चाफा - भाग २

दिंनाक: 24 Jun 2018 15:08:03


चाफा - भाग १ या मागील लेखात आपण चाफा या फुलाचे काही प्रकार पहिले. या लेखात चाफ्याचे आणखी काही प्रकार पाहू. 

१. देवचाफा – याला पांढरी फुले असून मध्यभागी पिवळसर झाक असते. खोड राखाडी असून त्यालाच पारंब्या असतात. ही फुले देवाला वाहतात, हार करतात म्हणूनच बहुधा हे झाड देवळाबाहेर लावलेले दिसते. मात्र पांढऱ्या चाफ्याच्या फुलांना मध्यभागी पिवळा रंग नसतो.

२. कवठी चाफा – याचे शास्त्रीय नाव मॅग्नोलिया – स्टेलाटा असे आहे. हा मुळचा उत्तर अमेरिकेतला असून भारत, ब्रह्मदेश, चीन, जपान इत्यादी देशात लावलेला आढळतो. हिमालयात, निलगिरीत २१०० मीटर उंचीपर्यंत याची वाढ व प्रसार चांगला आहे. सुवासिक फुले हे त्याचे प्रमुख आकर्षण लक्षण आहे. सर्व प्रकारचे हवामान सोसू शकणारा हा एक लहानसा वृक्ष आहे. याच्या फांद्या पसरत असतात. याची पाने साधी, एका आड एक, लंब गोलाकार, चिवट, गर्द हिरवी, मोठी वर चकचकीत व खाली तांबूस लवदार असतात. कधी त्यांचे शेंडे टोकेरीदेखील असतात. डहाळ्या कळ्या तांबूस लवदार, तर साल करडी व गुळगुळीत असते. पाने २ ते ५ इंची असतात. कवठाच्या फळाप्रमाणे गोड वास म्हणून हे नाव. फूल हिरवट पांढरे, संध्याकाळी उमलते पण सकाळपर्यंत मावळते. या फुलांपासून मॅग्नोलिया नावाचे सुवासिक तेल मिळते. इतर चाफ्यांपेक्षा याची फुले लहान असली तरी एका प्रजातीला मोठमोठी फुले येतात ते दुरून पाहताना झाडावर बगळे बसल्याचा भास होतो. ही मोठी पांढरी फुले द्विलिंगी असून फांदीच्या टोकास एकएकटी एप्रिल – मेमध्ये येतात. याची घोस्फाल तांबूस, लवदार असून प्रत्येक लहान फळ, तडकून शेंदरी रंगाचे बी बाहेर पडते. यात फारच थोडे जननक्षम स्त्रीकेसर असतात. फुलाच्या पाकळ्या आठ-नवाच्या संख्येत प्रथम फैलावतात आणि मग मागे दुमडतात. झाड दोन फूट उंच वाढले की, लागलीच खूप फुले येऊ लागतात. बियांपासून काढलेले तेल साबणात वापरतात. साल उत्तेजक, हिवताप, संधिवात यावर देतात. लाकूड हिरवट, करडे मॅपलप्रमाणे असते. ते लगद्याकरिता उपयुक्त असते. बिया व गुटी कलमापासून लागवड करतात. याचे फूल लुइझिअॅनाचे राज्य पुष्प आहे.

३.  नागचाफा  -  हा मूळचा श्रीलंकेचा आहे. याचे शास्त्रीय नाव मेसुआ- फेरीया आहे. लंकेत बौद्ध मंदिराच्या आसपास हा वृक्ष लावतात. आसाममध्येही तो आढळतो. हा सदापर्णी, गुलामोहाराप्रमाणे याच्या तळाशी आधारमुळे असतात. एप्रिल – मेमध्ये याला पांढरी मोठाली फुले येतात. फुलांच्या मध्यभागी पिवळ्या पुष्केसाराचा गुच्छ असतो. मसाल्याच्या पदार्थात नागकेसर म्हणून फुलांचा केसर वापरण्यात प्रसिद्ध. मिझोरम राज्याचा हा राज्यवृक्ष आहे. सह्याद्रीत हा वृक्ष दुर्मीळ झाला आहे. याच्या परागांना नागकेशर म्हणतात. पिवळे केशरी पुंकेसर –  कडू तुरट असते ते आमपाचक, तसेच शौचाच्या जागी आग, पीडा थांबण्यासाठी उपयुक्त, कफयुक्त खोकल्यात या केशराचा उपयोग. साल + साखर घेतल्याने घाम येतो, तर फुलांच्या काढ्याने घाम थांबतो. बियांचे तेल सांधे, अंगदुखीवर चोळतात. खरुज त्वचारोगावरही लावतात. [तांबडा नागकेशर सुरंगीच्या फुलातून तर काळा नागकेशर उंडीच्या फुलातून मिळतो.] फुलांपासून अत्तर व सुगंधी तेल बनवितात. बियांतील तेल दिव्यांकरिता वापरतात. साल व मुले यांचा रोगणाकरिता उपयोग करतात. याचे लाकूड लालसर, टिकाऊ ते लोह्मार्गाखालील आडवे ओंडके सजावटी समान, गाड्या, नांगर, शिडाचे खांब यासाठी वापरतात. शोभेसाठी व सावलीकरिता हा वृक्ष बागेत लावतात.

४. तांबडा चाफा –  हे झाड ७ ते ८ मीटरपर्यंत वाढू शकते. उन्हाळा किंवा हिवाळ्याच्या आरंभी या झाडाला गुलाबी, पांढरी, पिवळी अशा छटा असलेली फुले येतात. पाने फारच कमी.

५.  भुई चाफा – नाव कॅफेरीया रोटुंडा. सुगंधी, अनेक वर्षे जगणारा. हा प्रकार दुर्मीळ असतो. हा थेट जमिनीतून उगवतो. याला जांभळ्या व निळ्या रंगाची फुले येतात. हिला जमिनीत गाठीसारखे खोड असते. पाने क्वचित दोन आखूड, पन्हाळी देठ, भाल्यासारखी वरचा भाग हिरवट, चित्रविचित्र आकाराची, खालचा भाग लाल, जांभळा असतो. हिवाळ्यात हे झाड वाळते. पुन्हा उन्हाळ्यात उगवतात. बोंडात अनेक बिया असतात. याचे गड्डे कडू, तिखट असून प्रथम त्यांना कापरासारखा वास येतो, नंतर दवण्यासारखा वास येतो. गळवे, सूज जखमांवर या गड्ड्यांचे पोटीस बांधतात. तेल मलमामध्ये घालतात. हे गड्डे भूक वाढविणारे, खोड व पाने स्वादासाठी उपयुक्त याला हलकी माती, कुजलेले शेणखत किंवा पालापाचोळ्याचे खात, उगवण होईपर्यंत बेताचे पाणी द्यावे नंतर ते भरपूर असावे. अमोनियम सल्फेट पाण्यात मिसळून थोडे घातल्यास रोपे चांगली वाढतात.

फिलिपाईन्स किंवा इंडोनेशियात ही झाडे स्मशानभूमी बाहेर लावतात. भारतात जरी चाफा मोठ्या प्रमाणात आढळत असला तरी चीनमध्ये हे फूल अत्यंत दुर्मीळ आहे.     

-मीनल पटवर्धन 

svapp20162gmail.com

 चाफा - भाग १