य उभं करताना अनेक वीर धारातीर्थी पडले. त्यांना मरण मिळालं आणि मला मात्र सिंहासन? ही कल्पना तुम्हांला अस्वस्थ करते आहे, हो ना?’’

राजांनी आपल्या वृद्ध मातेचा हात हाती घेत मानेनेच होकार दिला, मात्र आऊसाहेब बोलतच होत्या.

‘‘राजे! हे सारे वीर तुमच्या शब्दांसाठी आपल्या प्राणांची आहुती देते झाले. हा अहंकार सोडा. ते गेले ते या स्वराज्यासाठी. त्यांची कीर्ती अस्मानाला भिडवण्यासाठी... राजे! पण हे राज्य बलशाही होण्यासाठी, चहूदिशांना विस्तार पावण्यासाठी, राजसत्तेची प्रवाही परंपरा निर्माण होण्यासाठी, इथे सिंहासन स्थापन व्हायला हवं. राजे, स्वत:साठी नाही, माझ्या किंवा आचार्यांच्या आग्रहासाठी नाही, तर निदान तुमच्या जिवलग सवंगड्यांच्या अतृप्त आत्म्यांना शांती लाभण्यासाठी तरी तुम्हांला छत्रपती व्हायला हवं.’’

आणि रणांगणात वीरमरण स्वीकारणाऱ्या जिवलगांची चित्रं राजांसमोर क्षणात तरळून गेली. जणू असीम आकाशाच्या पडद्यामागून त्यांचा सखा तो तानााजी, तो मुरारबाजी, तो बाजीप्रभू देशपांडे आपल्या मूक नजरेने विनवणी करत होते, ‘‘व्हय राजे! हे व्हायलाच हवं!’’ राजांनी आऊसाहेबांच्या हातातून आपला हात सोडवून घेत त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि पुटपुटले, ‘‘माँसाहेब! जशी आपली आज्ञा. आम्हांस हा प्रस्ताव मान्य आहे.’’

आणि हिंदू भूमीच्या सहस्र वर्षांच्या इतिहास प्रवाहातील तो तेज:पुंज दिवस उगवला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ म्हणजेच दिनांक ६ जून १६७४. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या पैलतीरापर्यंत पसरलेली ही भारतभूमी रोमांचित झाली. आज तिचा लाडका सुपुत्र सिंहासनाधीश्वर सार्वभौम छत्रपती होणार होता.

पहाटेचा अंधार अजून सरला नव्हता. मात्र, रायगडाच्या माथ्यावर आनंदाला उधाण आलं होतं. आधी पार पडला राज्याभिषेक. गंगा, यमुना, गोदा, नर्मदा अशा सप्तगंगा राजांना अभिषेक करून धन्य झाल्या. आता तो क्षण जवळ आला, सिंहासनारोहणाचा!

सारी राजसभा तुडुंब भरली होती. जो तो टाचा उंचावून, मान वर करून; तो सुवर्णक्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आणि फक्त तेच का? या भूमीतील वनवासी, नगरवासी, मर्द मावळे, माताभगिनी, आबालवृद्ध सारे सारे जण या मंगल घटिकेसाठी आतुर झाले होते. तो पूर्वेला उभा असलेला तोरणा, तो राजगड, तो सिंहगड, तो पुरंदर, तो तिकडे सागरात उभा असलेला सिंधुदुर्ग, तो विजयदुर्ग यांच्याही नजरा खिळल्या होत्या दुर्गराज रायगडाकडे!

...आणि राजांनी राजसभेत प्रवेश केला. ते तेजस्वी पाणीदार नेत्र, ते धारदार नाक, ते कपाळीचे रेखीव शिवगंध, ती जिरेटोपावरील झुलणारी मोत्यांची झालर, ती गळ्यातील कवड्यांची माळ, कमरेला भवानी तलवार, पाठीवर धनुष्य आणि हातात विष्णुमूर्ती... त्या क्षणी राजा असा दिसला की, साक्षात विष्णूच!

 अत्यंत धीरगंभीर पावलं टाकत राजे सिंहासनासमोर आले. राजांनी त्या आसनाला अत्यंत मनोभावे वंदन केले आपल्या चरणांचा त्याला स्पर्श होऊ न देता राजे स्थानापन्न झाले. गागाभट्टांनी राजांच्या मस्तकी सुवर्णछत्र धरले आणि उच्चस्वरात गर्जना केली, ‘‘महाराज! प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रियकुलावतंस, गोब्राह्मण प्रतिपालक, सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की... जय ! जय !! जय !!!’’

रायगडावर निनादलेला जयजयकार गगनाला भिडला. तिथून त्याचे उमटलेले प्रतिध्वनी सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर आणि सिंधुसागराच्या तुफानी लाटांवर आदळले. त्या रणनादाने शत्रूच्या भूमीत जणू धरणीकंप झाला. जणू हा महाराष्ट्र देश त्यांना गर्जून सांगत होता, ‘‘या मुलुखावर सैतानी आक्रमण करणाऱ्या उन्मत्त सैतानांनो, ऐका... आता ही भूमी निराश्रित नाही. आता इथे आहे आमचा राजा, आमची सत्ता, आमचं सिंहासन, आमची राजधानी, आमचा ध्वज, आमचं सैन्य... आता आम्ही गुलाम नाही. परतंत्र नाही.’ 

त्याच क्षणी पूर्वेला सूर्यनारायण उदयास आला, पण रायगडाच्या तेजाने त्या तेजोभास्कराचेही डोळे दिपून गेले आणि गंगासागराच्या आनंदडोहात तरंग उमटले.

‘‘रायगडावर हर्ष दाटला

 खडा चौघडा झडे

शिंगाच्या ललकारीवरती

भगवा झेंडा उडे

शतकांच्या यज्ञातून उठली

एक केशरी ज्वाला

दहा दिशांच्या हृदयामधूनी

अरुणोदय झाला

अरुणोदय झाला...’’

- मोहन शेटे

[email protected]