आज सगळी मुलं जमली पण स्नेहलताईचाच पत्ता नव्हता. खरं तर ती नेहमीच वेळेवर येते. अगदी तिच्या येण्या जाण्याच्या वेळेवर घड्याळ लावून घ्यावं इतकी वेळेवर. मग आजच काय झालं. वाट बघून सगळे कंटाळायच्या आतच, केतकी सर्वांसमोर येऊन उभी राहिली. म्हणाली, "स्नेहलताई आली नाही अजून म्हणून काय झालं. ताई नेहमी सुरुवातीला खेळ घेते, तसा मी घेऊ का? आम्ही आजीकडे जातो ना, तिथे नेहमी हा खेळ खेळतो. "

"हो ऽऽऽऽ ...", सगळ्यांनी एकसुरात  होकार दिला.

केतकी म्हणाली, "अगदी सोप्पा खेळ आहे. आपण कितीतरी प्रकारची फुलं पाहतो किनई. तर आपण फक्त फुलांची नावं आठवायची. ती सुद्धा अगदी तालाच्या  ठेक्यात बरं का.... प्रत्येकानं एका फुलाचं नाव सांगायचं.

चला गोल करून बसा बरं सगळ्यांनी.... हा...

आता एक  दोन  तीन  चार.........अशा चार टाळ्यांचा ठेका पकडायचा.

एक  ...............दोन ..................तीन .....................चार

 

सांगा सांगा ...... लवकर सांगा ..... काही फुलांची .......नावं सांगा.....

 

गुलाब.......मोगरा........जाई.......जुई.........पारिजातक.......झेंडू.......शेवंती........चाफा.......सोनचाफा...

 

कवठी चाफा..... जास्वंद......तगर.......बकुळ.......कमळ........अस्टर...... लीली...... रातराणी......आर्किड...

 

चंपा........चमेली..........नागचाफा..........ब्रह्मकमळ.......घाणेरी......सदाफुली.......गुलबक्षी........निशिगंध.....मधमालती......गुलमोहर......कर्दळ......कृष्णकमळ......केवडा...... कुंदा......अबोली.....धोतरा......गोकर्ण......

 

पळस.......कोरांटी......तेरडा.......बहावा.......निवडुंग.........बोगनवेल......रुई.....सूर्यफूल......हिरवा चाफा.....

 

ट्युलिप .......डेलिया......केतकी......गुलछडी........नागफणी.....

 

खेळ अगदी रंगात आला होता. सुरुवातीला फुलांची नावं पटापट येत होती, पण नंतर आठवून आठवून सांगावी लागत होती. जवळजवळ पन्नास एक नावं जमा झाली.....

हा खेळ चालू असतानाच स्नेहलताई कधी मागे येऊन उभी राहिली, कोणालाच कळलं नाही. खेळ संपताच ताईनं जोरजोरात टाळ्या वाजवून सर्वांचं कौतुक केलं. ताईला बघताच सगळ्यांनी एकच गलका केला. स्नेहलताईनं सर्व मुलांची चक्क माफी मागितली. म्हणाली....., "मला दहा मिनिटं उशीर का झाला याची कारणं मी सांगत बसणार नाही. कारण, वेळेत काम पूर्ण करणं, दुसऱ्याला दिलेली वेळ पाळणं हे मी कटाक्षानं करत असते. त्यामुळे मला आज उशीर झाला याबद्दल मी खरंच माफी मागते...."

"त्यांत काय एवढं..? चालायचंच थोडं मागे पुढे....हा अाकाश तर नेहमीच सांगितल्या वेळेपेक्षा उशीरा येतो...", निखिल म्हणाला.

"अहं.... अजिबात नाही. या गोष्टीसाठी No Compromise !......", ताई म्हणाली.....

"Time is Money......असं म्हणतात हे माहिती आहे ना ? वेळेला कां बरं एवढं महत्त्व द्यायचं माहिती आहे?"

कारण गेलेली वेळ परत कधीच येत नाही. मुठीत धरून ठेवलेली वाळू जशी घट्ट पकडून नाही ठेवता येत, ती हळूहळू हातातून निसटून जाते. तसंच आयुष्यात ही एकच गोष्ट अशी आहे की ती धरून नाही ठेवता येत. पुढे पुढे सरकत जाते. आणि म्हणूनच ती काटेकोरपणे, विचारपूर्वक वापरावी लागते. आपण आपल्या वेळेचं मोल समजून घ्यायला लागलो की आपोआपच दुसऱ्याच्या वेळेचीही किंमत समजून घेता येते. आपल्यासाठी दुसऱ्याला ताटकळत ठेवणं कधीही चांगलं नाही. झालाच आपल्याकडून कधी उशीर, तर त्याची निदान जाणीव तरी झाली पाहिजे आणि त्यासाठी 'दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.'........ म्हणजे साॅरी म्हंटलं पाहिजे.

तुम्हाला जाणवणारही नाही पण कित्येक गोष्टी नेमानं होत असतात, म्हणून आपलं आयुष्य सुरळीत चालू असतं. आणि ही गोष्ट आपल्याला निसर्गाकडून शिकायला मिळते. "

सर्वजण मनांतल्या मनात ताईच्या बोलण्याचा विचार करू लागली होती.

स्वानंदी दीदी म्हणाली, "ताई, तू बोलतेच असं की त्याकडे दुर्लक्ष करताच येत नाही. त्याहीपेक्षा तुझ्या बोलण्याची पद्धत अशी की समोरचा गुंग होऊन ऐकत राहतो. त्यावर विचार करू लागतो. आणि मुख्य म्हणजे त्यावर आपलं मत तो सांगू शकतो.", स्नेहलताई हसली.

लगेच निखिलने स्वानंदीच्या बोलण्याला पुस्ती जोडली....."ताई, फक्त बोलत नाही, तर समोरच्याला बोलतं करते, त्याचं म्हणणं ऐकूनही घेते. "

"अरे, वा तुम्ही तर माझ्यासारखंच बोलायला लागलात. याला काय म्हणतात माहितीये.... 

'वाण नाही पण गुण लागला......'

 म्हणजे तुम्हाला कळलं किनई, आपण नुसतं बोलायचं नाही तर समोरच्याचं ऐकूनही घ्यायचं शांतपणे. त्यावर विचार करायचा, मग आपली प्रतिक्रिया द्यायची. एवढी एक गोष्ट पाळलीत, तर कितीतरी भांडणं, गैरसमज आपोआप मिटतील.....

बरं मग सांगा बरं निसर्ग कसा काय वेळेवर कामं करतो ते...."

 

निखिल - "रोज सूर्य उगवतो .... मावळतो... त्यामुळे दिवस रात्र होतात....."

 

स्वानंदी - "रोज समुद्राला भरती ओहोटी येते...."

 

वेदा - "दर वर्षी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन ऋतू येतात."

 

सायली - "दर वर्षी मे महिन्याच्या सुट्टीत आंबे खायला मिळतात." सारे खुदुखुदू हसले.

 

अमेय - "झाडांची जीर्ण झालेली पानं गळतात आणि पुन्हा नवी पालवी फुटते."

 

समीर - "दर वर्षी शेतकरी शेतात बियाणं पेरतात आणि धान्य, फळं आपल्याला मिळतात."

 

नेहा - "उन्हाळ्यात आटलेले नदी नाले पावसामुळे तुडुंब भरतात."

 

स्नेहल ताई खूश झाली. "बघा.... तुम्हालाही जाणवलं ना वेळेवर गोष्टी होण्याचं महत्त्व...! पण..

 

सूर्य नेहमीसारखा उगवलाच नाही तर ?

 

नळाला पाणीच आलं नाही तर ?

 

स्वयंपाकाचा गॅस नसला तर ?

 

रात्र झाल्यावर वीज गेली तर ?

 

वाय फायवरचं नेट गेलं तर ?

 

गाडीत भरायला पेट्रोलच नाही मिळालं तर ?

 

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या घटनांकडे पाहिलं की जाणवतं, जे सहज विनासायास उपलब्ध होतं, त्यांचं महत्त्व आपल्याला वाटत नाही. पण एखादी गोष्ट एखादं वेळेस नाही मिळाली की त्याचं महत्त्व पटतं. "

 

"जशी तू आज नेहमीसारखी आली नाहीस आणि आम्हाला पटलं ताईचं महत्त्व....", सलील दादा उत्तरला आणि टाळ्या वाजवून सगळ्यांनी त्याला दाद दिली.

 

"आणि म्हणूनच या गोष्टी जपून, विचारपूर्वक वापरायला हव्यात. पाणी, वीज, सौरउर्जा, इंधन आणि वेळ.... काटेकोरपणे, जपून वापरा, पुरवून वापरा. "

 

"ताई, आत्ता मराठी महिना कोणता चालू आहे गं?" छोट्या वेदाचा प्रश्न.

 

"चैत्र, वैशाख झाला, आता ज्येष्ठ असणार.....हो किनई ताई?", सायलीचा निरागस प्रश्न.

 

"हो ...पण आत्ता चालू आहे तो  'अधिक ज्येष्ठ ' ...."

 

"म्हणजे काय?"

 

"कोणाला माहिती आहे, अधिक महिना म्हणजे काय ...?

 

"मला थोडं थोडं माहिती आहे.....", निखिल सांगू लागला..." इंग्रजी कॅलेंडर आणि मराठी कॅलेंडर यांच्यात सारखेपणा राहावा म्हणून असतो हा अधिक महिना ..."

 

केतकी पुढे सांगू लागली...."इंग्रजी कॅलेंडरमध्ये सात महिने ३१ दिवसांचे, तर पाच महिने ३० दिवसांचे आणि एक महिना २८ दिवसांचा. पण मराठी कॅलेंडरमध्ये तर सगळेच महिने तीस दिवसांचे. म्हणून हा फरक पडतो."

 

"बरोब्बर.....", स्नेहलताईनं शाब्बासकी दिली.... "म्हणूनच दर ३२ महिन्यांनी, म्हणजे साधारण पावणे तीन वर्षांनी असा हा एक 'अधिक महिना' .... extra month ... मराठी वर्षात घातला जातो. त्याला अधिक महिना, धोंड महिना, पुरुषोत्तम मास अशी पण नावं आहेत. यामुळे दोन्ही कॅलेंडरमधला फरक कमी होतो.

 

म्हणून आत्ता चालू आहे तो अधिक ज्येष्ठ .....नंतर येईल नेहमीचा ज्येष्ठ. ....कळलं?

 

चला.....आता अधिक महिन्यात अधिक उत्साहानं, अधिक चांगलं काहीतरी करायचं ठरवा आणि ....

 

टाईम अप नाऊ.....पळा घरी....."

 

“दुसऱ्याशी सतत तुलना न करता, आपली स्पर्धा आपल्याशी.’’ सांगतेय स्नेहलताई खालील लेखात.

लेख ३ - सांग ना स्नेहलताई

 

-मधुवंती पेठे 

[email protected]