चार-पाच वर्षाचे एखादे ओळखीचे मूल समोर आले रे आले की, आपण कोणत्या प्रश्नांपासून सुरुवात करतो? पहिला प्रश्न "तुझे नाव काय?" आणि दुसरा हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "तू कोणत्या शाळेत जातोस?" एवढेच काय दोन पालक एकत्र भेटले की हमखास चर्चेत येणारा विषय असतो, तो म्हणजे शाळा.

 

शाळेने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक मोठा भाग कायम व्यापलेला असतो. लहानपणी विद्यार्थी म्हणून तर मोठे झाल्यावर पालक म्हणून. त्यामुळेच आपल्या घरात आयोजित केले जाणारे सण, समारंभ, नातेवाइकांना भेटणे, फिरायला जाणे, जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा, हे सगळे कुठे ना कुठे शाळेच्या वेळापत्रकाशी जोडलेले असतात.

 

आपल्या आयुष्यातील शाळा या अविभाज्य घटकाची निवड आपण नक्की कशी करतो?

घरात एखादी इलेक्ट्रोनिक्सची वस्तू आणायची असेल, फर्निचर करायचे असेल किंवा अगदी रोजच्या वापरासाठी कपडे घ्यायचे असतील, त्या वेळी आपण काय करतो. शक्य तितके पर्याय तपासून पाहतो, त्या गोष्टीविषयी शक्य तेवढी माहिती मिळवतो, आपल्या गरजा, आर्थिक क्षमता व समोर असलेले पर्याय याचा सांगोपांग विचार करतो. शक्य तेवढी चिकित्सा करून, घासाघीस करून, मगच अंतिम निर्णय घेतो.

 

शाळा निवडताना आपण तेवढीच चिकित्सक वृत्ती दाखवतो का? शिक्षण म्हणजे नक्की काय? आपली शिक्षणपद्धती नक्की आहे तरी कशी? शिक्षणपद्धतीची सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे? समाज म्हणून, पालक म्हणून आपले या शिक्षणपद्धतीशी नक्की नाते काय आहे? आपली मुले या सगळ्याकडे कसे बघतात? यापैकी कोणत्या गोष्टींचा विचार आपण शाळा निवडताना करतो?

 

असे अनेक प्रश्न घेऊन पुढचे काही महिने आपण आपल्या जीवनाशी, भविष्याशी अपरिहार्यपणे जोडली गेलेली शाळा व आजची शिक्षणपद्धती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रश्नांची उत्तरे अनेक शिक्षणतज्ज्ञांनी याआधीच वेगवेगळ्याप्रकारे दिली आहेतच. या वेळी मात्र या प्रश्नांची उत्तरे शिक्षणपद्धतीच्या अंमलबजावणीतील एक महत्त्वाचा व निर्णायक घटक अर्थातच पालक या भूमिकेतून शोधायचा आपण एकत्र येऊन प्रयत्न करणार आहोत.

 

प्रचलित शिक्षणपद्धतीविषयी तुमच्यापैकी अनेकांनी बरेच काही ऐकले असेल, वाचले असेल, एकमेकांशी भरपूर चर्चाही केली असेल. बहुतेक वेळा या चर्चेचा रोख आजची शिक्षणपद्धती कशी कालबाह्य आहे, मुलांचे नुकसान करणारी आहे, असाच असल्याचे तुम्ही अनुभवलेही असेल. खरेच प्रचलित शिक्षणपद्धती अशी आहे का?

 

या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल, तर सगळ्यात आधी आपल्याला, हे समजून घ्यावे लागेल की, आपल्या सगळ्यांचे साध्य "शिक्षण" आहे. शाळा व अभ्यासक्रम ही शिक्षण मिळवण्याची "साधने" आहेत, "साध्य" नव्हे. आज बहुतेक पालक शाळा, अभ्यासक्रम, परीक्षा आणि सर्टिफिकेट हेच साध्य समजत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा विचार हा फक्त शाळा, अभ्यासक्रम, माध्यम व परीक्षेपाशी रेंगाळून, शिक्षणपद्धती म्हणजे या तीनच गोष्टी आहेत असा गैरसमज होत आहे.

 

प्रचलित शिक्षणपद्धतीशी मुलाची ओळख होण्याआधी, ते मूल चालायला, बोलायला, स्वत:च्या भावना मांडायला, आजूबाजूचे जग त्याच्या परीने समजून घ्यायला "शिकलेले" असतेच. मुले हे सगळे कोणत्याही अभ्यासक्रमाशिवाय, स्वतंत्र इमारत, वर्ग किंवा शिक्षकाशिवाय शिकतात. म्हणजेच "शिकणे" ही नैसर्गिक प्रेरणा प्रत्येक सजीवामध्ये असतेच. प्रत्येक मूल त्याच्या गतीने, कलाने, त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी, आवश्यक त्या वेळी, कधी मोठ्यांचे अनुकरण करून तर कधी प्रत्यक्ष कृतीतून, वारंवार अपयशी होऊनही न थकता प्रयत्न करत शिकत असतेच. हे आपण प्रत्येकाने आपल्या घरात अनुभवल्याने शिकण्याची सुरुवात शाळेत जायला लागल्यापासून नाही तर जन्माला आल्यापासून होते, हे खरे तर आपल्याला "पुराव्यानिशी" माहिती आहेच.

 

म्हणूनच मुलांचे डोके म्हणजे "रिकामे मडके" आहे असे समजून त्यांना शिकवायला सुरुवात करण्याची गरज नाही. शिक्षण म्हणजे मुलांच्या डोक्यात सतत नवीन नवीन माहिती कोंबून, त्या माहितीलाच ज्ञानाचा दर्जा देणे नव्हे; तर शिक्षण म्हणजे मुलांच्या अंगभूत सर्जनशीलतेला प्रेरित करणे. शाळेत येण्याआधी मूल जे शिकले आहे, त्याचा उपयोग करून मुलांमधील कुतूहल जागृत करणे. शिक्षण म्हणजे मुलांना मिळालेली माहिती पडताळून पाहण्यासाठी, माहीतीचे आकलन करून घेऊन, योग्य पर्याय निवडण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी व त्यातून ज्ञान निर्मिती करण्यासाठी त्यांना मदत करणे हे आहे. 

 

शिक्षणाच्या या सगळ्या गरजा सध्याच्या शिक्षणपद्धतीत लक्षात घेतल्या आहेत का? सामाजिक परिस्थिती व मुलांच्या गरजा काळानुसार बदलत आहेत, हे आपण अनुभवत आहोतच. सध्याची शिक्षणपद्धती या बदलणाऱ्या परिस्थितीला, मुलांच्या वाढत चाललेल्या अपेक्षांना सामावून घेत, त्याप्रमाणे बदलून, कालसुसंगत होत आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, पुढच्या लेखात शिक्षणपद्धतीच्या इतिहासात डोकावून, प्राचीन शिक्षणपद्धतीपासून आपण सध्याच्या शिक्षणपद्धतीपर्यंत कसे येऊन पोहोचलो, हे बघणार आहोत.  

-चेतन एरंडे

[email protected]