१२ जून

दिंनाक: 22 Jun 2018 15:15:26

सर्वप्रथम या शॉर्टफिल्मच्या शीर्षकाविषयी अधिक माहिती घेऊयात. 12 जून हा जागतिक बालकामगार निषेध दिवस म्हणून साजरा केला जातो. एव्हाना आता तुम्ही ओळखलं असेल की ही शॉर्टफिल्म बालकामगार या कल्पनेवर आधारित आहे.
 
१४ वर्षाखालील लहान मुलांना काम करायला परवानगी नाही किंवा त्यांना बालकामगार संबोधलं जातं आणि बालकामगार कामावर ठेवणाऱ्या कंत्राटदारावर/ठेकेदारावर/दुकानदारावर नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल सक्त कारवाई होऊ शकते. पण हा कायदा सर्रासपाने मोडला जातो. जून१२ ही  शॉर्टफिल्म अशाच मानसिकतेवर भाष्य करते. एखाद्या इराणी चाय कॉफीच्या हॉटेलात जा, पेपर स्टॉलवर जा, बांधकाम सुरू असलेल्या साईटवर जा एखादा छोटू किंवा पोऱ्या सापडतोच.
 
जून १२ या शॉर्टफिल्ममधील बालकामगार, शहरात ठिकठिकाणी भिंतीवर पोस्टर्स लावण्याचं काम करतो. या लहान मुलाला त्याचं काम करण्यात मजा येतेय. पोस्टर्स लावली की समजा ते पोस्टर एखाद्या चित्रपटाचं असेल तर त्या पोस्टरमधल्या नायक नायिकेप्रमाणे चेहऱ्यावर हावभाव आणून त्यांच्यासारखी पोज द्यायला या लहान मुलाला मजा येतेय. एका पोस्टरवरचे हावभाव मात्र त्याला करता येत नाहीयेत.. का बरं असं? उत्तर शॉर्टफिल्म पाहून शोधा. (सोबत लिंक दिलेली आहे.) बऱ्याचदा अशी काम करण्याच्या नादात या बालकामगारांची पाटी, पेन्सिल, दप्तर, पुस्तकं यांच्याशी मैत्री संपते आणि तीही कायमचीच. याची त्यांना खंत नसते कारण एवढी समज असण्याइतपत ते वयही नसतं. आपणही आपल्या आजूबाजूला बालकामगार पाहतो, फार तर फार हळहळतो आणि विषय सोडून देतो.
 
अवघ्या साडेचार मिनिटांची ही शॉर्टफिल्म आपल्यासारख्या पांढरपेशी मानसिकता असणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालते. शेवटचा, पोस्टरवर लघवी करणाऱ्या माणसाचा सिन तर भन्नाटच. बालकामगाराचे काम करणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याच अभिनयकौशल्य वाखाणण्याजोगं. या शॉर्टफिल्ममध्ये फक्त २ वाक्यांचे संवाद आहेत बाकी सगळी बाजी त्या लहान मुलाच्या अभिनयाने आणि साजेशा  संगीताने मारली आहे.
 
ही फिल्म पाहिल्यानंतर आपल्या नजरेस जर एखादा बालकामगार दिसला मग तो अनिच्छेने किंवा परिस्थितीमुळे काम करण्यास उद्युक्त झाला असेल तर अशा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या काही सेवाभावी संस्था असतात. अशा संस्थेकडे आपल्यापैकी एखाद्याची पावलं वळली तर ही शॉर्टफिल्म बनवणाऱ्याच्या प्रयत्नांच सार्थक झालं असं म्हणता येईल
 
सौजन्य  - यु ट्युब
 
-भाग्यश्री भोसेकर-बीडकर