स्थळ - ईशिताचे घर

प्रसंग - 1

(ईशिताचा आज वाढदिवस असतो, सकाळी तिला ओवाळण्यासाठी सर्वजण हॉलमध्ये जमलेले असतात. ईशिता छान कपडे घालून येते.)

 

आजोबा : आज आमच्या घरी एका लाडोबाची खूप खूप मज्जा आहे हं...!

बाबा : मग काय? आता ओवाळण्यासाठी नवीन कपडे, संध्याकाळी केक कापतानाही आणखीन वेगळे नवीन कपडे. मज्जाच मज्जा!

दादा : गोड देशाची राजकुमारी पेढाबाई! (सोफ्याकडे हात दाखवत) आपण आपल्या सिंहासनावर स्थानपन्न व्हावे. आपल्या नवव्या वाढदिवसानिमित्त ओवाळण्यासाठी आपल्या मातोश्री येणार आहेत हो! ऽ ऽ ऽ

ईशिता : (खोट्या रागाने) आजोबा, बाबा झालं का तुमचं चिडवून आणि दादा तुझी दवंडी पिटवून झाली का? वाढदिवसादिवशीही तुम्ही तिघे मला...

दादा : (ईशिताचे वाक्य अर्धवट तोडत) त्रास देणार नाही.

दादा : (तिघंही नकारार्थी मान हलवतात) नाही, नाही; जरा जास्तच त्रास देणार!

ईशिता : (त्याच्यामागे त्याला मारायला धावते.) थांब. अरे, दादा थांब मोठा आहे म्हणून तुझी ही दादागिरी का?...

दादा : (पळत) हो मी मोठ्ठा आहे. त्यामुळे तुला त्रास देणं हा हक्कचं आहे माझा.

ईशिता : (मोठ्याने) एं! आई बघ ना! दादा त्रास देतोय.

आई : ( खोट्या रागाने) काय रे ईशान? आजचा दिवस तरी तिच्या कलेने घे. ईशिता, तू चल बसं इथे खुर्चीत.

(ईशिता खुर्चीत बसते. आई ईशिताला ओवाळते तिला पेढा खाऊ घालते.)

दादा : पेढाबाई, पेढा खाऊन वेडाबाई झाल्या!

ईशिता : (रागाने) दादा ऽ ऽ ऽ

(औक्षण झाल्यावर ईशिता मोठ्यांच्या पाया पडते. सगळे जण कौतुकाने तिला भरभरून आशीर्वाद देतात.

आजोबा : (ईशिता आजोबांच्या पाया पडते.) ईशिता बेटा, चिरंजीव भव!

ईशिता : आजोबा, चिरंजीव भव म्हणजे काय?

आजोबा : चिरंजीव म्हणजे ज्याला मरण नाही, अंत नाही असे म्हणजे अमर होणे. असं म्हणतात की, सात चिरंजीव या पृथ्वीवर आहेत म्हणून. त्या सात जणांपैकी महाभारतातील अश्वत्थामा आणि रामायणारतील श्रीराम भक्त हनुमान हे चिरंजीव आहेत.

 

प्रसंग - 2

(दुपारच्या सुमारास आजोबा, बाबा आणि ईशिता संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी लागणारे सामान म्हणजे फुगे, वाढदिवसाचा केक, झिरमिळ्या वगैरे सामान घेऊन येत होते. सोसायटीच्या हॉलमध्ये गर्दी दिसते.)

बाबा : (चेष्टेने) काय हो राणीसाहेब, आलं का सगळं सामान. नीट बघून घ्या.

ईशिता : आलं हो बाबा. पण सगळ्यात मस्तं तर केक आहे.

आजोबा : चला तर आता घरी जाऊन फुगे फुगवावे लागतील. (आजोबांचे लक्ष हॉलकडे जाते. अरे, सुमीत इथं गर्दी कसली?

बाबा : (डोक्याला हात लावत) अरेच्च्या! विसरलोच मी, अहो बाबा आपल्या सोसायटीत आज रक्तदान शिबीर आयोजित केलं आहे. मी आलोच. तुम्ही फुगे फुगवा. मी रक्तदान करून आलोच.(असे म्हणून तिचे बाबा हॉलकडे जायला लागतात.)

ईशिता : बाबा ऽ ऽ ऽ

आजोबा : ईशिता, जाऊ दे बाबांना आपण फुगे फुगवू.

ईशिता : कसलं दान म्हणाले बाबा?

आजोबा : रक्तदान.

ईशिता : रक्तदान? ते काय असतं? आपण हॉलमध्ये जाऊन बघूयात का? चला ना आजोबा, चला असे म्हणत ईशिता आजोबांना हॉलकडे घेऊन जाते.)

 

प्रसंग - 3

(ईशिताचे बाबा रक्तदान करत असतात. बाबांच्या हाताला सुई, नळी लावलेली असते. रक्त एका प्लॅस्टिकच्या बाटलीत भरत असतं.)

ईशिता : (ते बघून घाबरते.) आजोबा, बाबांना काय केलंय? त्यांना त्रास होईल ना?

आजोबा : (हसत) ईशिता, तुझा बाबा खूप स्ट्रॉग आहे. त्याला काही होणार नाही.

ईशिता : (आश्चर्याने) मग हे काय आहे?

आजोबा : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. कारण त्यामुळे दुसऱ्याला आपण जीवनदान देतो. दुसऱ्याचा जीव वाचवल्याचे जे काही समाधान असते, आनंद असतो. तो कितीही पैसे दिले तरी मिळत नाही. म्हणूनच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला खूप महत्त्व आहे.

ईशिता : (आश्चर्याने) आजोबा, काय बोलत आहात? मला काही समजत नाहीये. रक्तदान, रक्तदाता, जीव वाचवणे, आनंद, समाधान हे सगळं काय आहे? नीट समजावून सांगा ना?

आजोबा : (समजवून सांगतात) ईशिता डॉक्टर लोक जेव्हा एखाद्या रुग्णाचे ऑपरेशन करतात ना, तेव्हा त्यांना त्या रुग्णांसाठी या रक्ताची गरज लागते. म्हणून ते ‘ब्लडबँक’कडे संपर्क साधतात. रक्तदाता जे रक्त‘दान’ करतो ते या ब्लडबँकेत जमा होतं. आपण ज्या व्यक्तींना कधी ओळखत नसतो, त्यांना आपण रक्त देऊन निस्वार्थपणे मदत करतो.

ईशिता : (आश्चर्यचकित होऊन) मी कधी या गोष्टीचा विचारच केला नव्हता.

आजोबा : आणि, हो ईशिता. मी तुला आणखीन एक गंमत सांगतो.

ईशिता : कोणती?

आजोबा : रक्त ही एक अशी गोष्ट आहे की ती कोणत्या कारखान्यात किंवा प्रयोगशाळेत बनत नाही आणि दुसर्‍या कोणत्याही प्राण्याचे रक्त आपल्याला चालत नाही. ते माणसानेच माणसासाठी रक्तदान करून ब्लडबँकेत जमा करावे लागते. त्यामुळे माणूस माणसाच्या जवळ जातो आणि एकाच स्तरावर सगळं येऊ उभं राहात. आपल्याला रक्तदान केल्याचा त्रासही होत नाही. कारण आपल्या शरीरात तीन महिन्यात पुन्हा तेवढंच रक्त निर्माण होत असतं. रक्तदाता, जणू समाजाच्या प्रति आपले कर्तव्य बजावत असतो.

ईशिता : (आनंदात) आजोबा, मलाही आज माझ्या वाढदिवसादिवशी हे छान काम करू द्या ना. मी पण रक्तदान करते.

आजोबा : अगं, तू अजून लहान आहेस. रक्तदान करण्यास 18 वर्षेपूर्ण लागतात. तसेच डॉक्टर रक्तदात्याची पूर्ण तपासणी करतात. म्हणजे रक्तात कोणते आजार असले तर तो त्रास दुसऱ्याला नको म्हणून.

ईशिता : ठीक आहे आजोबा. व्यायाम करून मी माझी तब्येत नीट ठेवीन. 18 वर्षेपूर्ण झाली की, रक्तदान करीन.

आजोबा : हे कसे चांगल्या गुणी मुलीसारखे बोललीस.

(तेवढ्यात ईशिताचे बाबा रक्तदान करून येतात. तेव्हा ईशिता कमरेत वाकते, काठी टेकत, खोकत बाबांकडे जाते.)

बाबा : (आश्चर्याने) अरे आजीबाई, तुम्ही इकडे कुठे?

ईशिता : (गंभीर आवाजात) आशीर्वाद देण्यास आली आहे.

बाबा : कोणता?

ईशिता : रक्तदाता, चिरंजीव भव! आजोबा,  तुम्ही सकाळी मला दिलेला आशीर्वाद पुढे मी रक्तदात्याला देते.

(बाबा ईशिताला जवळ घेऊन कौतुकाने डोक्यावरून हात फिरवतात. तिघे मनमोकळेपणाने हसतात.)

आजोबा : (हसत) चला आजीबाई, तुमचा नवव्या वाढदिवसाची तयारी करुयात!

- शुभांजली शिरसाट

[email protected]