उन्हाळा सुरू झाला की, डोळ्यांसमोर येते ते रणरणते ऊन अन् घामाने भिजलेले अंग. मुले मात्र वार्षिक परीक्षा कधी संपतात न् सुट्टी कधी लागते याचीच वाट पाहत असतात, त्यासाठीचा आपला कार्यक्रम आखून ठेवतात. पण आपल्या आखलेल्या कार्यक्रमात काही गोष्टींची काळजीही घेतली पाहिजे. ती कशी ते पाहा.

उन्हाळ्यात पाण्याची करमतरता भासते. तहान लागल्यावर मिळेल ते पाणी पिण्याची शक्यता असते. त्यातून जंतुसंसर्ग होऊन उलट्या, जुलाब, गॅस्ट्रो इत्यादी आजार होऊ शकतात. अशा वेळी साखर, मीठ, पाणी, लिंबू यांचे मिश्रण मुलांना पाजावे. उन्हाळ्यात घामही खूप येतो. घामावाटे पाणी, सोडियम सारखे क्षार बाहेर पडतात. म्हणून नुसते पाणी न पिता शुद्ध पाण्यातील लिंबू सरबत, कैरीचे पन्हे अशी आंबट-गोड आणि किंचित मीठ घातलेली सरबते अवश्य प्यावीत. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे म्हणजे डीहायड्रेशनमुळे शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होते. पुरेसे पाणी पोटात गेल्याने डीहायड्रेशन टाळता येईल. म्हणूनच उन्हाळ्यात जागेपणी दर तासाला 150 मि.ली. इतके पाणी प्यावे. तीव्र उन्हामुळे उष्माघात (सनस्ट्रोक) होण्याची शक्यता असते. या प्रकारात तापमान नियंत्रण करणारे मेंदूतील केंद्र निकामी होऊ शकते. उन्हात फिरताना कानाच्या मागचा भाग झाकला जाईल अशी पांढर्‍या रंगाची टोपी घालावी. उन्हात फिरताना काळा चष्मा (गॉगल) घालावा. तसेच या दिवसात प्रवास घडतात, त्या दरम्यान उपलब्ध पाणी पिण्यापेक्षा, घरून निघतानाच पिण्याचे पाणी नेलेले चांगले.

या दिवसात लहान गावात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवते. नेहमीचे शुद्ध पाण्याचे स्रोत उपलब्ध न झाल्यामुळे पिण्यास योग्य नसलेले पाणी या भागांतील नागरिकांना प्यावे लागते. या दूषित पाण्यामुळे होणारे कॉलरा, हगवण, कावीळ, टायफॉईड हे रोग नव्याने उसळी घेताना दिसतात. हे टाळण्यासाठी घरात पिण्याचे पाणी उकळून, गाळून किंवा तुरटी फिरवून घ्यावे. तसेच आजकाल विषमज्वर, कावीळ, कॉलरा, रोटा यांसाठी वेगवेगळ्या लसी उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने या लसी पालकांनी मुलांना योग्य त्या वयात देणे हिताचे असते.

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे सुट्टीचे दिवस. या दिवसांत उसाचा रस, थंडगार पेये, बर्फाचा गोळा, कुल्फी अशा पदार्थांचा मोह पडणे अगदी साहजिकच आहे. मात्र, या पदार्थांत वापरला जाणारा बर्फ तयार करण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी वापरले गेले पाहिजे. अशुद्ध बर्फामुळेही वरील आजारांचे प्रमाण वाढते. बाहेरचे, गाडीवरचे चटकमटक अन्नपदार्थही या दिवसांत वारंवार खाण्यात येतात. तापमान वाढल्यामुळे उघडे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. गाडीवर अन्नपदार्थ विकणार्‍या किंवा उसाचा रस काढणार्‍या व्यक्तीचे हात दर वेळी स्वच्छ धुतलेलेच असतील, याचीही खात्री देता येत नाही. त्यामुळे शक्यतो उघडे अन्नपदार्थ टाळलेलेच बरे. दुधाचे पदार्थ, क्रीम, केक इत्यादी पदार्थही उन्हाळ्यात लवकर खराब होतात.

वाढलेल्या तापमानात हवेतील विषाणूंचे प्रमाण आपोआपच कमी होते. तरीही हवेवाटे होणारे सर्दी, ताप, खोकला असे विषाणूजन्य संसर्ग झालेल्या व्यक्तींपासून इतरांनी किमान सहा फूट दूर राहावे. आजारी व्यक्तीनेही खोकताना, शिंकताना रुमाल वापरणे आवश्यक आहे.

घामाने भिजलेले कपडे, गणवेष, मोजे, बनियन तसेच अंतर्वस्त्र स्वच्छ धुऊन मगच वापरावीत; त्वचेवर घामोळे किंवा पुटकुळ्या येण्यासारखे आजारही होणार नाहीत. त्वचेचे आजार टाळण्यासाठी घाम शोषणारे सुती कपडे घालणेच इष्ट.

कडक ऊन असेल तर शक्यतो बाहेर जाणे टाळावे. जायचेच असेल, तर ऊन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी किंवा छत्री घ्यावी. घरातील किंवा ऑफिसमधील वातावरण थंड ठेवण्यासाठी एअर कंडिशनरचा वापर सर्रास होताना दिसतो. या ए.सी.ची स्वच्छता केलेली असणे आवश्यक आहे. अन्यथा त्यात साठलेल्या घाणीतूनच संसर्ग पसरण्याची भीती असते.

उन्हाळा साधारणतः मार्च महिन्यापासून सुरू होतो. सुरुवातीला दिवसा प्रखर ऊन व रात्री थंडी अशी विषम स्थिती असते. यामुळे वातावरणात काही विषाणूंची वाढ होते. विषाणुजन्य आजारात सर्दी, खोकला, ताप, डोळे चुरचुरणे, लाल होणे, पाणी येणे अशी अनेक लक्षणे दिसतात. लहान मुलांमध्ये याच सुमारास गोवर, कांजिण्या हे आजार बळावतात.

उन्हाची तीव्रता जसजशी वाढू लागते, तसे शरीराचेही तापमान वाढू लागते. लहान मुलांमध्ये ताप वाढून झटके येऊ शकतात. तसेच थकवा, पाणी कमी झाल्यास शुष्कता, उष्माघातही होऊ शकतो. विशेषतः वृद्ध माणसांमध्ये पाणी कमी प्यायले गेल्याने थकवा, शुष्कता जास्त जाणवू शकते. याच सुमारास लग्नसमारंभ, प्रवास, बाहेर खाणे, अशा सर्व गोष्टींमुळे उलटी, जुलाब यांसारखे पचनसंस्थेचे आजारही होतात. अतिउष्णतेमुळे अंगावर बेंड, घामोळ्या येणे असे त्वचेचे आजार, हातापायांची जळजळ, लघवीला जळजळ होणे; तसेच नाकातून रक्त येणे किंवा घुळणा फुटणे असेही त्रास होऊ शकतात. याच वेळेस शाळा तसेच महाविद्यालयांच्या परीक्षाही असतात. त्यामुळे मुलांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

अतिमहत्त्वाच्या टीपस् :

•अगदी महत्त्वाचे व शक्यतो आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे. शक्यतो दुपारी बारा ते चार ही वेळ टाळावी.

•पातळ व सुती कपडे तेही शक्यतो पांढर्‍या किंवा फिक्या रंगाचे असावेत.

•डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी. गॉगल्स वापरावेत.

•हलका व्यायाम असावा. घामाघूम होईपर्यंत व्यायाम सुरू करू नये. पोहण्याचा व्यायाम येत असल्यास करावा.

•बाहेर जाताना सनस्क्रीमचा वापर करावा.

•पाणी भरपूर प्यावे. थंड पेयांपेक्षा शहाळ्याचे पाणी, कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक, नीरा यांचे सेवन करावे.

•तिखट, मसालेदार, चमचमीत आहार टाळावा.

•घरात पंखा, एसी किंवा खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावावेत.

•आहारात काकडी, टरबूज, कलिंगड, कैरी, कांदा यांचा समावेश करावा.

•लहान मुले, वृद्ध माणसे यांची विशेष काळजी घ्यावी.

•उलट्या-जुलाब यांसारख्या आजारांत जल-संजीवनी घ्यावी अथवा घरच्या घरी मीठ-साखर-पाणी सतत पाजत राहावे.

- डॉ. प्रमोद जोग

[email protected]