“सर, रोज चणे कुणासाठी नेता?” दुकानदारानं विचारलं.

“घरी पाहुणे आलेत ना?”

“चणे खाणारे पाहुणे?”

“होय, बिट्टू आणि बिल्लू.”

“हे कोण बरे?”

“खारीची पिल्लं. त्यांना भाजलेले चणे, फळांचे सुकवलेले तुकडे, बिस्किटांचे तुकडे खूप आवडतात.”

“अस्सं? कुठे सापडली ही पिल्लं? जरा सांगा की सगळं.”

“असं म्हणता? सांगतोच तर मग त्याची गोष्ट... ऐका तर...”

निगोंडा नावाचा, सहावीत शिकणारा मुलगा माझ्या मुलाचा म्हणजे गौरवचा मित्र. एकदा तो गौरवला हाका मारीत धावत पळत आमच्या घरी आला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चंद्र गवसल्याचा आनंद होता.

“गौरव, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय ते!”, असं म्हणत निगोंडा आपल्या मळक्या शर्टाच्या खिशातून काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही सारे जण उत्सुकतेनं त्याच्याभोवती जमलो. परंतु, खिशातलं ते काहीतरी अजिबात बाहेर यायला तयार नव्हतं. ते खिशालाच घट्ट चिकटून होतं. अखेर त्याच्या शर्टाचा खिसा उलट करण्याचा प्रयत्न करीत निगोंडानं खिशातून वळवळणारे दोन छोटे जीव बाहेर काढले. खारीची एक नव्हे, चक्क दोन पिल्लं होती. खारीची नुकतीच डोळे उघडलेली, चिमुकली गोजिरवाणी पिल्लं होती ती.

“अरे, कुठे सापडली ही तुला? आणि काढून का आणलीस त्यांना घरट्यातून? त्यांची आई शोधात बसेल ना त्यांना?”

“तिकडे वर डोंगराच्या बाजूला काही लोक खूप झाडं तोडतायत. त्यातल्या एका झाडावर खारीचं घरटं तं. त्यातून ही पिल्लं खाली पडली. झाडं तोडणारे त्यांना मारून टाकतील, म्हणून मी ती उचलून खिशात लपवली. गौरवसाठी आणली.”

निगोंडानंं सोबत आणलेलं, काठ्या व शेवरीचा कापूस यापासून बनवलेलं घरटंंही दाखवलं. गौरवनं त्या दोन्ही पिल्लांना तळहातावर घेतलं. नंतर घरट्यातल्या मऊ काट्यावर ठेवून ते घरटं लाकडी खोक्यात घालून सुरक्षित ठेवलं. अशा प्रकारे आमच्या घरी दोन नवे पाहुणे दाखल झाले.

आता या लहानग्या जिवांना जगवायचं कसं? हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता. दिवसभर प्रयत्न करूनही ते काही खाईनात. अखेर गौरवने जबरदस्तीनं ड्रॉपरने थोडं थोडंं दूध त्यांच्या तोंडात घातलं, तशी ती थोडी हुशारली. मग रोजच त्याना थोडं दूध-पाणी पाजून सुरक्षित ठेवण्याचंं काम गौरवनं हौसेनं स्वीकारलं. शेजाऱ्यांच्या बोक्याचा धोका असल्यानं त्यांना घरट्यात दडवून ठेवायला लागायचं. पण ती पिल्लंही इतकी हुशार, की त्या घरट्यात दडून बसली की अजिबात पत्ता लागत नसे. हळूहळू ड्रॉपरऐवजी चमच्यानं दूध पिऊ लागली. आंब्याचा रस, केळं, श्रीखंड, मुरडलेला भात, मऊ भिजवलेलं पीठ (कणिक) खाऊ लागली. पिल्लं झपाट्यानं मोठी होऊ लागली. बिस्किटाचा तुकडा, पाव, शेंगदाणे, पोळीचा तुकडा किंवा फळांचे तुकडे आवडीने खाऊ लागली. अर्थात त्यांना मनापासून आवडायचे ते भाजके चणे, किंवा महाबळेश्वरला मिळणारी नरम फ्रुट चॉकलेट्स.

आता दोन्ही पिल्लं चांगलीच गुबारली. मुठीत मावेनाशी झाली. यातला एक होता नर आणि दुसरी मादी. आम्ही नराचं नाव ठेवलं बिट्टू आणि मादीचं बिल्लू.

मुलांच्या अंगाखांद्यावर, झोपाळ्यावर खेळताखेळता ती पिल्लं मिळेल ते तोंडात पकडून चावायची. पिंजऱ्यात कोंडून ठेवलं तर विदुषकी चाळे करायची. सशासारखे दोन पायावर बसून कुरुकुरू शेंगदाणे खायची. माकडासारखं स्वतःला उलट टांगून झोके घ्यायची. पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी धडपडत. एकदा बाहेर काढलं की पुन्हा आता जायला तयार नसत. पण बोक्याच्या भीतीमुळे रात्री त्यांना पिंजऱ्यात ठेवावे लागे. एकदा घराच्या गच्चीवर त्यांना खेळायला सोडलं तर बिट्टू अचानक गायब झाला. खूप शोधलं, कुठे खाली पडला नाही ना? म्हणूनही पाहिलं. शेवटी बिल्लूूला उचलून पिंजऱ्यात ठेवलं आणि रात्री झोपलो, तर कुठूनसा ची ची असा आवाज येऊ लागला. गौरवसह सगळे पुन्हा गच्चीवर धावलो. गच्चीवरचं पाणी वाहून जायला जो पाईप बसवला होता, त्यातून आवाज येत होता. मोठ्या मुश्किलीनं बित्तूूला बाहेर काढलं. तो लहानगा जीव, तहान भूकेनं नुसता व्याकूळ झाला होता. तेव्हापासून त्यांना गच्चीवर खेळायला सोडताना आम्ही खूप दक्षता घेऊ लागलो. आता ते दोघं एकमेकांना साद घालायला शिकले. एक जण दूर गेला की दुसरा “हुर्रर्रSSS” असा आवाज काढी. एकदा अचानक घरात खेळता खेळता बिल्लू शेपटी हलवत कर्णकर्कश आवाजात ओरडू लागली – “च्यँग, च्यँग, च्यँग...” आम्ही सगळे अगदी बिट्टूसह ते ओरडणं कौतुकानं ऐकत होतो. खूप मजा वाटली तिच्या ओरडण्याची. मग बिल्लूनं बिट्टूलाही तसं ओरडायला शिकवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते जमेना. त्यांची ही शिकवणी खूप मजेदार वाटायची. अलीकडे मात्र दोघेही पिंजऱ्यात जायला नाखुश असायचे. आता ही पिल्लं पुरेशी मोठी झाली आहेत, ती स्वतःचं संरक्षण करू शकतील, या विचारनं आम्ही त्यांना पुन्हा डोंगरकडच्या जंगलात सोडण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात एकदा बिट्टू हरवला. खिडकीतून उडी मारून बाहेर पडला. दिवसभर गायब होता. आम्ही काळजीत होतो. आणि काय आश्चर्य, रात्री काळोख पडताना बिट्टू नेमका आमच्या दारात हजर झाला. मग पुन्हा एकदोनदा त्याला बाहेर सोडून तो रात्री परत येत असल्याची खात्री केली. आता मात्र त्या दोघांना बंदिस्त अवस्थेत वाढवण्यापेक्षा बाहेर निसर्गात वाढवणं योग्य होतं. मग एके दिवशी दोघांनाही दूर डोंगराकडे नेऊन सोडून आलो. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत ते दिसेनासे झाले.

त्या दिवशी आमच्या घरी खूपच गंभीर आणि उदासवाणं वातावरण होतं. गणपती विसर्जित करून आल्यावर वाटतं ना, तसं वाटत होतंं. लहानगा उत्कर्ष आणि मोठा गौरव दोन्ही मुलं स्वयंपाकघराच्या कट्ट्यावर बसून दूर खिडकीतून बाहेर नजर लावूनच बसली होती. बिट्टूला आणि बिल्लुला हाक मारीत होती. डोळ्यात पाणी आणून “ये ये” म्हणून खारींना बोलावत होती.

असेच दोन दिवस गेले आणि अचानक एके दिवशी सायंकाळी बिट्टू आणि बिल्लू यांची जोडगोळी पुन्हा एकदा आमच्या दारात येऊन टपकली. शोधत शोधत, आवाजाचा वेध घेत घरी आली आणि गौरवच्या खांद्यांवरून डोक्यावरून उड्या मारत खेळू लागली. घरात आनंदीआनंद पसरला. त्यांचा नीट पाहुणचार केला. दुसऱ्या दिवशी दोन्ही पिल्लं पुन्हा खेळायला बाहेर गेली. २–४ दिवसांनी भुकेने व्याकूळ होऊन आमच्या घरी परतली. हल्ली आजूबाजूच्या झाडांवर ती दिसतात का याचा शोध घेत गौरव, उत्कर्ष फिरतात. मला किंवा पत्नीला ती ओळखत नाहीत. परंतु आईच्या मायेनं सांभाळ करणाऱ्या गौरवला ती दुरूनही ओळखतात. भुकेनं व्याकूळ होऊन अचानक घरी येतात. तेव्हा त्यांना हवे असतात आवडीचे चणे–फुटाणे. म्हणून मी तुमच्याकडे रोज येतो चणे न्यायला, बरं का.

मी कथा संपवली.

अलीकडे मात्र दोघं यायची जरा कमी झालीत बरं का. गौरवच्या म्हणण्यानुसार बिल्लूनं बांबूच्या वनात घरटं करून पिल्लं घातली आहेत, तर बिट्टूनं दुसऱ्या एका खारीशी मैत्री केलीय. एकंदरीत दोघेही मजेत आहेत.

 

-सुहास बारटक्के

[email protected]