शाळेची तयारी

दिंनाक: 20 Jun 2018 15:14:40


सुट्टीचाही कंटाळा येतो, नाही? जून महिना आला की, शाळा कधी सुरू होते असं होतं. शाळेत पुन्हा जायचीही गंमत असते. गंमत? हो जरा शाळेची तयारी तर आठवा म्हणजे त्यातली धम्माल लक्षात येईल.

किती नवलाई! किती उत्सुकता! किती नवीन गोष्टी! वर्गसुद्धा नवीन. सगळ्यांसाठीच नाही हं! काही जण परत परत त्याच वर्गात बसतात. बसू दे ना. आवडत असेल एखाद्याला तोच तोच वर्ग. तुम्हाला काय करायचंय? पण तुम्ही हे आता वाचताय-लिहिताय म्हणजे तुम्ही नक्कीच पुढच्या वर्गातली मंडळी असणार.

आपली शाळा सुरू होणं आणि पाऊस पडणं याचा जवळचा संबंध आहे. शाळा सुरू झाली की, त्याला कळतं. कसं कळतं कोणास ठाऊक? आता व्हॉटस्अप वगैरे आहे, कळत असेल. पण ते नव्हतं तेव्हापासून त्याला बरोबर कळतं. मग तो ना बरसायला लागतो. पण हे आपल्या-आपल्यातच ठेवा बरं. हे जर भूगोलाच्या शिक्षकांना सांगितलंत ना तर तुमच्या पाठीत ढग गडगडतील आणि डोळ्यांत पाऊस येईल!

‘शाळेभोवती तळे साठून सुट्टी मिळेल काय?’ हे गाणं आताशा काही खरं होत नाही. पण पावसात भिजण्याची, चालण्याची, पाणी उडवण्याची काय गंमत असते ना. पण पावसाने आपलीच शाळा होऊ नये म्हणून रेनकोट, छत्री वगैरेची व्यवस्था करावी लागते. त्यांचे प्रकार तरी किती? पार स्पायडरमॅनपासून छोटा भीमपर्यंत. किती रंग, किती आकार. पार पारदर्शकीसुद्धा. काही मुलांच्या गणवेषाचा रंग अंगाच्या रंगासारखा असतो अशी मुलं जेव्हा असा पारदर्शक रेनकोट  घालतात ना तेव्हा त्यांनी आत काही घातलंय की नाही, असा भास होतो. अशा मुलांना आपला बुवा एक सल्ला आहे - शहाण्यासारखा रंगीत रेनकोट घ्यावा.

गणवेषाचं तसंच. आया हमखास मोठ्या मापाचा गणवेष घेतात. वाढत्या अंगाचा. म्हणजे सहावीतला वगैरे मुलगा असेल तर त्याला आठवीतल्या मुलाचा गणवेष घेतला जातो. अशा वेळी शर्टाचा डगला होतो, बुजगावण्यासारखा; तर मार्क कमी पडल्यावर आपल्याला कसं गळून गेल्यासारखं होतं, तसं पँटचं होतं. पँट कधाही गळून पडेल की काय असं वाटतं. मग काय- तिचा गळा कंबरपट्ट्याने आवळावा लागतो.

आणि नवीन दप्तर? काही आई-बाबा असं म्हणतात की ते त्यांच्या लहानपणी एकचं दप्तर कितीतरी वर्षे वापरायचे. गोणपटाची दप्तरं असावीत ती! मग त्यांच्यातच वह्या, पुस्तकं कोंबणं म्हणजे, आधी सांगितलं तसं, त्याच त्याच वर्गात बसण्यासारखं आहे ते! अरे, नवीन दप्तर म्हणजे मज्जा नाही का? रंगीबेरंगी चित्र आणि भरपूर कप्पे. असे भरपूर कप्पे-बिप्पे असल्याशिवाय त्यामध्ये स्टॅम्पस्, स्टीकर्स आणि क्रिकेटमॅचची वेळापत्रकं, पीसं अशा गोष्टी ठेवणार कशा? यात तर खरं जी.के.! शाळा सुरू झाली की हे मुलांनी मुलांसाठी चालवलेले सामान्य ज्ञानाचे जादा तास, छंदवर्ग सुरू होतात, इतरांसारखं नाही काही. सुट्टी पडली की छंदवर्ग सुरू, तसं ज्ञान दिल्याने वाढतं हे मुलांना पक्कं ठाऊक असतं. फक्त अशा अवांतर ज्ञानाची एकमेकांशी देवाण-घेवाण करताना मध्ये जे काही व्यत्यय असतात, ते फक्त तासांचे!

शाळा सुरू होतांना याही गोष्टींची जमवाजमव करावी लागते. पण ही तयारी आपण न सांगता करतो. तर बाकीची तयारी वह्या-पुस्तकं, बुट-मोजे इत्यादी पालक करतात. तेही ती तयारी न सांगता करतात. पालक-बिलक झाल्यावर हे करावंच लागतं.

मुख्य म्हणजे डोक्यावरचं टोपलं कमी करावं लागतं. टोपलं! हा आपल्या आयांचा वाढलेल्या केसांसाठी खास शब्द आहे. ते कापावे लागतात. म्हणजे शिक्षकांना कान-बिन धरायचाच झाला तर त्यांना सोपं पडावं म्हणून. केस हातात आले, ते पिरगाळले तर त्यांना झिणझिण्या थोड्याच येणार?

पण डोक्यावरच्या टोपल्याचं ओझ कमी करायचं. मग दप्तराच्या ओझ्याचं काय? ते कधी कमी होणार? पण ते पाठीवरचे ओझं असलं तरी मुलं शाळा सुरू होण्याची वाट पाहतात, हे नक्की! प्रत्येकाची शाळा वेगळी तरी तयारी तीच.

आता बास! नाही तर तुमची तयारी पूर्ण होईल आणि माझी तशीच राहील. काही जण नुसतेच बसले असतील तर सावध करतो... लागा तयारीला!

- ईशान पुणेकर

[email protected]