विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा ध्यास मनाशी घेऊन कार्य करणारे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मिसळून जातात. मात्र विषयांच्या अभ्यासासोबतच गायन, वादन या कलांचा विकास होण्यासाठी शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनीही वेळ देणे अपेक्षित असते. ही अपेक्षा पूर्ण करत गायन-वादन विकासाचे उत्तम उदाहरण घालून दिले प्रवीण डाकरे यांनी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाणकेवाडी, ता.शिराळा, जि. सांगली येथील प्रवीण दत्तात्रय डाकरे यांनी आनंददायी शिक्षणासाठी संगीत व गायन कलेचा वापर करून ई-लर्निंग साहित्य निर्माण केले आहे. मराठी, इंग्रजीसारखे विषय शिकवताना सरस अध्यापन होण्यासाठी संगीतमय वातावरणनिर्मिती करण्याची अभिनव कल्पना त्यांनी अंमलात आणली. दैनंदिन परिपाठदेखील संगीतमय परिपाठ होणाऱ्या शाळेत मनोरंजनातून शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली. मराठी व इंग्रजी विषयांसोबतच गायन कलेचा विकास होण्यास मदत झाली. सन २०११ पासून सुरू असलेल्या या उपक्रमासाठी इयत्तेनुसार टप्प्याटप्प्याने कवितांचा अभ्यास केला गेला. प्रवीण डाकरे यांनी इ.१ली ते इ.७वीच्या मराठी व इंग्रजी विषयांतील १२० कवितांना नावीन्यपूर्ण चाली लावल्या. शाळेची वेळ संपल्यानंतर घरी एका खोलीचा स्टुडिओ तयार केला. स्वत: प्रवीण डाकरे यांनी हार्मोनियमची साथ देऊन विद्यार्थ्यांकडून कवितागायन करवून घेतले. त्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले. या सर्व कवितांच्या एम्.पी.३ आणि व्हिडीओ करत संगीतमय ३०० अध्यापन घटकांची निर्मिती झाली. मराठी सोबतच पाढे पाठांतरावरही भर देण्यात आला. पाढ्यांना चाली लावून विद्यार्थ्यांच्या आवाजात पाढ्यांचेही रेकॉर्डिंग केले. या सर्व अध्यापन साहित्यांचे संकलन करून १४ संगीतमय अॅप्सची निर्मिती केली. हे अध्यापन साहित्य डाऊनलोड करण्यासाठी ८ लाख ५० हजार व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत. यातील अनेक अॅप्स हे ऑफलाईन अॅप्स आहेत. डिजीटल शाळांना सहज वापरता येईल असे साहित्य बनवून त्यांनी pravindakare.blogspot.com या नावाने ब्लॉग तयार केला. स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य असणारा महाराष्ट्रातील हा पहिला ब्लॉग आहे. विद्यार्थ्यांना गायनाची आवड निर्माण होऊन तालुका व जिल्हास्तरावर प्रार्थना व समूहगीते स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावली आहेत. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रवीण डाकरे यांनी ‘लेजीम’ या विषयातही विशेष कार्य केले. त्यांनी ढाणकेवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लेजीमचे ९ भाग सफाईदारपणे खेळायला शिकवले. विद्यार्थ्यांचे ‘बाल भजनी मंडळ’ तयार करून विद्यार्थ्यांना अभंगाची गोडी लावली. हे विद्यार्थी सध्या २-३ तासांचा भजनाचा कार्यक्रमही करतात. ३६ जिल्ह्यांतील हजारो शिक्षकांनी ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमात प्रवीण डाकरे यांचे ‘कला’ या विषयातील काम पाहिले. आज अनेक शाळा त्यांच्या या साहित्याचा उपयोग अध्ययन अध्यापनात करतात. शालेय परिपाठ एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व शाळांना ऐकता यावा म्हणून ‘गुरुकुल रेडिओ’ या वाहिनीवरून सकाळी १० वाजता परिपाठ सर्वांना ऐकायला मिळत आहे. कला विषयाचा अध्ययन अध्यापनात उपयोग करून मराठी, इंग्रजी सोबतच गायन व लेजीम यांची विद्यार्थ्यांना आवड लावण्याचा नवउपक्रम करणाऱ्या प्रवीण दत्तात्रय डाकरे यांना २०१८ साठीचा कला विभागातील ‘शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

-प्रतिनिधी 

[email protected]