अनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी दिल्लीतल्या एका ऑफिसात लिफ्टची वाट बघत उभी होते. लिफ्टचं दार उघडलं, तेव्हा लिफ्टमधून चक्क एक लंगूर जातीचं दोरीने बांधलेलं माकड आणि त्याला घेऊन जाणारा माणूस बाहेर पडला. मला आश्चर्याचा धक्काच बसला की, एखाद्या ऑफिस बिल्डिंगमध्ये लिफ्टमधून माकडाला घेऊन माणूस बाहेर आला. नंतर थोडी चौकशी केल्यावर मला एकदम इंटरेस्टिंग माहिती मिळाली. दिल्लीत सर्वसाधारणातःच माकडांचा खूप उपद्रव आहे. ही माकडं म्हणजे आपल्याला सर्रास दिसणारी लाल माकडं ज्याला ऱ्हीसस असं शास्त्रीय नाव आहे. घरांच्या अंगणातून, टेरेसवरून, मोठ्या मोठ्या झाडांच्या फांद्यांवरून, बिल्डिंगवरून एवढंच काय तर अगदी नेहेमीच्या रस्त्यांवरून या माकडांच्या टोळ्यांच्या टोळ्या दिसतात अनेकवेळा दिल्लीत. मुंबईतल्या, पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठच्याही शहरातल्या माणसांना हे ऐकून धक्काच बसेल की देशाची राजधानी असणाऱ्या या शहरात माकडांचा एवढा उपद्रव असावा. तर या ऱ्हीसस माकडांना पळवण्यासाठी लंगूर माकडं आणली जातात . या लंगूर माकडाला दोरीला धरून एक माणूस बिल्डिंगच्या छतावरून किंवा इतर ठिकाणी जिथे माकडं बागडत असतात ऑफिसांमध्ये तिथून फेरी मारून आणतो . या लांगूरला घाबरून ऱ्हीसस थोडा वेळ पळतात दुसरीकडे. परत थोड्या वेळाने किंवा एक दोन दिवसांनी परत येतात, मग परत लंगूरची एक फेरी. गंमत म्हणजे या लंगूर माकडाला सरकार आउटसोर्स करतं. म्हणजे काय तर ऱ्हीसस माकडांना पळवण्यासाठी लंगूर माकड आणि त्याला घेऊन फिरणारा माणूस हवा आहे अशी जाहिरात सरकार प्रसिद्ध करतं आणि बाकी सगळे नियम पाळून या माकडांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलं जातं. फक्त दिल्लीतच नाही तर आग्रयासारख्या महत्त्वाच्या रेल्वेस्टेशनावरही प्रवाशांना माकडांचा त्रास होतो म्हणून रेल्वेने लंगूर कंत्राटी पद्धतीने घेतलेले आहेत. तुम्ही जर यू - ट्यूबवर शोधलं तर तुम्हाला या लंगूर आणि ऱ्हीससच्या गमतीचे व्हिडीओ पाहायला मिळतील. खरं म्हणजे या ऱ्हीससना पळवायला लंगूर आणायचा हा काही जालीम उपाय नाही. माकडं परत परत येतच राहातात  आणि लंगुरना तरी कुठे कुठे फिरवत राहाणार. मला काही माहीतगार माणसांनी असंही सांगितलं की, अशी लंगूर पाळायची आणि ज्यांना गरज असेल तिथे घेऊन जायची हा एक व्यवसायच आहे काही लोकांसाठी दिल्लीमध्ये. मजेशीर आहे ना? आपण एखाद्याला विचारलं की तू काय करतोस? तर तो म्हणतो की मी ऑफिसांना लंगूर माकडं पुरवतो. 

आता माकडांपासून जरा लांब पळू या आणि दिल्लीतल्या एका दिमाखदार पक्ष्याकडे बघू या. तो आहे मोर. दिल्लीत अनेकवेळा रस्त्यांवर मोर दिसतात. मला तर एकदा पिसारा फुलवलेला मोरसुद्धा दिसला आहे रस्त्यावर. मोर, लांडोर दोन्ही रस्त्यावर अगदी नाजूकपणे इकडे तिकडे फिरताना दिसतात खूप वेळा. रस्त्यावरून जाताना आसपासच्या मोठ्या झाडांच्या दाटीतूनही अनेकवेळा मोरांचा केकारव ऐकू येतो. काही मुलांना हा केकारव शब्द माहीतही नसेल कदाचित. मोराच्या आवाजाला केकारव म्हणतात बरं . 
दिल्लीचा विशेषतः राजधानीचा जो परिसर आहे, तिथे मोठी मोठी जुनी झाडं आहेत. या रस्त्यांवरून जाताना अनेक पक्ष्याचे आवाज ऐकायला मिळतात. कोकीळ, सुतार पक्षी, टिटवी यांचे आवाज हमखास ऐकू येतात. या झाडांच्या हिरव्या गर्दीत बारकाईने पाहिलं तर पक्ष्याची वेगवेगळ्या आकाराची घरटीसुद्धा दिसतात. या झाडांवरून तुरुतुरु पळणाऱ्या, झुबकेदार शेपटीवाल्या खारूताई दिसतात. मला एकदा एका उंच झाडाच्या वरच्या भागातल्या ढोलीत छोटंसं घुबडही दिसलं होतं. मी त्या घुबडाकडे बराच वेळ बघत होते. घुबडाची मान १८० अंशातून फिरू शकते हे मी ऐकलं होतं, पण त्यादिवशी मी ते पाहिलंसुद्धा. 
 
आता तुम्ही कधी दिल्लीत जाल, तेव्हा इथल्या रस्त्यांवर बारीक लक्ष ठेवा. फक्त झाडांवरच नाही तर अगदी तुमच्या समोरच्या रस्त्यावरही माकड,  मोर, खारूताई काहीही  दिसू शकतं तुम्हाला. 
 
 
-सुप्रिया देवस्थळी 
 
 
 
दिल्लीच्या रस्त्यांबद्दल अजून काही गमतीशीर गोष्टी जाणून घेऊ या खालील लिंकवर  

शोधू नवे रस्ते - भाग २