नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांना उपयोगी असे उपक्रम घेणे, या शिक्षणविवेकच्या उद्देशाला साजेसा असा उपक्रम नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच घेतला तो म्हणजे सफर नदीची – Muthai River Walk.

नदीचे परिसंस्थेतील महत्व, नदीकाठावरील घडामोडी, आजूबाजूच्या ऐतिहासिक वास्तूंची पुरेपूर माहिती घेत ३० जून, २०१८ रोजी सकाळी ७.०० ते ९.०० या वेळात शिक्षणविवेकने ‘सफर नदीची’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. नु. म. वि. मुलींची शाळा, विमलाबाई गरवारे प्रशाला, शिशुविहार प्रशाला कर्वेनगर, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल, नऱ्हे, आपटे प्रशाला, नु. म. वि. मुलांची शाळा, शिशुविहार प्रशाला एरंडवणे या शाळांचे १३६ विद्यार्थी, १० शिक्षक, २ पालक आणि १३ शिक्षणविवेक कार्यकर्ते यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. ‘जीवितनदी’ संस्थेच्या आदिती देवधर, मनीष घोरपडे, शैलजा देशपांडे, उमा खरे, मंजुषा पारसनीस, धर्मराज पाटील, ओमकार गानू यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पर्यावरणातील नदीचे स्थान किती महत्वाचे आहे, हे सांगताना अगदी प्राचीन संस्कृतीपासून आजतागायत नदी काठावरील बदलांचे सचित्र वर्णन या वेळी विद्यार्थ्यांनी ऐकले. ज्या ठिकाणी विद्यार्थी उभे होते त्या ठिकाणचे काही वर्षांपूर्वीचे छायाचित्र पाहताना खरोखरच आश्चर्य वाटत होते. सुंदर आणि निर्मळ वाहणाऱ्या नदीची आजची अवस्था विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारी होती. आपणच याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जबाबदार आहोत, याची जाणीव सर्वांना होत होती. नदीमध्ये वाढणारे प्रदूषण, पाण्यातून बुडबुड्याच्या स्वरुपात निघणारा मिथेन वायू पाहताना पाठ्यपुस्तकातील पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना आठवत होता. शिक्षण घेणे की प्रक्रिया केवळ पाठ्यपुस्तकातूनच होते असे नाही तर वेगवेगळ्या उपक्रमातूनही अभ्यास होतो, असे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत होते. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि पालकही होते. सर्वांना अनेक प्रश्न पडत होते. शंकांचे निरसन करताना अनेक उदाहरणे आणि फोटो यांचा संदर्भ देण्यातून ‘जीवितनदी’ संस्थेच्या कार्यकर्त्यांचा सखोल अभ्यास लक्षात येत होता. उपक्रमाची सुरुवात पाहून काही पालकही सहभागी झाले. झाशीची राणी वापरत असलेला रस्ता, श्री. गंगाधर केळकर यांची समाधी अशा माहीत नसलेल्या अनेक समाधी स्थळाची माहिती मिळाली.

प्रदूषण कमी करण्याची सुरुवात स्वतःपासून करावी हा विचार डोक्यात घेऊन स्वतः करायच्या अनेक गोष्टींची माहिती मुलांना मिळाली. अशा सर्व गोष्टीचे आचरण करण्याचा संकल्प करून दोन तासाचा उपक्रम संपला. अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त माहिती मिळाल्याचे समाधान सर्वांच्या चेहेऱ्यावर दिसून येत होते.

-प्रतिनिधी

[email protected]