योगदिन -  21जून

दिंनाक: 21 Jun 2018 19:26:22


      योगेन चित्तस्य पदेन वाचां

      मलं शरीरस्य च वैद्यकेन

      यो s पाकरोन्तं प्रवरं मुनीनां

      पतंजलिं प्रांजलिरानतो s स्मि ।।

अर्थ : योगाद्वारा चित्तामधील, व्याकरणाने वाणीमधील आणि वैद्यकशास्त्राद्वारा शरीरातील मल, दोष काढून टाकता येतो, असे दाखवून देणाऱ्या मुनिश्रेष्ठ पतंजलींना मी दोन्ही हात जोडून, नतमस्तक होऊन प्रणाम करतो.

      योगसूत्रे, व्याकरण आणि आयुर्वेद या तीनही शास्त्रांचे कर्ते पतंजली मुनी मानले जातात. त्यांना प्रणाम करून योगाभ्यासाची सुरुवात करतात.

      योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. योगासने हा बिनखर्चाचा, शास्त्रीय आणि डौलदार व्यायामप्रकार आहे. लहान मुलांपासून सर्वांना प्रकृतीस्वास्थ्य आणि मन:स्वास्थ्य यांसाठी योगासनांचा उपयोग होतो. म्हणूनच सर्व जग २१ जून हा योगदिवस योगासने, योगाभ्यास करून साजरा करते.

      आता तुम्ही विचाराल, योगाचे फायदे काय? तर योगामुळे उत्तम आरोग्य मिळतेच, त्याबरोबर एकाग्रता, संयम, स्थैर्य, लवचिकपणा आणि दृढता यांसाठी योगाचा खूप उपयोग होतो. उत्तम शरीर, मन आणि विचार ही आरोग्याची त्रिसूत्री आहे. योगाच्या प्रत्येक कृतीत मनाचा विचार केला जातो. योग हे निरोगी जगण्याचे स्पष्ट आणि निश्चित असे शास्त्र आहे. यात साहित्य, तंत्र आणि प्रयोग करणारा असे आपण स्वतःच असतो.

       यम, नियम, आसने, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. योगाभ्यासासाठी अनेक नियम आहेत. तसेच आसनांचे शंभरेक प्रकार आहेत. तज्ज्ञ गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास शिकावा.

       योगासनांतील सूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आहे. रोज फक्त बारा सूर्यनमस्कार घातले तरी आपली कार्यशक्ती वाढते, मन आणि शरीर प्रसन्न राहाते. श्वासावर नियंत्रण ठेवणारा प्राणायाम नियमित केल्यामुळे मनावर, रागावर नियंत्रण मिळवता येते. असे अनेक योग प्रकार आहेत ज्यामुळे आपण तंदुरुस्त राहातो.

       योगासनातील शेवटचे महत्त्वाचे आसन म्हणजे शवासन. शवासनामुळे ताणलेल्या अवयवांना विश्रांती मिळते. शिस्तबद्ध रीतीने केलेल्या योगासनांमुळे शरीर आणि मन ताजेतवाने, निरोगी राहाते.

        योगाभ्यास ही आपली गरज आहे. आजच्या आपल्या जीवनातील कृत्रिमतेच्या आणि प्रदूषित वातावरणातील समस्यांना योग हेच योग्य उत्तर आणि उपाय आहे. म्हणून सर्वांनी प्रयत्नपूर्वक योग आपलासा करावा.

        योगवर्ग संपताना ईशावास्य उपनिषदातील शांतिमंत्र म्हटला जातो --

     ओम् पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।

     पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।

      ओम् शांति: शांति: शांति: ।।

चला, योग आपलासा करू या.

 

                                                                    -- स्वाती दाढे.

svapp20162gmail.com