वेळेचे महत्त्व

दिंनाक: 16 Jun 2018 14:59:20


आपल्याला मोठी माणसे म्हणतात, ‘‘अरे, अभ्यास करा, अभ्यास करा.’’ पण अभ्यास म्हणजे काय? अभ्यास करायचा म्हणजे काय करायचे? याबद्दल कुणी काही सांगत नाही, बोलत नाही. चला, आपण अभ्यासावर बोलू काही! 

मित्रांनो, जूनमध्येच आपण काही गोष्टी मनाशी ठरवून टाकू या. तशा त्या सोप्याच गोष्टी आहेत. दररोज शाळेत जायचे. एकही दिवस शाळा बुडवायची नाही. वेळापत्रकाप्रमाणे आपली पुस्तके, वह्या शाळेत न्यायच्या. पुस्तक किंवा वही विसरायची नाही. बाईंनी किंवा सरांनी सांगितलेला ‘घरचा अभ्यास’ रोजच्या रोज करायचा. नियमितपणे खेळासाठी वेळ द्यायचा.

सकाळच्या शाळेतील मुलांसाठी :

काही मुलांची शाळा सकाळी असते. त्या मुलांनी आपले वेळापत्रक-म्हणजे पूर्ण दिवसाचे वेळापत्रक ठरवले पाहिजे. सकाळी धावपळ न करता शांतपणे आपल्या सगळ्या गोष्टी आवरल्या पाहिजेत. दात घासणे, स्वच्छ आंघोळ करणे, दूध पिणे अशा सर्व गोष्टी चांगल्या रीतीने होण्यासाठी सकाळी लवकर जाग आली पाहिजे. आपली झोप सात तास झाली पाहिजे. त्यासाठी रात्री १०.३० वाजता झोपले पाहिजे.

दिवसभराच्या आपल्या कार्यक्रमात काही निश्चितपणा हवा. उदा. दुपारी एकपर्यंत जेवणे, दुपारी ३ ते ४.३० या वेळेत गृहपाठ करणे, अवांतर पुस्तकांचे वाचन करणे, सायं. ५ ते ७ खेळणे, संध्याकाळी ७ ते ८ व रात्री ९ ते १०.३० अभ्यास करणे, त्यामध्ये वाचन, लेखन, पाठांतर, नकाशा वाचन, नकाशा भरणे, विज्ञानातील प्रयोगाच्या आकृत्यांचा सराव, भूमितीच्या आकृत्यांचा सराव या गोष्टींचा सराव करणे, यांचा समावेश करता येईल. रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे आपल्या दुसऱ्या दिवशीच्या शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले दप्तर भरणे आवश्यक आहे.

दुपारची शाळा असलेल्या मुलांसाठी वेळापत्रक :

काही मित्रांची शाळा दुपारी म्हणजे ११ किंवा १२ वाजता असते. त्यांचा विचार करू या.

सकाळी ५.३० ते ६च्या दरम्यान मुलांनी जागे होऊन, दात घासून, स्वच्छ होऊन एक ते दीड तास नियमितपणे अभ्यासासाठी वेळ दिला पाहिजे. रात्री १०.३० वाजता झोपले पाहिजे. सकाळच्या या वेळेत नियमितपणे वाचन, विषय समजून घेणे, सुभाषिते, कविता, स्पेलिंग यांचे पाठांतर यासाठी वेळ द्यावा. सामान्यपणे ८.३० ते १०.३० या वेळेत वाचन, लेखन, प्रश्‍नांची उत्तरे लिहिणे, अवांतर वाचन, सामान्यज्ञानासाठी वाचन करणे आवश्यक आहे. ११ ते ६ ही शाळेसाठी वेळ. सायंकाळी ६ ते ७ हा वेळ नियमितपणे खेळासाठी द्यावा, सायंकाळी ७ ते ८.३० वाजता ‘घरी करण्यास सांगितलेला अभ्यास’ (गृहपाठ) नियमितपणे करावा, रात्री ८.३० ते ९.३० जेवण, ९.३० ते १०.३० अभ्यास करणे आवश्यक. झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशीचे दप्तर भरून ठेवावे.

वेळेचे महत्त्व :

परीक्षा जवळ आली म्हणजे जागरण करून अभ्यास करणे पूर्णत: चूक आहे. आपल्या परीक्षांच्या व चाचण्यांच्या तारखा अगोदरच जाहीर होतात. त्यामुळे अभ्यासाला खूप अगोदरच सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या मनावर ताण येत नाही.

अभ्यास ही आनंददायक गोष्ट आहे. आपला विषय समजून घेणे, त्या विषयाचा तपशील, कार्यकारणसंबंध समजून घेणे जसे महत्त्वाचे असते, तसेच त्या विषयावर विचार करणेही महत्त्वाचे असते. आपण वाचले ते आपल्याला समजले का? ते आपल्याला आठवते का? हे आपण पाहिले पाहिजे. त्यासाठी वाचन, स्मरण यांना लेखनाची जोड द्यायला हवी. मग हे सगळे करायचे तर त्यासाठी पुरेसा वेळ द्यायलाच हवा. शांतपणे वाचणे, विचार करणे, महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे लिहून काढणे यासाठीही वेळ द्यायला हवा.

अवांतर वाचन हाही अत्यंत आनंदाचा भाग आहे. प्रसिद्ध लेखकांचे वाङ्मय, महान व्यक्तींची चरित्रे, विज्ञानाच्या शोधकथा, प्रवासवर्णने, अन्य देशांची माहिती, आपल्या भारताचा उज्ज्वल इतिहास यांसारख्या अनेक विषयांचे वाचन करण्यासाठीही वेळ काढायला हवा.

यावरून लक्षात येईल की, मुलगा/मुलगी चौथी-पाचवीत असो की नववी-दहावीत, आपल्या वेळेचा उपयोग जाणीवपूर्वक करण्याचा त्याने/तिने जूनमध्येच निश्चय केला पाहिजे.

वेळेच्या नियंत्रणाची साधने :

आपल्या वेळेचे गणित आपल्यालाच समजले पाहिजे. त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे आपले प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक करून ते आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी लावा. आपल्या चाचण्यांची व परीक्षांची वेळापत्रके लावून ठेवा. आपण आपली रोजची दैनंदिनी (डायरी) लिहावी. त्यात महत्त्वाच्या घटना, अभ्यासासाठी दिलेला वेळ, महत्त्वाची पुस्तके व लेखकांची नावे यांच्या नोंदी ठेवाव्यात.

विद्यार्थी मित्रांनो, वेळेचे महत्त्व लक्षात ठेवा. वेळ ङ्गुकट घालवू नका. ‘परीक्षा म्हणजे संकट नव्हे, तर परीक्षा म्हणजे पराक्रम करून दाखवण्याची संधी’ हे लक्षात ठेवा. आपला अभ्यास व अभ्यासाची वेळ याकडे आपण स्वत:च लक्ष देण्याची सवय ठेवा.

- श्रीराम वा. कुलकर्णी

[email protected]