विविध युद्धांमध्ये उत्तम कामगिरी करणार्‍या भारतीय वीर योद्धांच्या पराक्रमाच्या कथा सांगणार आहेत कॅप्ट. विनायक अभ्यंकर ‘वीर कथा ’ या सदरातून .

ही समरगाथा आहे सर्वांत तरुण वयात परमवीरचक्र मिळवणार्‍या युवकाची. अभिमन्यूचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शत्रूला ‘दे माय धरणी ठाय’ करायला लावून रणांगणातून पिटाळून लावणार्‍या वीस वर्षांच्या अरुण खेत्रपाल या पुण्यात जन्मलेल्या आणि ‘पूना हॉर्स रेजिमेंट’ला युद्धात परमवीरचक्र मिळवून देणार्‍या शूर मावळ्याची.

 ‘ए’ स्न्वॉड्रनला पाकिस्तानने चारी बाजूने घेरले, तेव्हा प्राणाची पर्वा न करता त्या पठ्ठ्याने आपल्या बी स्न्वॉड्रनला साथीने घेऊन रणांगणात पाकिस्तानी पॅटन टँकर्सना धुळीला मिळवत, व्यूह भेदत गनिमाचे सहा टँक नेस्तनाबूत करत बडा पिंड या पाकिस्तानी गावात घुसून पाकी फौजांना पिटाळून लावले. हा तरुण स्वत:च्या टँकमध्ये बसून यंत्रणा हाताळत असताना अचानक शत्रूने डाव साधला. ‘तेरा लान्सर्स’ या पाकिस्तानच्या आर्मर्ड रजिमेंटने अरुण खेत्रपालला एकटं गाठून टिपले. अरुण घायाळ झाला. त्याच्या कंपनी कमांडरने त्याला टँकमधून बाहेर येऊन युद्धातून बाहेर जाण्याचा आदेश दिला. अरुणने तो नामंजूर करत घायाळ अवस्थेत ‘शक्करगढ’ या रणभूमीवर पुन्हा आपला टँक शत्रूच्या मध्यभागी नेऊन शत्रूचे चार टँक उद्धवस्त केले. निर्णायक परिस्थितीमध्ये अरुणला दुसरी गोळी भेदून गेली व तो रणांगणावर निपचीत पडला. शेवटचा श्‍वास घेताना ‘हर हर महादेव’ची गर्जना करत त्याने पुन्हा पाकिस्तानचे दोन टँक धुळीला मिळवले आणि मगच प्राण सोडले. त्याचा हा पराक्रम पाहून तेव्हा रणांगणावर पाकिस्तानी ब्रिगेडियर ख्वाजा मुहम्मद नासेर, १३ पाकिस्तानी लान्सर्स याने स्वत: अरुणच्या प्रेतावर फुले वाहून एक दीर्घ सलाम ठोकला. स्वत:च्या अतुलनीय पराक्रमाने शत्रूलाही अचंबित करणारा अरुण खेत्रपाल हा जगातला सर्वात तरुण सर्वोच्च पराक्रमाचे पदक मिळवणारा म्हणून १९७१च्या हिंदुस्थान-पाक युद्धातला मावळा ठरला.

- कॅप्ट. विनायक अभ्यंकर

[email protected]