सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।

सर्वे भद्राणी पश्यन्तु, मा कश्‍चित दुःखभाग भवेत ॥

आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी सदैव विश्‍व कल्याणाची चिंता केली आहे. संपूर्ण विश्‍वात सर्वजण सुखी असावे अशीच प्रार्थना त्यांनी ईश्‍वराकडे सतत केली आहे.

मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्युपर्यंत सुखाचा शोध घेत असतो. सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दर्शन म्हणजेच तत्त्वज्ञान ही एक अत्यंत प्राचीन परंपरा आहे. वैदिक तत्त्वज्ञानात ‘षट्दर्शन’ सहा तत्त्वज्ञान सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, सांय दर्शन, योग दर्शन, मीमांसा दर्शन व वेदांत दर्शन. ‘योग दर्शन’ची रचना महर्षीपतंजली यांनी ‘‘योगसूत्र’’ या ग्रंथामध्ये केली आहे.

योग हा संस्कृत भाषेतील ‘युज’ या धातूपासून बनलेला शब्द आहे. युज याचा अर्थ बांधणे, एकत्र जुळवणे, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे होय. आपले मन हे अतिशय चंचल असते, या चंचल मनास एका ठिकाणी बांधून ठेवणे हे अवघड आहे. मनाच्या या चंचल वृत्तीला म्हणजेच या चित्तवृत्तीचा निरोध म्हणजेच योग होय. या योगाची आठ अंगे आहेत.

(१) यम = समाजाच्या नैतिक आचरणाचे सिद्धांत. (२) नियम = वैयक्तिक आचरणाविषयक विधिनिषेध 

(३) आसन = स्थिरत्व, आरोग्य आणि अवयवांचा सुटसुटीतपणा. 

(४) प्राणायाम = प्राण (जीवनशक्ती)चा विस्तार 

(५) प्रत्याहार = इंद्रियांवर संयम, आत्म केंद्रित होणेे

व एकाच विषयावर लक्ष केंद्रित करणे. 

(६) धारणा = एकाच उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणे (७) इतर सर्व गोष्टी पूर्णपणे विरून एकाच विषयाचे सतत चिंतन आणि 

(८) समाधी = तलस्पर्षी ध्यानाच्या साहाय्याने ध्यानविषय म्हणजेच परमात्मा आणि साधक यांची एकरुपता अनुभवण्याची स्थिती.

यम व नियमांमुळे आपल्या भावना आणि वासना नियंत्रणात राहतात आणि आपल्या बांधवांशी संबंध जिव्हाळ्याचे राहतात. तर आसनांमुळे शरीर निरोगी, बलवान आणि निसर्गाशी संवादी राहते.

सध्याची जीवघेणी स्पर्धात्मक परिस्थितीत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी सतत धावपळ करत असतो.  विद्यार्थी परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी, तरुण नोकरी मिळवण्यासाठी तर जे नोकरदार आहेत ते असलेली नोकरी टिकवण्यासाठी धावपळ करत असतो. अतिशय श्रीमंत व्यक्तीला सुद्धा काहीना काही चिंता सतावत असतात. अशा परिस्थितीत आपल्याला चुकून अपयश आले तर आपण एकदम निराश होतो. आता सगळ संपलं आहे, माझ्यापुढील सर्व वाटा बंद झाल्या आहेत अशी समजूत करून आता माझ्या जगण्याचा काहीही अर्थ नाही अशी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करून ईश्‍वराने दिलेला हे बहुमोल मानवजन्म संपवण्यापर्यंत पाऊल उचलतो. 

शाळा, क्लासेस नोकरी या मागे धावताना व आहार-व्यवहाराच्या चुकीच्या पद्धतींमुळे परमेश्‍वराने जे शरीर आपल्याला दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष होते व विविध रोगांना आमंत्रण दिले जाते. वास्तविक हे शरीर सांभाळण्याची आपली जबाबदारी आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष होऊन लहान वयात मधूमेह, उच्च रक्तदाब, हृदय रोग, नैराश्य यांना आपण बळी पडतो. आरोग्य सुधारण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो, भल्या मोठ्या फी दिल्या जातात.  त्यातूनही आरोग्य सुधारेलच याची शाश्‍वती नसते.

‘सर्वे भवन्तु सुखिनः...’ ही संकल्पना घेऊन  २७ सप्टेंबर २०१४ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसभेत ‘योगदिन’  साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. ११ डिसेंबर २०१४ रोजी १९३ देशांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली व २१ जून हा दिवस ‘विश्‍व योगदिन’ म्हणून साजरा करण्यास १७५ देशांनी समर्थन दिले. या वेळी संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष ‘सैम के कुटेसा’ यांनी वक्तव्य केले की, ‘‘या प्रस्तावाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेले समर्थन म्हणजे योगाला आपल्या जीवनात आलेले महत्त्व सांगून जाते’’. २१ जून या दिवसाचे महत्त्व म्हणजे या तारखेला दिवस व रात्र समसमान असतात. या दिवशी सूर्यकिरण पृथ्वीवर लंबरूप असल्याने मानवाला खूप ऊर्जा मिळते. म्हणूनच हा दिवस ‘विश्‍व योगदिन’ म्हणून सर्वत्र साजरा करण्याचे ठरिवण्यात आले व २१ जून २०१५ रोजी पहिला विश्‍व योगदिवस संपूर्ण जगात साजरा झाला. १५० पेक्षा अधिक देशांनी त्या दिवसाचे आयोजक्तव व प्रायोजकत्व स्वीकारले.

अशा प्रकारे भारत पुन्हा एकदा विश्वगुरुपदी विराजमान झाला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. साक्षात देवांनाही ज्या भूमीवर जन्म घ्यावसा वाटला, अनेक थोर राजे, वैज्ञानिक व ऋषीमुनींचा जन्म ज्या भूमीत झाला अशा भूमीत आपला जन्म झाला आहे. त्या अर्थाने आपण सर्वजण पुण्यवानच आहोत. या ‘योग’रूपी गंगेचा पावन प्रवाह संपूर्ण विश्‍वात वाहून नेण्याची जबाबदारी आपलीचआहे व ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण सारे तन-मन-धनपूर्वक कटिबद्ध होऊ या,हाच या योगदिनाच्या निमित्ताने शुभ संकल्प.

जय हिंद, वन्दे मातरम्

 

     मनोजकुमार साळी

     महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,

     पुणे