प्रादेशिक भूगोल ही भूगोल विषयाची एक ज्ञानशाखा असून यामध्ये जगातील विविध प्रदेशांचा अभ्यास केला जातो. पृथ्वीवरील एखादा प्रदेश एक किंवा अनेक समान वैशिष्ट्यांमुळे इतर प्रदेशांपेक्षा हवामान, पर्यावरणीय तसेच सांस्कृतिक किंवा मानवी घटक अभ्यासणारी प्रादेशिक भूगोल ही अभ्यास पद्धती १९व्या शतकात विकसित झाली.

प्रादेशिक भूगोलामध्ये कोणत्याही प्रदेशाचा अभ्यास करताना त्या प्रदेशाचे स्थान सर्वप्रथम अभ्यासले जाते. किंबहुना भूगोल विषयामध्ये स्थानाला फार महत्त्व आहे. कारण पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचे हवामान, वनस्पती व प्राणीजीवन आणि मानवी जीवन हे यांमध्ये स्थानानुसार बदल होत जातो. उदा., भारतामध्ये पश्‍चिम व पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशाचे स्थान विचारात घेतल्यास येथील हवामान भारतातील अंतर्गत प्रदेशाच्या तुलनेत सम प्रकारचे आहे. म्हणजेच अतिउष्ण किंवा अतिथंड नाही. याचे कारण सागरी सान्निध्यामुळे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे (खारे वारे) आणि रात्रीच्यावेळी जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे (मतलई वारे) तेथील हवेचे तापमान एक प्रकारे संतुलित प्रभावी ठरतात.

पृथ्वीचे आकारमान पाहता एवढ्या मोठ्या पृथ्वीवरील एखादा प्रदेश कुठे आहे माहीत होणे फार कठीण आहे; म्हणून पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे स्थान निश्‍चित व्हावे याकरिता पृथ्वीचा आकार व परिघ लक्षात घेऊन त्यावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते कल्पिलेली आहेत. गोल आकाराच्या एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग करण्यासाठी एक आडवी वर्तुळाकार रेषा आखली आणि या रेषेला समांतर अशा वरच्या व खालच्या भागावर वर्तुळाकार रेषा आखल्यास या वर्तुळाकार रेषांचा आकार कमी कमी होत जातो व शेवटी तो बिंदू स्वरूपात येतो. याप्रमाणेच पृथ्वीगोलाकार विषुववृत्त हे सर्वांत मोठे अक्षवृत्त कल्पून त्याच्यामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग होतात आणि विषुववृत्ताला समांतर उत्तर व दक्षिणेकडे अक्षवृत्ते कल्पिली तर उत्तर ध्रुव (९०० उ.) व दक्षिण ध्रुव  (९०० द.) अक्षवृत्त ही बिंदू स्वरूपात येतात. याचाच अर्थ पृथ्वीवर एकूण १८१ अक्षवृत्ते कल्पिलेली आहेत.

या अक्षवृत्तांवर पृथ्वीवरील एखादे स्थान केवळ उत्तर व दक्षिण दिशांच्या संदर्भातच माहीत होईल, मात्र इतर दिशाचे काय? हाही प्रश्‍न उपस्थित होतो. म्हणूनच पृथ्वीवर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणार्‍या उभ्या अर्धवर्तुळाकार अशा ३६० रेषा कल्पिलेल्या आहेत. ज्यांना रेखावृत्त असे संबोधले जाते. लंडनजवळील ग्रीनीच शहरावरून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त (००) मानले जाते. या रेखावृत्ताच्या अगदी विरुद्ध दिशेला १८००  रेखावृत्त असूनही दोन्ही रेखावृत्ते मिळून उभी वर्तुळाकार रेषा तयार होते, या रेषेमुळे पृथ्वीचे पूर्व गोलार्ध व पश्‍चिम गोलार्ध असे दोन भाग पडतात.

या अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा पृथ्वीच्या प्रलयाच्या मध्यबिंदूपाशी जो कोन तयार होतो, त्यानुसार अक्षांश व रेखांश निश्‍चित केले जातात. म्हणूनच एखादया प्रदेशाचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगताना तो अंशात्मक स्वरूपात सांगणे महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे या स्थान संदर्भाच्या आधारे त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांबाबत कारणमीमांसा करता येते. उदा., भारताचा अक्षवृत्तीय विस्तार ८० ४ उत्तर ते ३७० ६’३ आणि रेखावृत्तीय विस्तार ६८०७’ ते ९७० २५’ पू. असा सांगितल्यास लक्षात येते की भारत हा उत्तर व पूर्व गोलार्धातील देश आहे. तसेच हा उष्ण कटिबंधीय देश आहे. परंतु पृथ्वीवर असेही काही समान नैसर्गिक वैशिष्ट्यांचे सलग प्रदेश आहेत की, त्यांचे वेगळेपण हे अक्षवृत्तीय स्थानामुळे लक्षात येते. कारण पृथ्वीवर पडणार्‍या सूर्यकिरणांचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारे कोन यांमुळे पृथ्वीवर कमी-अधिक प्रमाणात उष्णतेचे वितरण होते आणि याचा परिणाम तापमानावर होतो.

वरील आकृतीवरून लक्षात येईल की, या उष्णतेच्या असमान वितरणामुळे तापमानाचे वितरणही असमान आहे आणि उच्च अक्षवृत्तावर ते कमी कमी होत जाते. यावरून प्रदेशाचा अक्षवृत्तीय स्थान व तेथील तापमान यांचा कार्यकारणसंबंध स्पष्ट होतो. पृथ्वीवर यानुसार टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, गवताळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश यांसारखे विविध नैसर्गिक प्रदेश आढळतात. ज्यांच्या अभ्यास प्रादेशिक भूगोलामध्ये केला जातो.

वरील विवेचनावरून लक्षात येईल की, प्रत्येक प्रदेश हा इतर प्रदेशांपेक्षा वेगळा असून तेथील इतर घटकही भिन्न आहेत. घटकांच्या या भिन्नतेमागे प्रदेशाचे स्थान हा महत्त्वपूर्ण घटक असल्याने भूगोलामध्ये कोणत्याही प्रदेशाच्या अभ्यासाची सुरुवातही स्थानानेच होते. म्हणून विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो कोणत्याही प्रदेशाच्या स्थानाचा अक्षवृत्त व रेखावृत्त या दृष्टीने विचार करुन प्रादेशिक भूगोलाच्या अभ्यासाची सुरुवात करा.

-मेघना जाधव

[email protected]