मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही टी.व्ही.वर बातम्यांमंध्ये सिमला शहरात असलेल्या पाण्याच्या तुटवड्याबद्दल ऐकलं असेल. पाण्याच्या टँकरवरून होणाऱ्या मारामाऱ्या कधी कधी पाहात असाल. अजमेरसारख्या ठिकाणी पाण्याच्या ड्रम्सना कुलुपं लावण्याचे प्रकारही पाहिले असतील. रेल्वेने, बसने कुठे जात असाल तर कचऱ्याच्या ढिगांमध्ये असणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पाहिला असेल. व्हेलसारखे मोठे मासे किनाऱ्यावर मरून पडतात त्यांच्या पोटात सापडणाऱ्या प्लास्टिकबद्दल ऐकलं असेल. आता मी हे सगळं तुम्हाला का सांगते आहे? कारण या सगळ्याचा संबंध आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाशी आणि पर्यायाने आपल्या अस्तित्वाशी, आपल्या तब्येतीशी आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल की ५ जून हा जागतिक पर्यावरणदिन किंवा वसुंधरादिन म्हणून पाळला जातो. आता असा दिवस आपल्याला पाळावा लागतो म्हणजे त्याच्यामागे काहीतरी कारण असणारच. तर ही कारणं आणि मग आपल्या सगळ्यांचं आयुष्य अधिक सुखकारक होण्यासाठी आपण कुठच्या छोट्या आणि साध्या गोष्टी करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. 

पर्यावरण म्हणजे काय? सोप्या शब्दांत आपल्या बाजूच्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी. जमीन, आकाश, हवा, पाणी, झाडं, प्राणी, पक्षी. आपण या गोष्टींचं अस्तित्व बिघडवलं आहे. ज्याचा त्रास आपल्यालाच होतो आहे आणि भविष्यात खूपच होणार आहे. हे सगळं आपण कसं बिघडवलं? आपण वेगेवेगळे उद्योगधंदे सुरू केले, वेगवेगळी वाहन वापरायला लागलो, खूप घरं बांधायला लागलो; त्यासाठी झाडं तोडायला लागलो, सोय म्हणून प्लॅस्टिकच्या अनेक गोष्टी वापरायला लागलो. याचा परिणाम काय व्हायला लागला? फॅक्टरींमधून बाहेर पडणाऱ्या केमिकल्समुळे पाणी आणि हवा प्रदूषित व्हायला लागली. झाडं तोडल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं, तापमान वाढायला लागलं, प्लास्टिकच्या अती वापरामुळे जिथे तिथे प्लास्टिक फोफावलं. ते वातावरणात मिसळत नाही हजारो वर्षे. त्यामुळे पाणी प्रदूषित व्हायला लागलं, प्राण्यांच्या अन्नसंस्थेत ते अडकायला लागलं. हे सगळं वाचून तुम्ही थोडेसे घाबरला असाल कदाचित. म्हणूनच आपण आता थोडी काळजी घेतली नाही, अधिक जबाबदारीनं वागलो नाही तर आपल्या पुढच्या पिढयांनाही खूप त्रास होणार आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही काय करू शकता एवढ्या गंभीर प्रश्नासाठी. तुम्ही काही छोट्या गोष्टी नक्की करू शकता. सर्वात पहिली गोष्ट ही की कुठचीच वस्तू फुकट घालवायची नाही. आपल्या पृथ्वीवरचे सगळे रिसोर्सेस आपण जपून वापरले पाहिजेत. ब्रश करताना बेसिनचा नळ चालूच ठेवायचा नाही. आपल्याला पाणी हवंय तेव्हाच चालू करायचा. आपले बाबा दाढी करताना असाच नळ चालू ठेवत असतील तर त्यांनाही तो गरज नसताना बंद ठेवण्याची विनंती करा. उगाचच दिवे, पंखे चालू ठेवायचे नाहीत. प्यायलेलं पाणी ग्लासात उरलं तर फेकू नका झाडांना घाला. किंवा आईला डाळ तांदूळ धुवायला वापरता येईल ते. अगदी काही नाही तर पाय धुवायला हे पाणी आपण वापरू शकतो. यासाठी हे पाणी फक्त बाथरूममध्ये बादलीमध्ये ओतावं लागेल. जास्त त्रास नाही त्यात. उठसूठ हॉटेलांमध्ये पेपर नॅपकिन किंवा टिश्यू पेपर वापरू नयेत. शेवटी तो पेपर आहे तो बनवण्यासाठी झाड तोडावं लागतं. फ्रीजचा दरवाजा सारखासारखा उघडू नका. जेवढ्या वेळा तो उघडल तेवढ्या वेळा बाहेरची गरम हवा आत जाणार. मग आतलं तापमान कमी ठेवण्यासाठी कॉम्प्रेसर जोरात काम करणार, जास्त वीज वापरली जाणार. फ्रीझमधून एकदम थंडगार वस्तू काढून लगेच गॅसवर ठेवली की ती गरम व्हायला जास्त वेळ लागणार तेवढा जास्त गॅस वापरावा लागणार. एखाद्या वेळेला घाई असेल तर ठीक आहे. पण रोजच दूध गरम करायचं असतं तर ते थोडा वेळ आधी आपण फ्रीजच्या बाहेर काढून ठेवू शकतो ना? या वर्षीच्या वसुंधरा दिनानिमित्ताने युनायटेड नेशन्सने एक ब्रीदवाक्य जाहीर केलं आहे. दर वर्षी वसुंधरादिनाला युनायटेड नेशन्स एखादी थीम जाहीर करतं. या वेळची थीम आहे, "beat plastic pollution" एकदाच वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर बंद करणे आणि टाळणे हे त्यातून अपेक्षित आहे. आपणही सर्वजण याला हातभार लावू या. भाजी, खाऊ आणायला जाताना कापडी पिशव्या नेऊ या. डिस्पोझेबल ग्लास, चमचे, प्लेट्स यांचा वापर टाळू या. आपल्याच पर्यावरणाला छान आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आपण नाहीतर कोण प्रयत्न करणार? करू या आजच्याच पर्यावरणदिनाच्या मुहूर्तावर सुरुवात.

-सुप्रिया देवस्थळी 

[email protected]