गणिताची गंमत जंमत

दिंनाक: 23 Jun 2018 15:15:51


गणित म्हटलं की माझ्या तर अंगावर काटाच येतो! फक्त मुलांनाच नव्हे, तर पालकांनादेखील हा एक अवघड व त्रासदायक विषय वाटतो. आणि का वाटू नये? भूमिती, बीजगणित, त्रिकोणमिती ही सगळी नावंच किती अवघड आहेत! त्यात येणारी सूत्रं, ती कशी वापरायची याचा तर्क, हे सगळं सामान्य माणसासाठी खरोखरंच महाकठीण काम आहे. हे महाकठीण काम त्यातल्यात्यात सोपं कसे करता येईल, हे आपण आता बघू.

गणित म्हटलं की, डोळ्यांसमोर फक्त आकडे येतात. पण पूर्व-प्राथमिक व प्राथमिक शाळांतील मुलांसाठी गणितीय संकल्पना या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ३-६ वर्षांच्या आतील मुलांना जोड्या लावणे शिकवणे सारख्या असणाऱ्या वस्तूंचे वर्गीकरण करायला लावणे, एवढेच काय, तर रंग ओळखदेखील गणितातील संकल्पनांमध्ये मोजले जाते, त्याच बरोबर आकार, प्रमाण, संख्यामूल्य, चढता-उतरता क्रम हे सर्वसुद्धा गणितातच मोडते. गणिताची भीती आता थोडी कमी झाली, नाही का?

आता थोडा विचार करू की, हा भीतीदायक विषय आपल्याला मुलांसाठी आकर्षक कसा करता येईल?

गणिताला रोजच्या जीवनातील एक भाग मानून घ्या. मुलांना वाचायला शिकवताना आपण नाही का त्यांच्याबरोबर वाचायला बसत? तसेच आपण गणिताच्या बाबतीत का नाही करत? पिशवीत किती बटाटे आहेत जरा मोज रे, मला आतून ४ चमचे आणून देशील का गं? अशा कामांतून आपोआप अंक ओळख होईल, नाही का? एकदा का हे झाले, की आपल्या आजूबाजूला असलेल्या गाड्यांचे नंबर, आपले फोन नंबर या सगळ्याची माहिती आपण त्यांना हळूहळू देऊ शकतो. टिपरी हा खेळ अंक शिकवण्यासाठी उत्तम आहे.

पालक म्हणून आपण गणिताचा वापर दैनंदिन जीवनात कायम करतो. बऱ्याचदा मनातल्या मनात आपण हिशोब करत असतो. हेच जर मुलांसमोर जोरात केलं, तर त्यांना ते समजायला सुरुवात होईल.

लहान मुलांना खेळायला ब्लॉक्स द्या, ज्यामुळे त्यांचे स्पेशिअल ओरिएन्टेशन (अवकाशासंबंधीची अनुभूती) सुधारते. अनेक लहान भागांचे एकत्रीकरण केल्याने काय बनते, हे त्यांना कळते. त्यासाठी पझल्सचासुद्धा चांगला उपयोग होतो. सापशिडीसारखे खेळसुद्धा मुलांचे गणित सुधरवतात.

आपल्याला गणित अवघड वाटले, म्हणून आपल्या मुलांनापण येणार नाही, ही अतिशय चुकीची कल्पना आहे. जमत नाहिये का? जाऊ दे, मलापण येत नव्हते, असे कधीच म्हणू नका! उलटे त्यांना काय समजत नाहिये, हे तुम्ही जाणून घ्या आणि सोप्या भाषेत त्यांना ते कसे समजावता येईल, याचा विचार करा. त्यांच्याशी कायम सकारात्मक बोला.

थोड्या मोठ्या मुलांना बाहेर घेऊन जाल, तेव्हा हिशोब त्यांना करायला लावा. त्यांच्याबरोबर व्यापारसारखे खेळ खेळा. नुसत्याच वस्तूंच्या किमती नाही, तर त्यांचे मूल्यदेखील त्यांना शिकवा. यातून मुलांना आपोआप गणिताच्या संकल्पना समजतील.

बऱ्याचदा नुसती कल्पनाशक्ती वापरून आपण अपेक्षा करतो की, मुलांनी गणिते सोडवावीत. त्यापेक्षा खऱ्याखुऱ्या, वस्तूंचा वापर करून त्यांना गणित शिकवा. मुलांबरोबर पत्ते खेळा. यामुळे त्यांची तार्किक व अमूर्त विचार करण्याची क्षमता वाढते.

आपल्या मुलांसाठी गणित सोपे व मजेदार कसे करायचे, हे प्रत्येक पालकाच्या हातात असते. ते तसे करण्याची जबाबदारी फक्त आपल्याला घेता आली पाहिजे.

-प्रियांका जोशी 

[email protected]