बालविकास विद्या मंदिराचे प्रांगण विद्यार्थी व पालकांनी फुलून गेले होते. गेले तीन दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनाचा आज समारोप होणारा होता. गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ होता. प्रमुख पाहुणे होते, डॉ. पाटील - नामवंत नेत्रतज्ज्ञ. या वर्षी मुख्याध्यापकांच्या मनात एक अभिनव कल्पना होती. प्रमुख पाहुण्यांना भाषण करायला सांगण्याऐवजी दोन विद्यार्थ्यांनीच त्यांची मुलाखत घ्यावी. डॉ. पाटील यांना ही कल्पना पसंत पडली. ठरलेल्या वेळी कार्यक्रम सुरू झाला. जोशीबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली व दहावीतील अनिता व संदीप या विद्यार्थ्यांनी मुलाखत सुरू करावी असे सांगितले.

अनिता : नमस्कार डॉ. पाटील सर.

संदीप : नमस्ते डॉ. पाटील सर.

डॉ. पाटील : नमस्ते मुलांनो, पण तुम्ही मला सर म्हणण्याऐवजी डॉ. काका म्हणा, मला आवडेल.

अनिता : बरं डॉ. काका. आज आम्हाला तुमच्याकडून नेत्रदानाविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. आम्हांला पडलेले प्रश्न आम्ही आता विचारतो.

डॉ. पाटील : हो, विचारा.

संदीप : सगळ्यांत आधी हे सांगा काका, की नेत्रदान कुणाला उपयोगी पडते? म्हणजे सर्वच अंधांना ते उपयोगी असते का?

डॉ. पाटील : नाही. फक्त नेत्रपटलाने म्हणजे कॉर्नियाने अंधत्व आले असताना नेत्रदानाचा उपयोग होतो. समाजाला फायदा व्हावा म्हणून माणसाने मरणोत्तर नेत्रदान करावे. मृत व्यक्तीने सांगितले नसेल तर जवळचे नातेवाईकही असा निर्णय घेऊ शकतात.

अनिता : डॉ. काका या नेत्रदानाचा कसा फायदा होतो समाजाला?

डॉ. पाटील : डोळ्यांतील बुबुळावरचा पारदर्शक, मऊ पेशींचा पडदा ज्याला कॉर्निया किंवा नेत्रपटल म्हणतात. त्याचा वापर करून त्या दोषाने पीडित अंधाला दृष्टी मिळवून देता येते; तसेच डोळ्यांच्या विविध आजारांवर उपचार शोधण्यासाठी संशोधन, अभ्यास करायलाही ते उपयुक्त ठरते.

संदीप : डॉ. काका, कॉर्निअल अंधत्व म्हणजे काय?

डॉ. पाटील : कॉर्निया म्हणजे नेत्रपटल हा बुबुळ झाकणारा वा त्यावर असणारा अति मृदू पेशींचा पारदर्शक पडदा असतो. कोणत्याही कारणाने तो खराब झाला, फाटला वा अर्धपारदर्शक, अपारदर्शक झाला तर दृष्टी अचानक मंद होते वा नाहीशी होते. म्हणजेच अंधुक दिसते वा दिसेनासे होते याला कॉर्निअल अंधत्व म्हणतात.

अनिता : एखाद्या चांगल्या पाहू शकणार्‍या माणसाला अचानक असे काय होऊ शकते?

डॉ. पाटील : कोणत्याही प्रकारचा अपघात घडल्यास असे होऊ शकते. मुलांच्या बाबतीत खेळताना वा भांडताना डोळ्यांवर बसणारा मार, पेन-पेन्सिली यांसारखी काही वस्तू डोळ्यांत खुपसणे इत्यादी, मोठ्या माणसांच्या बाबतीत रस्त्यावर झालेले अपघात. कारखान्यामध्ये झालेले रासायनिक स्फोट वा डोळ्यांत काही धातूचे कण जाणे अशासारख्या गोष्टीने हे घडू शकते. त्याचप्रमाणे काही (इन्फेक्शन) संसर्गामुळे व कुपोषणामुळे अंधत्व येऊ शकते.

संदीप : अशा पद्धतीने आलेले अंधत्व बरे होऊ शकते का हो डॉ. काका?

डॉ. पाटील : हो बर्‍याच प्रमाणात. खराब झालेल्या कॉर्निया बदलून नवा, सशक्त कॉर्निया त्या जागी लावता आला तर हे अंधत्व दूर होऊ शकते. याला ‘नेत्रपटल प्रत्यारोपण’ असे म्हणतात. कृत्रिम बनवता येत नसल्याने अजूनतरी मानवी नेत्रपटल दानावरच अवलंबून राहावे लागते.

अनिता : आपण हे कुठून मिळवू शकतो?

डॉ. पाटील : सुदैवाने मृत व्यक्तीचे नेत्रपटल त्याच्या मृत्युपासून 4 ते 6 तासांच्या आत काढून गरजूंसाठी वापरता येते आणि फक्त मृताचेच नेत्रपटल घेता येते. जिवंत व्यक्ती कोणत्याही कारणाने हे दान करू शकत नाही. आपल्याकडे तसा कायदाच आहे.

संदीप : पण डॉ. काका, ज्यांना नेत्रदान करायचे आहे त्यांनी काय करावे मग?

डॉ. पाटील : डोळे फक्त माणसाच्या मृत्यूनंतरच काढता येतात. त्यामुळे आपण आपली नेत्रदानाची इच्छा जवळच्या नातेवाईकांजवळ बोलून ठेवावी. तेच लोक आय बँकेला म्हणजे नेत्रपेढीला कळवून बोलावू शकतात.

अनिता : नेत्रपेढी म्हणजे काय? ती काय प्रकारे काम करते हे सांगा ना डॉ. काका.

डॉ. पाटील : नेत्रपेढी ही समाजाच्या भल्यासाठी काम करणारी नफा न कमवणारी अशी धर्मदाय संस्था असते. मृत व्यक्तीचे नेत्रपटल काढणे, त्यावर आवश्यक त्या प्रक्रिया करणे व ते गरजूंपर्यंत पोहोचवणे हे काम ही संस्था करते. सध्या भारतात 500च्या जवळपास अशा संस्था आहेत.

अनिता : पण याचा दुरूपयोग होणार नाही कशावरून?

डॉ. पाटील : या संस्थांचे ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994’च्या अंतर्गत सरकारकडे नोंदणी करावी लागते. त्यांना डोळ्यांच्या खरेदी-विक्रीची परवानगी नसते. जर कुणी कायदा मोडला तर शिक्षा होते.

संदीप : नेत्रपेढीशी संपर्क कसा साधायचा?

डॉ. पाटील : बी.एस.एन.एल.ने संपूर्ण भारतात 1919 हा टोल फ्री नंबर नेत्रपेढ्यांसाठी दिला आहे, त्यावर संपर्क साधता येतो. स्थानिक वर्तमानपत्रांकडे वा गावातील मोठ्या दवाखान्यात चौकशी केली तरी जवळच्या नेत्रपेढीचा क्रमांक मिळू शकतो.

अनिता : फोन केल्यावर मग पुढे काय करायचे असते?

डॉ. पाटील : फोन केल्यावर नेत्रपेढीतील कर्मचारी आवश्यक काळजी घेण्याचे सांगून लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचतात. त्या गटात प्रशिक्षित तंत्रज्ञ व डॉक्टर असतात. 15 ते 20 मिनिटांमध्ये नेत्रपटल काढण्याचे काम पूर्ण होते. या वेळी नातेवाईकाची सही, दोन साक्षीदारांसमोर घेतली जाते.

संदीप : काळजी घ्यायची म्हणजे काय करायचे असते? ती व्यक्ती तर मृत असते ना?

डॉ. पाटील : हा चांगला प्रश्न विचारलास. सर्वप्रथम खोलीत पंखा चालू असेल तर तो बंद करावा. शक्य असेल तर ए.सी. चालू करावा. मृताच्या डोक्याखाली हलकेच उशी ठेवून डोके वर उचलून ठेवावे. पापण्या नीट बंद झाल्याची खात्री करावी. बंद डोळ्यांवर स्वच्छ, ओल्या कापडाची पट्टी ठेवावी. मृत्यूचा दाखला तयार ठेवावा व नेत्रपेढीला फोन करून, जवळच्या खुणांसहीत व्यवस्थित, सविस्तर पत्ता सांगावा. म्हणजे नेत्रपेढीच्या लोकांना सापडणे व येणे सोपे होते.

अनिता : डोळे काढले की ती व्यक्ती विद्रूप दिसत असेल ना? शिवाय असे व्यंग तयार करणे धर्माला मान्य असते का?

डॉ. पाटील : एक भीती मनातून काढली पाहिजे की, डोळे काढल्याने व्यक्ती विद्रूप दिसते. डोळ्याचा फक्त कॉर्निया वा बुबुळ काढले जाते व त्यानंतर डोळे व्यवस्थित बंद केले जातात. त्यामुळे चेहरा अजिबात विद्रूप दिसत नाही आणि धर्माचं विचाराल तर सर्व धर्म याला मान्यताच देतात. मृतदेहाबरोबर जाळून राख होण्यापेक्षा वा मातीत मिसळून वाया जाण्यापेक्षा दोन गरजूंना दृष्टी देणे हे केव्हाही पुण्याचेच काम ठरेल. त्या माणसाच्या आयुष्याचे सार्थकच झाले असेच म्हणावे लागेल.

संदीप : नेत्रदान कोणाला करता येते?

डॉ. पाटील : कुणालाही करता येते. त्याला वयाची, लिंगाची, धर्माची कोणतीही अट नाही. चष्मा असणारी व्यक्ती अगदी मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीलाही नेत्रदान करता येते. फक्त रेबीज, धनुर्वात, एड्स, कावीळ, कॅन्सर यांसारख्या काही आजाराचे रुग्ण नेत्रदान करू शकत नाहीत. नेत्रपेढीचे तज्ज्ञ डोळ्यांबरोबर थोडेसे रक्तही घेतात व तपासणीनंतर ते नेत्रपटल दुसर्‍यास देण्याजोगे आहे की नाही ठरवतात.

मी आज तुम्हा सर्वांना आवाहन करतो, की आपण स्वत: तसेच इतरांनाही नेत्रदानासाठी प्रोत्साहित करा. गरजूंच्या संख्येपेक्षा दात्यांची संख्या अगदीच कमी आहे. ईश्वराने दिलेली ही अमूल्य देणगी, तिची मृत शरीरासह विल्हेवाट न लावता गरजू रुग्णांना द्या. समाजाचे ॠण फेडणेच आहे हे एक प्रकारे.

अनिता : धन्यवाद डॉ. काका तुम्ही इथे आलात व आमच्या शंकांचे निरसन केलेत. मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सांगते की, इथून पुढे आम्हीही या नेत्रदान चळवळीला आमच्या परीने हातभार लावू. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू. धन्यवाद!

- आरती देवगांवकर

[email protected]