मी तापी...

दिंनाक: 04 Jun 2018 15:25:35


नर्मदा नदीनंतर पश्चिम दिशेने वाहणारी मी जास्त लांबीची दुसरी नदी आहे. माझं नाव तापी. माझी लांबी ७२४ कि.मी. एवढी असून माझ्या खोऱ्यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा समावेश होतो.

माझा उगम मध्य प्रदेशातील बतुळ या जिल्ह्यातील मुलताईच्या आरक्षित जंगलातून होतो. मुलताईमधून वाहत येऊन मी सातपुडा पर्वतामधून पश्चिम दिशेला वाहत जाते. तेथून मी वाहत वाहत महाराष्ट्रात प्रवेश करते. महाराष्ट्रातील खानदेशातील पठारामधून; तसेच गुजरातमधील सुरत येथील मैदानी भागातून वाहत मी शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. असा एकंदरीत माझा ७२४ कि.मी. लांबीचा प्रवास होतो. माझ्या उगम स्थानाची उंची ७२५ मीटर एवढी आहे. माझ्या उगमस्थानाला ‘मूळतापी’ असेही म्हणतात.

संस्कृतमधील ताप या शब्दापासून माझ्या नावाची उत्पती होते. ताप म्हणजे उष्णता... हिंदू मान्यतेनुसार मला सूर्यदेवाची मुलगी म्हटले जाते. म्हणून मला सूर्यपुत्री असेही म्हणतात. मला ताप्ती या नावानेही ओळखले जाते. तर अशी ही माझ्या नावाची गंमत आहे.

मुलताईपासून वाहत येताना मला अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामध्ये पूर्णा ही मोठी उपनदी मला अमरावती येथे येऊन मिळते. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील आणि मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यातील नद्या आणि प्रवाहांचे जाळे यांच्यामधील पूर्णा ही मुख्य नदी आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यातून वाकी, नाशिक, मालेगावमधून गिरना, शिरीपूर येथून अरुणावती अशा ऐकून १४ उपनद्या मला माझ्या प्रवासात येऊन मिळतात. गुजरातमधील राजपिपला टेकड्यातून वाहणारी वारेली ही नदी देखील मला येऊन मिळते. या साऱ्यांना आपल्यात सामावून घेत मी माझा पुढचा प्रवास करत जाते.

माझ्या नदीच्या खोऱ्यात महाराष्ट्रातील मेळघाट वाघ्रप्रकल्प आणि गुजरातमधील पूर्णा वन्यजीव अभयारण्य आहे. तापी महात्म्यमध्ये हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ शुद्ध सप्तमीला माझा उगम झाला, अशी माझ्या जन्माबाबतची अशी माहिती सांगितली जाते. तर त्याचा विचार करून सूरत नगरपालिका हा दिवस माझा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. या काळाला पद्मक असेही म्हणतात. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा हे गाव माझ्या किनारी वसलेले आहे. या गावाला ‘दक्षिणकाशी’ या नावाने ओळखले जाते. माझा आणि गोमाई नदीचा प्रकाशा येथे संगम होतो. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो आणि लाखोंनी माणसे इथे जमतात. माझ्या आणि गोमाई नदीच्या काठावर ऐकून १०८ तीर्थक्षेत्रे आहेत. म्हणून मला धार्मिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त होते.

माझ्या खोऱ्यात जलसिंचनाची आवश्यकता असल्याने माझ्यावर, तसेच माझ्या उपनद्यांवर अनेक सिंचन प्रकल्प झाले आहेत. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील हथनुर या गावी हथनुर डॅम बांधला गेला आहे. तसेच सूरतमध्ये उकाई येथे धरण बांधून जलसिंचन व जलविद्युत उत्पादन केले जाते. उकाईच्या पश्चिमेस काक्रापारा येथेही मला बांध घालून पाणी अडवण्यात आले आहे. असा माझ्या पाण्याचा उपयोग करून घेऊनही मी प्रदूषणापासून दूर राहू शकले नाही. इतर नद्याप्रमाणे माझी प्रदूषण ही समस्या आहेच. माझ्या उगमस्थानापाशी मी तितकीशी दुषित नाही. पण जसजशी मी खाली वाहत येते, तसतसे माझे पाणी दुषित होत जाते. सूरत येथून मोठ्या प्रमाणात दूषित, सांडपाणी माझ्यात सोडले जाते. तसेच महाराष्ट्रातून व मध्य प्रदेशमधून वाहतानाही मोठ्या प्रमाणात कचरा माझ्यात टाकला जातो. याचा परिणाम मी दूषित होते. माझे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि जरी त्याचा वापर आपण पिण्यासाठी केला, तरी त्यामुळे आजार होऊ शकतात. म्हणून जसं प्रत्येक नदी सांगतेय तसच मी ही सांगते. पाणी प्रदूषण टाळा. कारखान्यातून, घरातून निघणाऱ्या सांडपाण्याचा निचरा करता येतो. असे पाणी सरळ नदीत सोडायचे म्हणजे आजारांना आमंत्रण असते. असो... तुम्हांला कळलं असेलच मुलांनो... चला तर मग माझी माहिती वाचलीत, माझी ओळख करून घेतलीत खूप बरं वाटलं...आता मी वाहत जाते बरं का पुढे... 

Ref ; Author – Parineeta Dandekar;India River week  2016 maharashtra

*मराठी विश्वकोश;deshapande C. D; geography Od Maharashtra; New Delhi 1971

-उत्कर्षा मुळे

[email protected]

 नर्मदा नदीची माहिती वाचा खालील लिंकवर 

मी पश्चिमवाहिनी नर्मदा...