जोडी

दिंनाक: 02 Jun 2018 14:58:49


दिवस-रात्र बागेतच राहायचं म्हणजे रात्री थंडीत कुडकुडायचं, पहाटे दवात भिजायचं आणि दिवसभर उन्हात तापून निघायचं. म्हणजे... एकाच दिवशी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा! त्यामुळे ते दोघे चांगलेच भिजले होते. मस्त गारठले होते. 

हळूहळू सकाळ झाली.

त्याने हात ताणत.. साखळ्या हलवत आळस दिला.

ती मात्र तशीच अवघडून उभी होती.

सकाळी उन्हात अंग शेकायला तिला खूप आवडायचं. इतक्यात...त्याने हातातल्या साखळ्या खुळखुळवल्या आणि जोरात म्हणाला, ‘‘हॅलो, हॅपी बर्थ डे! हॅपी सिल्वर ज्युबिली!

अनेक छोट्या छोट्या मुलांना तू चढायला आणि घसरायला शिकवशील.

त्यांना हसताना पाहशील.

तू कायम त्यांच्या लक्षात राहशील.

याच माझ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!’’

त्याच्या अशा बोलण्यावर तिला काही बोलताच आलं नाही.

मागच्या आठवड्यात तीन माणसांनी मिळून तिला चांगल्या खरबरीत पॉलीश पेपरनं खसखसून घासलं होतं.

मग तिला स्वच्छं पुसलं होतं.

दोनच दिवसांपूर्वी तिला सुंदर रंगात रंगवलं होतं.

आता आपला पंचविसावा वाढदिवस आहे, हे तोपर्यंत तिला माहीतच नव्हतं.

तिला घासणार्‍या आणि रंगवणार्‍या माणसांचं बोलणं तिने ऐकलं, तेव्हा तिला काहीसं कळलं.

सकाळी उन्हं आल्यावर, जरा अंग तापल्यावर तिला मोकळं वाटलं.

‘‘व्वा! आज तर तू अगदी टकाटक दिसते आहेस! मस्त रंगवलं आहे तुला.

आज बागेत येणारी मुलं तर माझ्यापेक्षा तुझ्याकडेच जास्ती गर्दी करतील’’, त्याचं असं बोलणं ऐकल्यावर ती सुखावली.

तो पुढे म्हणाला, ‘‘काय गं, इतकी वर्षं जमिनीत पाय रोवून एकाच जागी उभं राहायचं म्हणजे भारीच काम आहे! कधी पुढं जाणं नाही, कधी पाठी जाणं नाही आणि नवीन काही पाहणं नाही. यामुळे तू अगदी कंटाळली असशील ना?’’

आता मात्र आपण बोललं पाहिजे, असं तिने ठरवलं.

घशातला रंग साफ करत ती म्हणाली, ‘‘अरे, वेडुल्या आपल्याला कंटाळा येऊन कसा चालेल?

हा कंटाळा कधी येतो? जेव्हा आपल्या जवळ मुलं नसतात तेव्हा! त्या वेळी आपण मुलांसोबत केलेली मज्जा आठवायची!

मुलांचं हसणं आठवायचं! आपल्याभोवती गरगरणारा मुलांचा आनंद आठवायचा! मुलांचा निरागस स्पर्श आणि आपल्यावरचा मुलांचा नितांत विश्वास जरा जरी आठवला तरी कंटाळा फुलपाखरासारखा क्षणात उडून जातो.

त्या वेळी आपण अतीव आनंदाने फुलासारखे डोलत असतो.’’

हे असं बोलत असताना मुलांच्या आठवणीने त्या घसरगुंडीच्या अंगावर आनंदाने काटा आला!

तिचा नवीन रंग सकाळच्या उन्हात चमचमू लागला!!

घसरगुंडी पुढे म्हणाली, ‘‘आणि झोपाळ्या, मी जरी एका जागी असले तरी फिरणारे सगळे माझ्याकडे येतात. त्यांच्याकडूनच मला नवनवीन गोष्टी समजतात. तुला सांगितलं तर खोटं वाटेल, पण मी दिवसा आकाशातले ढग आणि रात्री चमचमणार्‍या चांदण्या पाहात असते. कारण... ढग आणि चांदण्या आकाशात फिरत असल्या तरी ते मला खुणावत असतात, माझ्याशी बोलत असतात!’’

साखळ्या खळखळवत झोपाळा म्हणाला, ‘‘मी काय किंवा ते तिकडचं लांबचं चक्र काय, आम्ही दोघे फिरतो किंवा पळतो. पण तू मात्र एका जागी स्थिर सूर्यासारखी! सगळ्यांची आवडती गुंडीबुंडी!’’

घसरगुंडी मनापासून... शिडीपासून हसली.

घसरगुंडी म्हणाली, ‘‘अरे झोपाळ्या, तुझ्यामुळे मुलांना उंच जाण्याची ओढ लागते.

उंच झोका घेता-घेता भरारी मारावी अशी उर्मी त्यांच्यांत दाटून येते.

पाय न टेकतासुद्धा आपण स्थिर राहू शकतो आणि स्वत:च्या हिमतीने वरही जाऊ शकतो, हा अनुभव मुलांना तुझ्यामुळेच मिळतो. म्हणून, माझ्यापेक्षा तुझ्याकडे जास्ती गर्दी असली, तर मला आनंदच होतो’’, हे ऐकताच झोपाळ्याला भरून आलं.

आपल्या ओलसर साखळ्या मंदपणे हलवत झोपाळा म्हणाला, ‘‘ताई, तरीपण तू एक गोष्ट विसरलीस.

जेव्हा तुझ्यामुळे मुलांची उंचावरून खाली घसरत येण्याची भीती जाते, तेव्हाच ही मुलं माझ्याकडे येतात.

कारण... तेव्हाच त्यांना खालून वर जाण्याची, उंच जाण्याची ओढ लागलेली असते.

तुझ्यावरून घसरत येणारी मुलं माझ्या मदतीने पुन्हा वर झेपावतात.

हो ना?’’

घसरगुंडी प्रेमाने हसत म्हणाली,

‘‘म्हणून तर प्रत्येक बागेत तू आणि मी बाजूबाजूलाच असतो! कुठल्याही बागेत फक्त तू किंवा फक्त मी नव्हे;

तर आपण दोघे एकत्र असतो!

मुलांसाठी ही आपली जोडी अभेद्य आहे!!

‘घसरण्याच्या साहसातूनच उंच जाण्याचा ध्यास रुजतो’,

ही चिनी म्हण बहुदा तुमच्यावरूनच आली असेल असं वाटतंय मला!’’

असं चक्र गरगरत म्हणालं तेव्हा...

बागेतली सगळी झाडं सळसळून हसली.

त्यांनी फांद्या हलवत टाळ्या वाजवल्या तेव्हा...

झोपाळ्यावर आणि घसरगुंडीवर फुलांचा पाऊस पडला.

-राजीव तांबे 

[email protected]

 

पंचवीस वर्षे एकमेकांचे सख्खे शेजारी असणाऱ्या दोन मित्रांची कथा वाचा खालील लिंकवर 

बिग बॉस!