बहुगुणी चौकोन

दिंनाक: 03 Jun 2018 14:56:48


वरील आकृतीत दिले आहे त्याप्रमाणे 100 घरांचा चौकोन वर्गातील मोकळ्या जागेत आखून घेणे. इयत्ता पहिलीच्या मुलांना 1 ते 100 अंक लिहिता येतात. हे अंक विद्यार्थी खडूने काढू शकतात. यामध्ये 1 ते 10 अंक एका मुलाने/गटाने, 11 ते 20 अंक दुसऱ्या मुलाने/गटाने काढावेत. याप्रमाणे 10 मुलांना अथवा गटात वर्गातील सर्व मुलांना संधी मिळते. याप्रमाणे आणखी काही उपक्रम या बहुगुणी चौकोनाच्या माध्यमातून आपणास घेता येतील.

1) 100 पासून 1 पर्यंत संख्या उलट क्रमाने लेखन करणे. 100 ने सुरुवात करून 100 ते 91 असे उलटक्रमाने अंकलेखन करणे. दुसऱ्या विद्यार्थ्याने 90 ते 81 अंक लिहिणे. तिसऱ्या विद्यार्थ्यांपासून 80 ते 71 याप्रमाणे 10 ते 1 पर्यंत विद्यार्थ्यांना क्रमाक्रमाने संख्या लेखनासाठी संधी द्यावी. नंतर मुलांकडून उलटक्रमाने हे अंक तोंडी म्हणवून घ्यावेत म्हणजे संख्यावाचन व संख्या लेखनाचा विद्यार्थ्यांचा सराव होईल.

2) एककस्थानी 1 हा अंक असलेल्या संख्या चौकटीत हिला. उदा.; 1, 11, 21, 31, -----, 91 इ.

3) एककस्थानी 0 असलेल्या संख्या चौकटीत लिहा. उदा.; 10, 20, 30, -----, 100 इ.

4) याप्रमाणे एककस्थानचा अंक 2, 3, 4 याप्रमाणे बदलून संख्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेता येतात.

5) वरीलप्रमाणे एककस्थान ऐवजी दशकस्थानी 4, 5, 6, 7 असे अंक येणाऱ्या संख्या विचारता येतील व लिहून घेता येतील.

6) संख्या टप्प्याने लिहिण्यास सांगता येईल. 2 च्या टप्प्याने 10 संख्या लिहा.  5 च्या टप्प्याने 10 संख्या लिहा. 7 च्या टप्प्याने 10 संख्या लिहा. याप्रमाणे संख्यांचा टप्पा बदलून सराव घेता येईल.

7) 2 ते 10 पर्यंतचे पाढे मुलांना कृतीतून तयार करता येतील. ते या चौरसात लिहितील.

8) आडव्या पाढ्यांचे लेखन करण्यासाठी या बहुगुणी चौकोनाची मदत होईल.

9) संख्यांचा चढता व उतरता क्रम सांगणे, मधला अंक सांगता येणे, मागचा अंक, पुढचा अंक ओळखून सांगणे या सर्व गणिती खेळांसाठी हा चौकोन वापरता येईल.

10) बेरीज व वजाबाकीची उदाहरणे, सम-विषम संख्या ओळखणे, मूळ संख्यांना गोल करून वेगळ्या करणे हे व असे अनेक खेळ या चौकटीत घेता येतील.

11) मागचा - मधला - पुढला अंक ओळखा व लिहा.

12) 1 ते 100 अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात क्रमाने - उलट क्रमाने हिला.

13) बेरीज व वजाबाकीची उदाहरणे संख्यारेषेवर पुढे - मागे मोजून करता येतात.

14) सम - विषम संख्यांना गोल करा.

15) बिया, चिंचोके, मणी यांसारख्या वस्तू मांडणी करून बेरीज - वजाबाकी करता येते.

मुलांच्या अक्षराला योग्य वळण लावून ते सुंदर बनवण्यासाठी काही पद्धती वाचा खालील लिंकवर 

 अंकलेखन व अक्षरलेखन

-कल्पना आगवणे 

[email protected]